गंगथडी ज्वारीचे कोठार इतिहास जमा

शेवगाव प्रतिनिधी, दि. १७ : एकेकाळी गंगथडीचा हा परिसर ज्वारीचे कोठार म्हणून प्रसिद्ध होता. या परिसरात एकदा पेरणी केल्यानंतर काढणीलाच गेले तरी  येथील खळवाडीत ज्वारीच्या रासी लागत. याकाळी घरच्या दावणीच्या गोधनाचे शेणखतावर पिके यायची त्यामुळे येथील भुसाराची चवही न्यारी होती. एकरी उत्पन्नाचे प्रमाणही समाधानकारक होते.

घरोघरी बळदे होती, ही कोठारे भरून उर्वरित माल शेवगाव कृषी उत्पन् बाजार समितीत पाठविला जायचा. या मालाचा डंका राज्यभर होता. त्यामुळे शेवगाव बाजार समितीतील गंगथडीची ज्वारी राज्यभरात पाठविती जायची. तेव्हा बाजार समितीत दिवसाकाठी किमान हजार किंटल ज्वारी व आठशे नऊशे क्विंटल गव्हाची आवक व्हायची.

मालाचे वजन झाले की लगेच त्याचे पैसे देण्याचा समितीचा लोकनेते मारुतराव घुले पाटील यांनी घालून दिलेला पायंडा होता. तरीही अनेक शेतकऱ्यांचे पैसे व्यापारी पेढीवरच पडून असत असा सुबतेचा काळ होता. आज ही परिस्थिती राहिली नाही गेल्या एप्रिल ते डिसेंबर २०२४ या संपूर्ण कालावधीत बाजार समितीत अवघ्या ५१ हजार ५२५ क्विंटल  भुसार मालाची आवक झाली आहे. एवढी आवक त्याकाळी १५ दिवसाच्या आत व्हायची. तेव्हा परिसरात घरोघरी ज्वारीची भाकरी असायची. चूलीवरील भाकरीचे अप्रूप नसायचे कारण बहुतेकांच्या घरी चूलीवरीलच भाकरी असायच्या, गहू खाणे श्रीमंतीचे लक्षण मानल जाई.

गव्हाची पोळी कधी काळी पाहूणे आल्यावर वा सणावाराच्या दिवशी व्हायची. आज ही परिस्थिती बदलली आहे. आज ज्वारीची भाकरी दूर्मिळ झाली असून  येथे गहू पिको न पिको रेशनवर  गव्हाची आवक मोठ्या प्रमाणात  होत असल्याने  समान्यांच्या घरात देखील दररोज गव्हाचीच पोळी  होत असते.

       परिसरतील भूसाराची कोठारे असलेल्या गावांची हजारो हेक्टर जमिन जायकवाडीच्या धरणात बुडाली. कापूस कांदा उडीद हरभरा सोयाबीन व ऊस अशा नगदी पिकाकडे शेतकरी वळला. त्यामुळे हा बदल झाला एकेकाळी येथून रोज राज्यभर भुसार जायचा, मात्र आज थेट परराज्यातून शेवगाव बाजार समितीत भूसार माल विक्रीसाठी येत आहे. परवाच मध्यप्रदेशातील खांडवा येथून ११ टन गहू आला. त्याला तीन हजार ६०० रुपये क्विंटलचा भाव मिळाला. तर गुजराथमधून बाजरीची आवकही आधून मधून होत असते. 

Leave a Reply