समता स्कूल मध्ये सेमी ऑलिम्पिक साईजच्या स्विमिंग पूलचे उद्घाटन

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २० : पूर्वी शिक्षण घेत असताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते, परंतु आज तुम्हाला काकांच्या मार्गदर्शनाखाली कोणत्याही प्रकारची अडचण न येता समता इंटरनॅशनल स्कूलच्या माध्यमातून तुम्हाला आंतरराष्ट्रीय गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत आहे. तसेच आम्हाला माहीत नसलेले देशातील, परदेशातील विविध क्रीडा प्रकारांची ओळख तुम्हाला करून देत त्यात करिअर करण्याची संधी समता तुम्हाला देत आहे. त्यामुळे ही तुमच्यासाठी संधी नसून सुवर्णसंधी आहे. या संधीचा फायदा सर्वच विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे मत समता चॅरिटेबल ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शहा यांनी सेमी ऑलिंपिक साईजच्या स्विमींग पुल उद्घाटनाप्रसंगी व्यक्त केले.

समता इंटरनॅशनल स्कूलमध्ये आज (दि.१९) रोजी प्रमुख पाहुणे समता चॅरिटेबल ट्रस्टचे उपाध्यक्ष श्री.जितेंद्र शहा, आंतरराष्ट्रीय स्विमिंग सुवर्णपदक विजेत्या डॉ. सुषमा आचार्य, डॉ.राजेश्वरी पवार यांच्या हस्ते स्विमींग पूलचे उद्घाटन फीत कापून करण्यात आले. प्रसंगी ते बोलत होते.

तसेच समताच्या २०२२-२३ च्या वार्षिक क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन ही प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते क्रीडा विभागाचा झेंडा फडकवत आणि मशाल पेटून करण्यात आले. बॅडमिंटन, टेनिस, क्रिकेट, स्विमींग , हॉकी, बास्केटबॉल , रनिंग, बुद्धिबळ आदी क्रीडा प्रकारांचा समावेश सलग तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धांमध्ये असणार आहे.

प्रमुख पाहुण्यांचा परिचय समता इंटरनॅशनल स्कूलचे उपप्राचार्य समीर आत्तार यांनी करून दिला. प्रमुख पाहुणे जितेंद्र शहा यांचा सत्कार समता इंटरनॅशनल स्कूलचे अध्यक्ष काका कोयटे यांनी केला. प्रमुख पाहुणे डॉ. सुषमा आचार्य, डॉ.राजेश्वरी पवार यांचा सत्कार मॅनेजिंग ट्रस्टी सौ.स्वाती कोयटे यांनी केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष काका कोयटे यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना काका कोयटे म्हणाले की, समता स्कूलच्या विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा प्रकारात तालुका, जिल्हा, राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर कौतुकास्पद कामगिरी केली आहे. सुवर्ण, कास्य ब्रांझ यांसारख्या पदकांनाही मोठ्या प्रमाणात गवसणी घातली आहे. क्रीडा क्षेत्रातील त्यांचे हे गुण ओळखून त्यांना या पुढे ही विविध क्रीडा प्रकारांमध्ये समताचा झेंडा फडकवता यावा आणि स्वतःच्या करिअरला नवीन दिशा देता यावी हा आमचा मुळ उद्देश आहे. स्विमिंग या क्रीडा प्रकारामध्ये समता स्कूलच्या क्रीडा शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली समता स्कूलचे विद्यार्थी विविध स्तरावर यश संपादन करतील. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन समीर अत्तार यांच्या मार्गदर्शनाखाली इ.१० वीतील अनय बोरनारे व सृष्टी कालेकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार इ.८ वीतील नूतन लाहोटी हिने मानले.