शिर्डी प्रतिनिधी, दि. ४ : शिर्डीत ७ ते ९ जानेवारी राज्यस्तरीय मंडपम एस्क्पो प्रदर्शन व महाअधिवेशन आयोजित करण्यात आले असल्याची माहिती ऑलटेंन्ट डिलर्स वेल्फेअर ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष सागर चव्हाण व प्रदेशाध्यक्ष दडूसेठ पुरोहित यांनी दिली. ऑलटेंन्ट डिलर्स वेल्फेअर ऑर्गनायझेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने महाराष्ट्रातील तिसरे भव्य मंडपम एस्क्पो प्रदर्शन दि.०७ ते ९ जानेवारी या तिन दिवसांत शिर्डी शहरातील निमगांव ग्रामपंचायतच्या सप्ताह मैदानात आयोजित करण्यात आले आहे.

या भव्य एक्स्पो प्रदर्शन सोहळ्याचा उद्घाटन शुभारंभ राज्याचे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न होणार असून अध्यक्षस्थानी दुग्धविकास व ऊर्जामंत्री अतुल सावे यांची उपस्थिती राहणार आहे. तसेच या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ, विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, मंत्र रामगिरी महाराज, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, ऑल इंडिया टेंन्ट डिलर्स वेल्फेअर ऑर्गनायझेशन प्रेसिडेंट विपुल सिंघल, जनरल सेक्रेटरी करतारसिंग कोचर, प्रभारी विजयसिंह परदेशी, ट्रेझरर प्रिन्स रतनानी, ऑलटेंन्ट डिलर्स वेल्फेअर ऑर्गनायझेशनचे जिल्हाध्यक्ष सुनील बारहाते, आदी मान्यवरांसह राज्यातील सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहाणार असल्याचे ऑल इंडिया टेंन्ट डिलर्स वेल्फेअर ऑर्गनायझेशन प्रभारी अध्यक्ष विजयसिंह परदेशी यांनी सांगितले.

सदरच्या एक्स्पो प्रदर्शनात मंडप डेकोरेटर्सच्या देशातील सुमारे साडेचार हजार मालक, चालक यांनी सहभाग नोंदविला आहे. यामध्ये विवाह सोहळ्यात उपयोगी पडणारे लाईट डेकोरेट, सजावटीसाठी लागणारे साहित्य, टेंन्ट, अद्यावत साऊंड सिस्टीम, टेबल, खुर्ची, सोफे, केटरींगचे साहित्य अशा शेकडो प्रकारच्या साहित्याचा समावेश आहे. मुंबई, कोल्हापूर, शिर्डी आदी ठिकाणी एक्सपोचे प्रदर्शन करण्यात आले असून आता पुन्हा शिर्डीचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे.

तीन दिवसांत राज्यातील कानाकोपऱ्यातून सुमारे एक लाखापेक्षा अधिक नागरिक हजेरी लावणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. शिर्डीत देशविदेशातून लाखों भाविक दाखल होत असतात त्या अनुषंगाने सदरचे भव्य दिव्य मंडपम एक्स्पो प्रदर्शन श्री साईबाबांच्या शिर्डीत भरविण्यात आले असल्याचे सांगितले. या प्रदर्शनात भव्य दिव्य असे अद्यावत व आकर्षक शामियाने मंडप उभारण्यात आले आहे. तसेच देशातील मंडप डेकोरेटर्स मालक यांनी देखील सहभाग घेतला आहे.
