शेवगाव प्रतिनिधी, दि. १७ : जीवनातील व्यथा दूर सारून शांती निर्माण करून जीवन सुखमय करण्यासाठी राम कथा असल्याचे प्रतिपादन रायणाचार्य रामराव महाराज ढोक यांनी केले. येथील राजीव राजळे मित्र मंडळाने आयोजित केलेल्या श्री राम कथा सप्ताहात ते कथा निरूपण करत होते. यावेळी महाराज म्हणाले, रामायणामध्ये प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मिळते.
मंथराच्या नियोजनावरून कुटील डाव कसे टाकायचे येथ पासून एक पत्नी, एक वचनी, सदवर्तनी मर्यादा पुरुषोत्तम श्री प्रभूरामचंद्रापासून आपल्या उद्धारासाठी कोणते गुण घेणे आवश्यक आहे. अशा विविध प्रश्नांची उत्तरे मिळतात, असे सांगून पद वाईट नसते तर ते प्राप्त झाल्यावर निर्माण होणारा मद वाईट असतो. सत्ता, संपत्ती वाईट नाही. मात्र सत्ता संपत्तीचा मद वाईट आहे.
गरिबांची अडचण दूर करून त्यांची सेवा करण्यासाठी सत्ता संपत्तीचा उपयोग केला तर तो केव्हाही चांगलाच. प्रकाशात आपली सावली आपोआप साथ करेल. निमंत्रणा शिवाय कोठे जाऊ नये व कोठे जाण्यासाठी निमंत्रणाची वाट पाहू नये हे ही महाराजांनी सोपे करून सांगितले. महाराज म्हणाले मित्र, आई – वडील व गुरुगृही जाण्यासाठी निमंत्रणाची वाट पाहू नये तर कुणाच्याही लग्नात निमंत्रणाशिवाय जाऊ नये. पती-पत्नी संसार रथाची दोन चाके असून ती समान दर्जाची आहेत.
प्रारंभी रामायणाचार्य रामराव महाराज, आमदार मोनिका राजळे, युवा कार्यकर्ते कृष्णा राजळे, राजीव राजळे मित्र मंडळाचे माजी नगरसेवक सागर फडके, महेश फलके, मनसे तालुकाध्यक्ष गणेश रांधवणे आणि सहकार्यानी ग्रंथ पूजन करून मर्यादा पुरुषोत्तम श्री प्रभू रामचंद्राच्या तसेच स्वर्गीय राजीव राजळे यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. त्यानंतर आरती करून रामकथा सुरु झाली.
श्री रामकथेसाठी उभारण्यात आलेल्या भव्य दिव्य शामियाना, बैठक व्यवस्था व उत्तम प्रकाश व साऊंड सिस्टीमच्या नियोजनाबद्दल आयोजक राजीव राजळे मित्र मंडळाचे ढोक महाराजांनी, ‘एक ऐश्वर्य संपन्न नियोजन’ अशा शब्दात कौतूक केले. सध्या नवरात्रोत्सव सुरु आहे. परिसरात देवी माहत्म्य मोठे असून बहुसंख्य महिलाचे उपवास व्रत वैकल्ये चालु असूनही भाविकांनी कथेच्या पहिल्याच दिवशी रेकॉर्ड ब्रेक गर्दी केली. महिलांचे पूर्ण दालन खचाखच भरले होते.