शहरातील बेकायदा कत्तलखाने करणार उध्वस्त – मुख्याधिकारी जगताप

 कोपरगाव प्रतिनिधी, दि. २४ : शहरातील आयशा काॅलनी, संजयनगर, हाजी मंगल कार्यालय परिसरात बेकायदा कत्तलखाने कोणाच्या सहकार्याने चालतात.‌ घरात गोवंश जनावरांची बेसुमार कत्तल करून  रक्ताचे पाट वाहणाऱ्या परीसरावर पालीका प्रशासन या पुढे करडी नजर ठेवून बेकायदा कत्तलखाने आढळल्यास संबधीतावर स्वतः कारवाई करुन कत्तलखाने जमीनदोस्त करणार असल्याची माहीती  खुद्द मुख्याधिकारी सुहास जगताप यांनी दिली.

 शहरातील बेकायदा चालणारे कत्तलखाने व गोमांसची होणारी विक्री यावर लोकसंवादने प्रशासनाचे लक्ष वेधले होते. गोवंश  जनावरांची शहरात बेसुमार होणाऱ्या कत्तली व कत्तलखाने बंद करण्याची मुख्य जबाबदारी पालीका प्रशासनाची सर्वात जास्त आहे. हे लोकसंवादने दाखवून दिल्याने अखेर मुख्याधिकारी सुहास जगताप यांनी जबाबदारीला बांधील राहुन  शहरातील अवैध कत्तलखाने त्वरीत बंद करण्याबरोबर पुन्हा गोवंश जनावरांची कत्तल होणार नाही व नागरी वस्तीत रक्तामुळे घाणीचे साम्राज्य पसरणार नाहीत याची दक्षता घेण्याचे कायमस्वरूपीचे नियोजन केल्याचे सांगितले.

यावेळी ते म्हणाले की, ज्या भागात बेकायदा जनावरांची कत्तल होईल त्या भागात काम करणारे  स्वच्छता  विभागाचे मुकादम  यांना जबाबदार धरुन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल. संबंधीत मुकादमाला कत्तल खाना किंवा गोमांस विक्री होत असल्याचे निदर्शनास आले आणि त्याने पालीका प्रशासनाला कळवले नाही तर त्याच्यावर कारवाई करणार.

तसेच कत्तलखाना असलेल्या जागेची नगररचना विभागाच्या माध्यमातून रितसर चौकशी करुन ती इमारत कायमची उध्वस्त होईल अशी व्यवस्था करणार आहे. कोणाच्या घरी जावून झाडाझडती घेण्याचा अधिकार पालीका  प्रशासनाला नसला तरी आता पोलीसांच्या मदतीने कारवाई करणार. केवळ गटारीत रक्त जरी आलेले दिसले तर संबंध परिसराची झाडाझडती घेवून कारवाई करण्याची यंत्रणा सज्ज ठेवणार आहे.

 सध्या शहरातील मटन मार्केट बंद ठेवण्यात आले आहे. म्हैसवर्गीय जनावरांची कत्तल करण्यासाठी रितसर असलेला पालीकेचा कत्तलखाना सध्या बंद ठेवण्यात आला आहे. त्या ठिकाणीचे सीसीटीव्ही कॅमेरे चालु करण्यात आले आहे. पालीकेचा  कत्तलखाना बंद ठेवल्याने मांस विक्री करणाऱ्यांची कोंडी झाली आहे.

जर आता कोणी मांस विक्री करताना आढळले तर ते बेकायदा कत्तलखान्यात कत्तल करून मांस विक्री केल्याचे सिद्ध होईल. येत्या दोन दिवसांत रितसर परवाना असलेल्या मांस विक्रेत्यांची बैठक घेवून योग्य त्या सुचना देत नियम अटीवर पालीकेचा कत्तलखाना सूरू केला जाईल अन्यथा कत्तलखाना बंद ठेवला जाईल असेही मुख्याधिकारी सुहास जगताप यांनी सांगितले.

 आता केवळ बोलुन नाही तर कारवाईचा बडगा उचलणार आहे.  म्हैसवर्गीय मटन विक्रेत्यां बरोबर  शहरातील इतर मटन, चिकन विक्रेते यांच्यावरही कारवाई करणार आहे.  चिकट, मटन, मच्छी विक्रेते हे टाकाऊ मटन व त्यांचे घाण साहित्य कुठेही रस्त्याच्या कडेला, गटारीत, नाल्यात, मोकळ्या मैदानात व काटवणात  टाकतात त्यामुळे मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे. नागरीकांचे आरोग्य धोक्यात येवू नये यासाठी पालीका प्रशासन योग्य ती खबरदारी म्हणून चिकन, मटन, मच्छी विक्रेत्यांना नोटीसा पाठवणार आहे. जे विक्रेते टाकाऊ कचरा पालीकेच्या नेमुन  दिलेल्या गाडीत  टाकणार नाहीत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याची मोहीम सुरु करणार असल्याचे सांगितले

 पालीका प्रशासन आता खडबडून कामाला लागले आहे. नागरीकांमध्ये पालीका प्रशासना बद्दल सध्या नाराजीचा सूर आहे. शहरातील स्वच्छता, आरोग्य, पाणी, रस्ते,  धुळ, बेकायदा होणारे व्यवसाय, बॅनर, प्लास्टिक विक्री, रस्त्यावरील अतिक्रमणे यावर पालीका  कोणतीच धडक कारवाई करत नसल्याने शहरातील नागरीक ञस्त आहेत. 

Leave a Reply