कोपरगाव नगरपालीकेची प्लास्टिकच्या विरोधात कारवाई

 शहरातील प्लास्टीक विक्रेत्यांची चिंता वाढली

कोपरगांव प्रतिनिधी, दि. २४ : कोपरगाव नगरपालीकेने श्रीरामपूर येथील प्लास्टिक विक्रेत्याला त्यांच्या गाडीसह पकडल्याने कोपरगावच्या प्लास्टिक विक्रेत्यांची चिंता वाढली आहे. दोन दिवसांत पालीकेच्या पथकाने बाजारपेठेतील दुकानदारांची झाडाझडती घेत शेकडो किलो प्लास्टिक ताब्यात घेतले आहे अशी माहीती आरोग्य विभागाच्या अभियंत्या रुपाली भालेराव व आरोग्य निरीक्षक सुनिल आरण यांनी दिली.

अधिक माहिती देताना ते म्हणाले की, सदर कारवाई मुख्याधिकारी तथा प्रशासक सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पाणीपुरवठा व स्वच्छता अभियंता सौ. रुपाली भालेराव व प्र.आरोग्य निरीक्षक सुनिल आरण, मनोज लोट, रमेश घोरपडे, रविंद्र दिनकर, विजय डाके, रणधीर तांबे, योगेश कोपरे, अरुण फाजगे, पवन हाडा, सतीष साबळे, राहुल अवघडे, रविंद्र तुजारे, राजेंद्र लोंढे, अजय हाडा, संजय रीळ, सतीष निंदाणे, कवलजित लोट, शिवाजी पारधे आदींच्या पथकाने गुरुवारी  शहरातील धारणगाव रोड परिसरातील दुकानांची झाडाझडती  घेतली,असता १५ दुकानातील ३० ते ३५ किलो प्लास्टिक पकडले.

शुक्रवारी अशीच कारवाई सुरु असताना खुले नाट्यगृहा जवळील एका व्यापाऱ्याने थेट श्रीरामपूर येथील गोपाल खटोड रा श्रीरामपूर यांच्याकडून  शंभर किलो प्लास्टिकच्या वस्तू  गाडी नंबर –  एम एच १७ बी डी ३०८५ मधून सकाळी  १० वाजता बोलावली त्यात प्लास्टीच्या विविध वस्तू अर्थात प्लास्टीकच्या  पिशव्या, ग्लास, द्रोन, पञवाळ्यासह अनेक प्लास्टीकच्या साहीत्याने भरलेला टेम्पोमध्ये आणला हि माहिती पालीकेचे अधिकारी व त्यांच्या पथकाला समजताच संबंधीत टॅम्पो ताब्यात घेवून त्यावर दंडात्मक कारवाई केली.‌

सिंगल युज प्लास्टिक बंदीच्या अनुषंगाने केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सुचनेनुसार आज मुख्याधिकारी तथा प्रशासक सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनानुसार पाणीपुरवठा व स्वच्छता अभियंता रुपाली भालेराव व आरोग्य निरीक्षक सुनिल आरण यांच्या पथकाने कारवाई केल्याची माहिती कळताच शहरातील प्लास्टीक विक्रेत्यांची माल लपविण्यासाठी पळापळ सुरु झाली. 

 बाजारतळ येथे एका टेम्पोमध्ये प्लास्टिकची विक्री करत असल्याचे आढळले. त्यावेळी या ठिकाणी तपासणी करण्यात येऊन सदरील टेम्पोमधील सर्व बंदी असलेले कॅरीबॅग, प्लॅस्टिकचे ग्लास, प्लास्टिक डिश इ. जप्त करण्यात आलेले आहे. सदर टेम्पोमध्ये जवळपास ९०-१०० किलो प्लास्टिक आढळलेले असून त्याच्या मालकाला पाच हजारांचा दंड ठोठावण्यात आला.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सुचनेनुसार सिंगल युज प्लास्टिक बंदीच्या अनुषंगाने विशेष अभियान घेण्याबाबत राज्यातील सर्व नगरपरिषदांना कळविण्यात आलेले होते. त्यानुसार कोपरगाव नगरपरिषदेने दि. २३ जानेवारी रोजी शहरातील धारणगाव रोडवर व तसेच इतर भागात असणारे फळ विक्रेते, चिकन मांस विक्रेते, स्वीट मार्टस तसेच हॉटेल्स इ. वर कार्यवाही करून त्यांच्याकडून जवळपास अंदाजे ३०-३५ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे.  

शासनाने सिंगल यूज प्लॅस्टिकवर बंदी घातलेली असतानादेखील शहरात विविध ठिकाणी सर्रास वापर होत आहे, यामुळे नगरपरिषदेने प्लॅस्टिकबंदीविरोधात धडक कारवाई सुरू केली आहे. अशाप्रकारची कारवाई येथून पुढे कायम राबविण्यात येणार असून शहरातील दुकानदारांनी सिंगल युज प्लास्टिकचा वापर करू नये असे आवाहन मुख्याधिकारी तथा प्रशासक सुहास जगताप यांनी केले आहे.

 नगरपालीकेच्या पथकांची शहरात प्लास्टिक विक्रेत्यांवर कारवाई करीत छोट्या छोट्या व्यापाऱ्यांची झाडाझडती घेत होते तर दुसरीकडे प्लास्टिक विक्रीचे मोठे विक्रेते खुलेआम विक्री करीत होते. पालीकेच्या अधिकाऱ्यांना माहीत आहे सर्वात मोठे व्यापारी कोण आहेत तरीही हातगाड्या व किरकोळ व्यापाऱ्यांची झडती घेतली कागदावर कारवाई  केली. परंतु  पालीकेच्या पथकाने बड्या व्यापाऱ्यांकडे डोळेझाक करीत मोठ्या प्लास्टिक विक्रेत्यांना बळ दिले का? असा प्रश्न  उपस्थित होतोय.