अंगणवाडी ताईंचे काम यशोदा मातेसारखे – नितिनराव औताडे 

पोहेगावात आरंभ पालक मेळाव्याच्या आयोजन 

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २७ :  हल्ली माता पालक मुलांचे भविष्य चांगले घडवण्यासाठी धावाधाव करत पैसे कमविण्यासाठी जास्त लक्ष देत आहे. झिरो ते तीन व सहा वर्षातील बालक सुदृढ बनवण्यासाठी अंगणवाडी सेविका मदतनीस सोबत पालकांची ही जबाबदारी आहे. याच वयात मुलांना संस्कार होतात.

कृष्णाला जन्म देवकी मातेने दिला. कृष्णाचे संगोपन यशोदे मातेने केले. दूध ताक दह्याबरोबरच संस्काराची शिदोरी कृष्णाला मिळाली. अंगणवाडीतील मुले ही बाल कृष्णाप्रमाणेच असून अंगणवाडी ताईंचे काम यशोदा मातेसारखे आहे असे प्रतिपादन शिवसेना जिल्हाप्रमुख नितीनराव औताडे यांनी केले.

ते कोपरगाव तालुक्यातील पोहेगांव येथे आरंभ पालक मेळाव्यात पोहेगांव वर रांजणगाव देशमुख अंगणवाडी केंद्रातील सेविका व पालकांना मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी महिला बाल प्रकल्प विकास अधकारी रूपालीताई धुमाळ, सुपरवायझर लता भेंडेकर, उपसरपंच अमोल औताडे, चांदेकसारे चे उपसरपंच सचिन होन, पोहेगांव रांजणगाव देशमुख केंद्रातील अंगणवाडी सेविका मदतनीस माता पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

यावेळी रूपाली धुमाळ यांनी सांगितले की, पाया भक्कम असला तर इमारत दिमाखात उभी राहते. आपला देश महासत्तेकडे वाटचाल करत असून नागरिकांचा विकास झाला पाहिजे हे उद्दिष्ट ठेवून झिरो ते तीन वयोगटातील बालकांसाठी व गरोदर मातेसाठी महिला बाल प्रकल्प विकास अंतर्गत विविध प्रकारे मार्गदर्शन केले जाते. सशक्त बालक उद्याचे भविष्य असल्याचे त्यांनी सांगितले.

दोन्ही केंद्रातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी विविध प्रकारचे खाद्यपदार्थाचे स्टॉल लावले होते. पालकांना आपल्या बालकांचे संगोपन कशा प्रकारचे करायचे याचे प्रत्येक स्टॉलवर मार्गदर्शन करण्यात येत होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गवळी यांनी केले, तर आभार लता भेंडेकर यांनी मानले.