पंतग उडवताना विहिरीत पडुन लहान मुलाचा मृत्यू

शिर्डी प्रतिनिधी, दि. २५ : शिर्डी लगत असलेल्या सावळीविहीर खुर्द येथे पतंग खेळताना जवळच असणारी पाण्याची खोल विहीर लक्षात न आल्याने एक आठ वर्षीय मुलगा या विहिरीत पडून मृत्युमुखी पडला. ही घटना बुधवारी २५ डिसेंबरला दुपारच्या दरम्यान घडली. या घटनेमुळे सावळीविहीर व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. 

सावळीविहीर खुर्द येथील पहिली इयत्तेत शिकत असलेला यश हिरामण सोनवणे वय (८) हा मुलगा नाताळची सुट्टी असल्यामुळे घरी होता. तो पतंग खेळत असताना जवळच असणाऱ्या व कठडा नसणाऱ्या  एका विहिरीमध्ये पडला. त्याच्या समवेत असणारी इतर  लहान मुले ओरडल्यामुळे आसपासचे लोक जमा झाले, माजी सरपंच अशोकराव जमधडे, सुधीर वर्पे महेश जमधडे सागर जाधव यांनी  घटनास्थळी धाव घेतली.

शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर कायंदे व  पोलीस पथकाने तात्काळ भेट दिली. साई संस्थान व शिर्डी नगरपालिकेचे अग्निशामक बंब, हे पथकासह घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. त्यांनी या मुलाला सुमारे ५० फुट खोल असलेल्या विहिरीतून अडीच तासानंतर मोठ्या प्रयत्नाने या मुलाला बाहेर काढले, परतु तो मयत  झाला होता.

पतंग खेळताना या चिमुकल्याचा जीव गेला असून परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान राहता येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून शिर्डी पोलीसांनी अकस्मात मृत्यू म्हणून गुन्हा दाखल केला असून अधिक तपास शिर्डी पोलीस करीत आहे.