शिर्डी प्रतिनिधी, दि. १२ : शिर्डी शहरात दुहेरी हत्याकांडाच्या निषेधार्थ शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या निषेध ग्रामसभेला २४ तास पूर्ण होत नाही तोच ग्रामस्थ आणि पोलिसांच्या नाकावर टिचून पुन्हा एकदा ३२ वर्षीय प्राध्यापकावर पाच ते सहा गुंडांनी धारदार शस्त्राने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला असल्याची घटना शिर्डी शहरात घडली असून शहरांत खळबळ उडाली आहे.

दरम्यान याबाबत माहिती अशी की, शिर्डी शहरातील कनकुरी रोड लगत असलेल्या श्रीराम नगर भागातील रहिवासी असलेले सादिक शौकत शेख, वय वर्ष ३२ धंदा नौकरी, हे नेहमीप्रमाणे ड्युटी करून सायंकाळी आपल्या आईला मस्जिद शेजारी भाजीपाला आणि किराणा दुकानांमध्ये मदत करत असतांना अचानक पाच ते सहा गुंडाच्या टोळीने सादिक यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून आरोपी पसार झाले आहे.

यामध्ये त्यांच्या पोटावर दोन तर डोक्यावर एक असे एकूण तीन वार करण्यात आले आहे. घटनेनंतर त्यांना उपचारासाठी श्री साईबाबा संस्थानच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यावेळी त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. घटनेची माहिती समजतात शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

शिर्डी शहरात आठ दिवसापूर्वी दोघा आरोपींनी साई संस्थानच्या दोन कर्मचारी यांची निर्घुण हत्या केली होती. तर एक हाफ मर्डर केला होता. या घटनेच्या निषेधार्थ सोमवारी शिर्डी ग्रामस्थानी निषेध ग्रामसभा घेऊन शहरातील गुन्हेगारी चे समूळ उच्चाटन झाले नाही तर पोलीस स्टेशनला टाळी ठोकू असा इशारा देण्यात आला होता. ग्रामसभेला २४ तास उलटत नाही तोच पुन्हा एकदा पाच सहा गुंडांनी मिळून त्यांच्या दुकानावर धुमाकूळ घालत हाफ मर्डर केला आहे.मात्र यामागील कारण समजू शकले नाही.

घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत तपास चक्रे फिरवली आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे कामकाज सुरू असून या घटनेतील एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजले असून मात्र रात्री उशिरापर्यंत आरोपींबाबत पोलिसांनी कुठल्याही प्रकारची माहिती न दिल्याने पोलिसांच्या तपासानंतर या गुन्ह्यातील आरोपी कोण याचे चित्र स्पष्ट होईल. शिर्डीत सातत्याने वाढत असलेली गुन्हेगारी शिर्डी शहरातील ग्रामस्थ तसेच भाविकांच्या दृष्टीने चिंताजनक बाब होत चालली असून पोलीसांना देखील शिर्डीतील वाढत असलेली गुन्हेगारी डोकेदुखी ठरली आहे.
