संजीवनी सैनिकी स्कूल व ज्यु. कॉलेजमध्ये वार्षिक स्नेहसम्मेलन संपन्न
कोपरगांव प्रतिनिधी, दि. २५ : सैनिकी स्कूल व ज्युनिअर कॉलेजमधील विद्यार्थ्यांचे आचरण इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत वेगळे असते. भविष्यात सैन्य दलात ऑफिसर होण्याचे स्वप्न बाळगा. पहिल्याच वेळेला यश मिळेल असे नाही. फिनिक्स पक्षा सारखे पराभव वाट्याला आला तरी पुन्हा पुनरागमन करा. यश हमखास मिळेल, त्यासाठी जीवनात शिस्त अंगीकारून निर्धार व समर्पणाची भावना ठेवा, असा सल्ला निवृत्त लेफ्टनंट कर्नल व श्री साईबाबा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, शिर्डीचे मेडिकल डायरेक्टर डॉ. शैलेश ओक यांनी दिला.
संजीवनी सैनिकी स्कूल व ज्युनियर कॉलेजच्या २४ व्या वार्षिक स्नेहसम्मेलन व पारीतोषीक वितरण समारंभात डॉ. ओक प्रमुख पाहुणे म्हणुन बोलत होते. संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे विश्वस्त सुमित कोल्हे हे अध्यक्षस्थानी होते. यावेळी व्यासपीठावर संजीवनी सिनिअर कॉलेजचे प्राचार्य डॉ. समाधान दहिकर, डायरेक्टर डी. एन. सांगळे, कुणाल आभाळे, प्राचार्य कैलास दरेकर उपस्थित होते. पालकांची संख्या उल्लेखनिय होती. प्रारंभी प्राचार्य दरेकर यांनी चालु वर्षाच्या विविध उपलब्धींचा आलेख मांडून सर्वांचे स्वागत केले.
डॉ. ओक पुढे म्हणाले की, सुरूवातीपासुन शारीरिक स्वास्थ्य चांगले ठेवा. मिलीटरीत सकाळी ५ वाजता उठावे लागते. १६०० मीटरचे अंतर ५ मिनिटात पुर्ण करावे लागते. तेथे जात, धर्म, गरीब, श्रीमंत असे काहीच नसते. तेथे फक्त शूरता आणि शिस्त महत्वाची असते. आपणास सैन्यदलात जायचेच असेल तर वयोमर्यादे पर्यंत प्रयत्न चालु ठेवा.
समजा नाहीच संधी मिळाली तर आपण एक उत्तम नागरीक बनलेलो असतो. पालकांनी पाल्यांसाठी संयम ठेवावा, त्यांना आधार द्यावा. विद्यार्थ्यांनी केलेल्या शानदार संचलनाबध्दल त्यांनी शिक्षकांचे कौतुक केले. तसेच ग्रामिण भागात सर्वच क्षेत्रात आघाडीवर असणारे विद्यार्थी घडविणे हे सोपे नसते, असे सांगुन डॉ. ओक यांनी व्यवस्थापनाचीही प्रशंसा केली.यावेळी डॉ. दहीकर यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
अध्यक्षिय भाषणात सुमित कोल्हे म्हणाले की, संस्थापक स्व. शंकरराव कोल्हे यांनी जी शैक्षणिक आचारसंहिता घालुन दिलेली आहे, तिचे काटेकोर पालन संस्थचे अध्यक्ष नितिनदादा कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली चालु आहे. संजीवनी शिक्षण संस्था हा मोठा परीवार असुन सुमारे ३६००० विद्यार्थी येथुन बाहेर पडल्याचे सांगुन अनेक कुटूंबे स्वावलंबी झाले आहेत. पालकांना उद्देशुन ते म्हणाले की त्यांच्या पाल्यांच्या सर्वांगीण विकासाठी आम्ही कटीबध्द आहोत. सर्व मुलं येथे सुरक्षित आहेत येथिल शिक्षक स्वतःच्या मुलांप्रमाणे प्रत्येकाची काळजी घेतात.
बक्षिस वितरण व मार्गदर्शन कार्यक्रमानंतर पालकांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाची खास परवणी ठरली. विद्यार्थ्यांनी सुंदर नृत्य, वेगवेगळे वाद्य वाजवुन उपस्थितांचे मनोरंजन केले. भव्य स्टेज, उत्तम ध्वनी व्यवस्था व आकर्षक लाईट इफेक्टस् कार्यक्रमाचे आकर्षण ठरले.