रोहित्र वारंवार नादुरुस्त होत असल्याने शेतकरी वैतागले

शेवगाव प्रतिनिधी, दि. ७ : येथील नेवासा रस्त्यावरील नांगरे वस्ती व लांडे वस्ती परिसरातील शेतीचे रोहित्र वारंवार नादुरुस्त होत असल्याने परिसरातील शेतकरी वैतागले आहेत. सध्या रबीच्या गहू, मका, ज्वारी, तसेच उस आदी पिकांसाठी पाण्याची नितांत आवश्यकता असतांना या परिसरातील रोहित्र दर आठ ते दहा दिवसांतून वारंवार नादुरुस्त होण्याच्या घटना घडत आहेत. सोमवारी दुपारच्या वेळी या रोहीत्राने अचानक पेट घेतला. याबाबत वीज वितरण कंपनीच्या शहर व तालुका कार्यालयातील जबाबदाराना वारंवार निवेदन देवूनही याबाबत सकारात्मक निर्णय होत नसल्याने शेतक-यातून संताप व्यक्त होत आहे.

        परिसरातील शेतक-यांनी मंगळवारी महावितरणच्या कार्यालयात जावून संबधित अधिका-यांना याबाबत निवेदन दिले आहे. वारंवार नादुरुस्त होणाऱ्या या विजेच्या रोहित्राची  दुरुस्ती व्हावी किंवा हे रोहित्र बदलून मिळावे अशी मागणी केली असून येत्या आठवडा भरात सकारात्मक निर्णय झाला नाही तर वीज वितरण च्या कार्यालयासमोर शेतक-यांचे ठिय्या आंदोलन पुकारण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

   यावेळी संभाजी लांडे, दत्तात्रय पांडुरंग लांडे, जयप्रकाश  लांडे, राजाभाऊ शिंदे, प्रकाश शिंदे, रावसाहेब मगर, बाळासाहेब बडधे, आदिनाथ बडधे, बाबासाहेब नांगरे, राहुल मालुसरे, भगवान मालुसरे, राजेंद्र नांगरे, विक्रम बडधे, सतीश वाणी, महेश लांडे, आण्णासाहेब गोरडे आदींसह परिसरातील शेतकरी उपस्थीत होते.