
कोपरगांव प्रतिनिधी, दि. १७ : शहरासह ग्रामीण भागात पोस्ट खात्याच्या प्रत्येक सेवेत आधुनिकता आली आहे. भौतिक सुविधांच्या गर्तेत मानवाचे जीवन धावपळीचे झाले आहे. तेंव्हा पोस्टाच्या ग्रामीण डाक विमा योजनेत नागरिकांनी सहभाग वाढवावा, कर्त्या व्यक्तीचे काही बरे-वाईट झाले, तर संपूर्ण कुटूंब उद्धवस्त होते. त्यात जीवन विमा आधार ठरतो, डाक विमा पॉलिसी कुटूंबाचे जीवन बदलून टाकते, असे प्रतिपादन श्रीरामपूर डाक अधिक्षक उमेश जनवाडे यांनी केले.

तालुक्यातील शिंगणापूर सब पोस्ट कार्यालय अंतर्गत संवत्सर, लोणकर वस्ती, दहेगाव बोलका, गोधेगाव, करंजी, शिरसगाव, पढेगाव ब्रांच पोस्ट कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा डाक मेळावा नुकताच पार पडला. त्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

प्रारंभी शिंगणापूरचे सब पोस्ट मास्तर रविंद्र परदेशी यांनी प्रास्तविकात पोस्ट खात्याच्या सेवेची माहिती देत शिंगणापूर अंतर्गत असलेल्या ब्रांच पोस्ट कार्यालयास वरिष्ठस्तरावर देण्यात आलेल्या उदिष्ट्याचे सखोल मार्गदर्शन केले. यानिमित्ताने डाक अधिक्षक उमेश जनवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली डाक सहाय्यक प्रसाद तऱ्हाळ यांनी शिंगणापूर सब पोस्ट कार्यालय अंतर्गत विविध पोस्ट कार्यालयात जावून पोस्टाच्या विविध योजनाच्या प्रचार प्रसाराचा आढावा घेतला.

यावेळी डाक सहाय्यक प्रसाद तऱ्हाळ पुढे म्हणाले की, पोस्ट खात्याअंतर्गत पीपीएफ, सुकन्या, डाक विमा, बचत खाते, रिकरींग डिपॉझिट, अपघाती विमा, टर्म डिपॉझिट, आधार सिंडींग, आधार मोबाईल लिंक, बाल आधार यासारख्या विविध योजना असून त्यात सर्वांचा सहभाग वाढवावा. डाक अधिक्षक उमेश जनावडे हे या खात्या अंतर्गत असणाऱ्या सेवा सुविधा तळागाळापर्यंत पोहोचविण्यात सतत कष्ट घेत आहे. पोस्ट अंतर्गत कर्मचाऱ्यांनी शेवटच्या झोपडीत राहणाऱ्या नागरिकांपर्यंत विश्वसनीय पोस्ट सुविधांचा प्रसार करावा.

कोरोना आपत्ती काळात पोस्ट खात्याने दिलेल्या सेवेचा लौकीक झाला आहे. शासनाच्या लाडकी बहीण योजनेतही ग्रामीण भागातील महिलांना पोस्टाने तात्काळ सेवा पुरविलेल्या आहे. पोपटराव सुळ यांनी उपस्थितांचे स्वागत केले. डाक आवेक्षक अर्जुन मोरे यांनी चर्चेत सहभाग नोंदवित पोस्ट खात्याच्या योजनांची माहिती दिली.

याप्रसंगी प्रविण शिंदे, जीवन पावडे, राहुल आढाव, किशोर दिघे, आकाश आढाव, बाळासाहेब आहेर, हौशिराम भिंगारे, अक्रम शेख, शहाबाज, सारिका दहिफळे, आयोध्या काकडे, गायत्री बेलसकर, लक्ष्मण भोकरे, सुनिल कांबळे आदी कर्मचारी उपस्थित होते. शेवटी संवत्सर ब्रांच पोस्ट कार्यालयाचे दत्तात्रय गायकवाड यांनी आभार मानले.
