महेश फटांगरेची पोलिस उपनिरीक्षकपदासाठी निवड

शेवगाव प्रतिनिधी, दि. ३० : तालुक्यातील भातकुडगाव येथील अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातील महेश आबासाहेब फटांगरे यांनी  पोलीस खात्याअंतर्गत दिलेल्या राज्यसेवा परीक्षेत घवघवीत यश मिळवून त्यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली आहे. याबद्दल शेवगावच्या राजीव राजळे मित्र मंडळाच्या वतीने नगरसेवक महेश फलके यांच्या कार्यालयात कृषक समाजाचे राज्याध्यक्ष, ज्येष्ठ नेते बापूसाहेब भोसले यांच्या हस्ते फटांगरे यांना सन्मानित करण्यात आले आहे.

     या प्रसंगी राजीव राजळे मित्र मंडळाचे राहुल धस, किरण आहेर ,पत्रकार प्रा जनार्दन लांडे पाटील उपस्थित होते.     यावेळी नगरसेवक महेश फलके म्हणाले, जीवनात उत्कृष्ठ यश मिळविणाऱ्या व्यक्तिच्या पाठीवर थाप टाकून, परिस्थितीवर मात करत त्याने प्राप्त केलेल्या यशाचे कौतूक झाले पाहिजे. जेणेकरुन भविष्यातही त्याची जीद्द कायम रहावी. तसेच इतरांना देखील त्यांच्यापासून प्रेरणा घेता यावी. या उद्देशाने राजीव राजळे मित्रमंडळ  समाजातील अशा व्यक्तीची सातत्याने दखल घेत असते.

   आबासाहेब  फटांगरे यांची परिस्थिती जेमतेम  असल्याने महेश यांना मामाकडे राहून प्राथमिक शिक्षण घ्यावे लागले.  भातकुडगावला अकरावी बारावी केल्यानंतर  पुढे त्यांनी वडिलांना शेतीकामात मदत करत शेवगावच्या न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयातून बी.ए. केले . आई-वडिलांना आर्थिक सहकार्याची गरज होती. म्हणून महेश सन २०१७ मध्ये महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस दलात भरती झाले. २०२१ मध्ये त्यांचा विवाह झाला. जबाबदारी आणखी वाढली.

मात्र जिद्द होती , ‘थांबला तो संपला ‘ या  इर्षेने प्रयत्न केले. कामाचा व्याप सांभाळत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची खात्याअंतर्गत स्पर्धा परीक्षा दिली. पहिल्याच प्रयत्नात यशही लाभले. आई वडील आणि ज्येष्ठांच्या आशीर्वादाने घेतलेल्या परिश्रमाचे चीज झाल्याची भावना यावेळी महेश फटांगरे यांनी सत्काराला उत्तर देतांना  व्यक्त केली. किरण आहेर यांनी आभार मानले.