शेवगाव प्रतिनिधी, दि. २८ : महाराष्ट्र राज्य पक्षिमित्र संघटना आणि येथील न्यू आर्ट्स, कॉमर्स अॅन्ड सायन्स महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने १ व २ फेब्रुवारीला ३७ वे महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलन आयोजित करण्यात आले आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुरेश भट गोसावी, यांचे हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार असून नाशिकचे पक्षिमित्र संघटनाचे सहसंघटक डॉ. अनिल माळी, जागतिक छायाचित्रकार बैजू पाटील, अहिल्यानगरचे उपवन संरक्षक धर्मवीर सालविठ्ठल (भा.व.से.), जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सचिव अॅड. विश्वासराव आठरे पाटील, पक्षिमित्र संघटनाचे कार्यवाहक डॉ. गजानन वाघ आदि मान्यवर यावेळी उपस्थित रहाणार असल्याची माहिती संमेलनाचे स्वागत अध्यक्ष बापुसाहेब भोसले यांनी दिली.
संमेलनाच्या प्रारंभी वृक्ष दिंडी आणि ग्रंथ दिंडी काढण्यात येणार आहे. यावेळी छायाचित्र प्रदर्शनाचेही आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी दुपारच्या प्रथम सत्रात परभणीचे माणिक पुरी यांचे पाणपक्ष्यांशी जडले नाते डॉ. सुधाकर कुऱ्हाडे यांचे पाणथळी: धोके आणि संवर्धन या विषयावर, वर्ध्याचे राहुल वकारे यांचे वर्धा जिल्ह्यातील पाणथळी आणि पक्षी या विषयावर, तसेच धुळे जिल्हा पाणथळी: २०१४ ते २०२४ दशकातील बदल एक दृष्टीक्षेप,
अकोला येथील डॉ. मिलिंद शिरभाते यांचे पाणथळी पक्षी संवर्धन आणि NEP २०२० या विषयावर, अमरावतीचे डॉ. अश्विन लुंगे यांचे अप्पर वर्धा जलाशयातील पाणपक्ष्यांची वीण आणि धोके या विषयावर, रवींद्र वामनाचार्य यांचे भारतीय टपाल तिकीटांवर पाणपक्षी या विषयावर सादरीकरण होणार आहे. संमेलनाचे औचित्य साधून महाराष्ट्र पक्षिमित्र संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभाही होणार आहे.
रविवारी सकाळी जायकवाडी येथे पक्षी निरिक्षण सहल होणार असून त्यानंतर दुपार डॉ. अनिल माळी यांचे नाशिक जिल्ह्यातील पाणथळी आणि पक्षी जीवन या विषयावर, अमरावतीचे डॉ. गजानन वाघ यांचे सातपुड्याच्या नदी परीसंस्थेतील मलबार पाईड हॉर्नबील या विषयावर, अविनाश कुबल मुंबई महाराष्ट्रातील पाणथळी आणि पक्षी निरिक्षण स्थळांचा अभ्यास आणि नोंदणी, शरद आपटे सांगली, पाणपक्षी त्यांचा विणीचा हंगाम आणि त्यांचे आवाज, अमरावतीचे प्रतिक चौधरी यांचे तापी नदीतील नदी टिटवीची सद्यस्थिती, कपिल दैवत यांचे गवताळ व पडीक जमीन भागातील पक्षी जैवविविधता या विषयावर साररीकरण होणार आहेत.
संमेलनाचा समारोप संस्थेच्या खजिनदार ॲड. दीपलक्ष्मी म्हसे यांचे अध्यक्षतेखाली कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ज्ञानदेव म्हस्के यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे. या प्रसंगी आपल्या परिसरातील पक्षी या विषयावर घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस दिली जाणार असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पुरुषोत्तम कुंदे यांनी दिली.