हिंदूंची मंदिरे सरकारी नियंत्रणातून मुक्त करावीत – रामगिरी महाराज

शिर्डी प्रतिनिधी, दि. २५ : प्रतिकृल परिस्थितीत संतांनी मंदिरांची संस्कृती टिकवून ठेवली. सद्यस्थितीत हिंदू केवळ तीर्थक्षेत्राला जातात; परंतु त्या तीर्थक्षेत्रांचे पावित्र्य नष्ट होत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करतात. अध्यात्म आपल्या श्वासात आणि रक्ताच्या प्रत्येक थेंबात यायला हवे. हिंदू धर्माविषयी निष्क्रिय राहिले, तर भविष्यात जगणे कठिण होईल.

कोट्यवधी रुपयांचे व्यवहार होत असूनही भारतातील एकही मशिद किंवा चर्च सरकारने ताब्यात घेतलेले नाही. अन्य धर्मियांची प्रार्थनास्थळे सरकारच्या ताब्यात नाही; मात्र हिंदूंचीच मंदिर सरकारच्या ताब्यात का ? त्यामुळे आता हिंदूंची मंदिरे सरकारी नियंत्रणातून मुक्त करावीत, अशी मागणी नगर येथील सद्गुरु गंगागिरी महाराज संस्थानचे मठाधिपती महंत रामगिरी महाराज यांनी केली. 

दरम्यान महाराष्ट्र मंदिर महासंघ, विरार येथील श्री जीवदानी देवी संस्था, श्री ज्योतिर्लिंग भीमाशंकर देवस्थान, श्री साई पालखी निवारा आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने श्री साई पालखी निवारा, शिर्डी येथे आयोजित तृतीय ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’च्या प्रथम दिनी ते बोलत होते. या परिषदेला संपूर्ण महाराष्ट्रभरातून ७५० हून अधिक निमंत्रित मंदिराचे विश्वस्त, प्रतिनिधी, पुरोहित, मंदिरांच्या रक्षणासाठी लढा देणारे अधिवक्ते, अभ्यासक आदी सहभागी झाले आहेत.

परिषदेचा प्रारंभ श्रीक्षेत्र बेट कोपरगाव येथील राष्ट्रसंत जनार्दन स्वामी (मौनगिरीजी) महाराज समाधी मंदिराचे पू. रमेशगिरी महाराज, कोपरगाव येथील श्रीक्षेत्र राघवेश्वर देवस्थानचे मठाधिपती पू. राघवेश्वरानंदगिरी महाराज, सनातन संस्थेचे सद्गुरु सत्यवान कदम, मुंबई येथील समस्त महाजन संघाचे अध्यक्ष गिरीष शहा, श्री जीवदानी देवी संस्थानचे अध्यक्ष प्रदीप तेंडोलकर आणि मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक सुनील घनवट यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाला.

मंदिर महासंघाचा कार्यात्मक आढावा महासंघाचे राष्ट्रीय संघटक सुनील घनवट यांनी मांडला. यावेळी घनवट म्हणाले की, लोकसभेच्या निवडणुकीत धर्मांधांनी त्यांची रणनिती मशिदींमध्ये ठरवली. मतदान कुणाला करावे, यासाठी फतवे काढले. तर मग हिंदु धर्म आणि राष्ट्र यांविषयीची रणनीती मंदिरांमध्ये का निश्चित केली जाऊ नये ? या परिषदेला एकवटलेल्या हजारो विश्वस्तांनी रस्त्यावर उतरून मंदिरे सरकारी करणापासून मुक्त करण्यासाठी मागणी केली, तर सरकारला मंदिरे सरकारी करणापासून मुक्त करावीच लागतील.

अशाप्रकारे प्रत्येक विश्वस्ताने ‘आपल्या मंदिरातून हिंदू संघटन कसे करता येईल ?’, त्याचा विचार करून कार्य केल्यास भविष्यात हिंदूंना सुरक्षा देण्याचे कार्यही मंदिरांद्वारे करता येऊ शकते. असेही त्यांनी आवाहन केले.याप्रसंगी शिर्डीजवळील पुणतांबा येथे श्री महादेव मंदिरात मूर्तीची विटंबना झाली आहे. या घटनेचा मंदिर परिषदेत निषेध करून आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी एकमुखाने मागणी राज्य सरकारकडे करण्यात आली.