गणेशच्या कार्यक्षेत्रातील ऊस काळे कारखान्याने नेऊ नये – शिवाजी लहारे

आमदार आशुतोष काळे यांना केली विनंती

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १९ : श्री गणेश सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील ऊस इतर कारखान्यांनी नेऊ नये याबद्दल आम्ही अनेकदा आवाहन केले आहे. आमचा हा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. नूतन आमदार आशुतोष काळे यांना देखील आम्ही विनंती केली होती.

गणेश कार्यक्षेत्रातील ऊस आपल्या कारखान्याने नेऊ नये आम्ही आपल्याला चांगले मताधिक्य देऊ तो शब्द आम्ही पूर्ण केला त्याची जाणीव ठेवत आता आमदार काळे देखील योग्य भूमिका घेतील अशी अपेक्षा असल्याची प्रतिक्रिया श्री गणेश कारखान्याचे माजी व्हा. चेअरमन शिवाजी लहारे यांनी दिली आहे. 

गणेश कारखाना परिसरातील ऊस कार्यक्षेत्रात इतर कारखाने टोळ्या टाकतात त्यामुळे गाळपाला अडचण येते. आवश्यक तेवढा ऊस आधीच उपलब्ध नसताना त्यात उसाची पळवा पळवी झाली तर हजारो कुटुंबाची कामधेनु असणारा श्री गणेश सहकारी साखर कारखाना हा अडचणीत येऊ नये यासाठी सर्वांचे सहकार्य गरजेचे आहे. कारखान्याचे मार्गदर्शक विवेक कोल्हे यांच्या सूचनेवरून आम्ही आमदार काळे यांना निवडणुकीत मतरुपी सहकार्य केले आता त्यांनी ऊस घेऊन न जाण्याचे सहकार्य करावे अशी गणेश परिसराची भावना आहे.

उसाची उपलब्धता करण्यासाठी दूरवरून वाहतूक करून उस आणणे हे कारखान्याच्या हिताचे नाही. कार्यक्षेत्रातील ऊस गणेशला मिळाला तर गाळप चांगले होऊन कारखान्याच्या विकासाला हातभार लागू शकतो. प्रत्यक्षात सहकारातील अलिखित संकेत आहे की, एकमेकांच्या कार्यक्षेत्रात कुठलाही कारखाना टोळ्या टाकत नाही मात्र यापूर्वीचे अनुभव कटू आहे.

विधानसभा निवडणूक काळात गणेश परिसराने सभोवताली असणाऱ्या सर्व कारखान्यांना विनंती केली होती की, यंदाच्या हंगामात गणेशचा ऊस गणेशला राहील यासाठी आपण नियोजन करावे त्यानंतर मतदानातूनही सहकार्य केले आहे. आता लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे त्यांनी योग्य भूमिका घ्यावी अशी प्रतिक्रिया लहारे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

काळे कारखान्याने गणेश कार्यक्षेत्रात ऊस नेण्यासाठी टाळावे, गणेश परिसराने विधानसभा निवडणुकीत सहकार्य केले. आता आमदार आशुतोष काळे यांनी तशी पावले टाकावी अशी गणेश परिसराची भावना.