स्वाभिमानीच्या महिला आंदोलकांनी ऊसाच्या थळात जाऊन ऊसतोड बंद पाडली

शेवगाव प्रतिनिधी, दि. १८ : उस उत्पादक शेतक-यांच्या विविध मागण्यांच्या पाठपुराव्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी पुकारलेल्या दि. १७ व १८ नोव्हेंबर असे दोन दिवस राज्यातील उस तोड व उस वाहतूक बंद ठेवण्याच्या आंदोलनाच्या यशस्वीतेसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा स्नेहल दत्तात्रय फुंदे व त्यांच्या सहकारी पदाधिका-यांनी आज शुक्रवारी येथील ऊसतोड सुरु असलेल्या थेट थळावर जावून रणरागिणी  दूर्गेचा अवतार धारण करत ऊसतोड थांबविली. यावेळी संघटनेच्या महिला सदस्यांनी केलेल्या प्रचंड घोषणाबाजीमुळे परिसर अक्षरश: दणाणून गेला.

       राज्य सरकारने एफआरपीचे दोन तुकडे करण्यासाठी ऊसदर नियंत्रण अध्यादेशामध्ये केलेली दुरुस्ती मागे घेवून येत्या हिवाळी अधिवेशनात पुन्हा नव्याने दुरुस्ती करून उस उत्पादक शेतक-यांना एक रक्कमी एफआरपी देण्याचा कायदा करावा. तो पर्यंत साखर कारखान्यांनी गेल्या वर्षीच्या सरासरी उता-याच्या आधारावर यंदाच्या २०२२-२३  च्या हंगामामध्ये एक रकमी एफआरपी द्यावी मागील २१-२२ च्या हंगामात गाळप केलेल्या उसासाठी एफआरपी अधिक २०० रुपये भाव  मिळावा. या प्रमुख मागण्यांच्या पाठपुराव्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने काल व आज शुक्रवारी ऊस तोड व  वाहतूक बंद आंदोलनाची हाक दिली होती.  

तालुक्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी परिसरातील साखर कारखाना प्रशासनास त्यांनी दोन दिवस उस तोड व उस वाहतुक बंद करून स्वाभिमानीच्या आंदोलनास पाठबळ देण्याची विनंती केली होती. त्यानुसार परिसरातील काही कारखान्यांनी काल ऐकक शिफ्ट बंद ठेवली. तर कार्यकर्त्यांनी ऊस वाहतूक करणारी वाहने आडवली होती. मात्र आज  महिला आंदोलकांनी रणरागिणी बनून प्रत्यक्ष ऊस तोडीच्या स्थळी जाऊन ऊस तोड बंद करुन सर्वावर कडी केली.  यावेळी ऊस तोड मजूरांनी देखील कोयता बंद करुन महिला आंदोलकांना प्रतिसाद दिला.

      यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटना महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा स्नेहल फुंदे, तालुकाध्यक्षा बायजाबाई बटूळे, शहर अध्यक्षा हिराबाई घोडके, बालिका फुंदे, जयश्री काथवटे यांनी उसतोड सुरु असलेल्या थेट थळावर जावून संबधित शेतक-याचे प्रबोधन करून सुरु असलेली ऊसतोड थांबविली. यावेळी काही काळ महिला आंदोलकांनी केलेल्या प्रचंड घोषणाबाजीमुळे परिसर दणाणून गेला.