समन्यायी पाणी वाटपाचा पुन्हा चटका कोपरगाव करांना बसणार?  

धरणं भरली, पण लाभक्षेत्रातील धरणी तापलेली

 कोपरगाव प्रतिनिधी, दि. १४ : तालुक्यासह नगर नाशिक जिल्ह्यातील नागरिकांना धरणं कोणती किती भरली यांची चिंता अधिक असते त्यातही आपल्या लाभक्षेत्रातील धरणापेक्षा जायकवाडी धरणात किती पाणी साठा आहे यावरुन त्यांचे भवितव्य ठरवत असतात. सुदैवाने नगर-नाशिक जिल्ह्यातील नागरिकांना वरदान ठरणारे बहुतांश धरणं भरलेली आहेत. माञ दुर्दैवाने यावर्षी कमी पाऊस पडल्यामुळे वरच्या धरणातून पाणी जायकवाडीत कमी गेल्याने जायकवाडी धरण केवळ ४३ टक्के भरले आहे.

अशातच समन्यायी पाणी वाटप कायद्यानुसार जायकवाडी धरणात कमी पाणी असेल तर वरच्या धरणातून पाणी सोडण्याची तरतूद असल्याने कोपरगाव सह नगर – नाशिक जिल्ह्यातील धरणं जरी भरले असले तरी या भागात पाऊस अतिशय कमी झाला त्यामुळे या भागातील विहीनीं भर पावसाळ्यात तळ गाठलाय. ओढे नाले कोरडे आहेत. शेतातील उभे पीक पाण्याअभावी जळून गेले. आज पावसाळ्यात ही अवस्था झाली आहे. जर लाभक्षेत्रातील धरणाचे पाणी जायकवाडीला सोडून  हक्काच्या  धरणातील पाणी कमी केले तर माणसांसह जनावरांच्या पिण्याच्या पाण्या प्रश्न गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे समन्यायी पाण्याचं वादळ आता नगर-नाशिकच्या दाराशी आलंय असं वाटते.

           गेली चार वर्षे सर्वञ मुबलक पाऊस पडल्यामुळे  कोणाला पाण्याची चिंता वाटली नव्हती  त्यामुळे समन्यायी पाणी वाटपाच्या आघाडीवर शांतता होती. आता यावर्षी पुन्हा रणशिंग फुंकले जाण्याची शक्यता दाट आहे. नगर – नाशिकच्या  धरणातील पाणी सोडण्याची मागणी  मराठवाड्यातुन  होत आहे. त्यासाठी आंदोलने होत आहेत, उपोषणे होत आहेत, सर्वपक्षीय परिषदा होत आहेत, शासनदरबारी कैफियत मांडली जात आहे. या पार्श्‍वभूमीवर नगर नाशिक मधील आवाज काहीसा कमी दिसतोय. धरणं भरली पण लाभक्षेञातील धरणी तापलेली आहे. 

            धरणे शंभर टक्के भरली असली तरी लाभक्षेत्रातील परिस्थिती अतिशय भीषण आहे. भर पावसाळ्यात विहीरी कोरड्या पडलेल्या आहेत. पावसाची सरासरी ४५० मिमी असली तरी सरासरीच्या ५० % पेक्षा कमी पाऊस झालेला आहे. यावर्षी पडलेला पाऊस हा थोड्या प्रमाणात तोही विखुरलेल्या स्वरुपात आणि दिर्घकालीन खंडीत स्वरुपात झालेला आहे. त्यामुळे खरीप पिक हातातुन गेली. ओढेनाले न वाहिल्याने भुजलपातळी खालावली आहे. त्यामुळे आगामी रब्बी हंगामाच्या पिकांची  शाश्वती वाटत नाही. जनावरांचा चाराटंचाई तसेच पिण्याच्या पाणी टंचाईचे रौद्ररूप पहावयास मिळते की काय  अशी परिस्थिती उद्भवू शकते. अशा परिस्थितीत जायकवाडीला पाणी सोडले गेले तर  नगर नाशिक करांची दुष्काळाची तीव्रता आणखी वाढेल.

  जायकवाडी  व नगर नाशिक जिल्ह्यातील यावर्षीच्या धरणसाठे संदर्भात अधिक माहिती देताना पाटबंधारे विभागाचे सेवानिवृत्त अभियंता उत्तमराव निर्मळ म्हणाले की, यावर्षी जायकवाडीत मागील शिल्लक १९ टिएमसी व यावर्षी नव्याने आलेले २४ टिएमसी असे ४३ टिएमसी उपयुक्त पाणी साठा उपलब्ध झालेला आहे.  त्यापैकी ६.५ टिएमसी पाणी वापर झाल्याने आजमितीला जायकवाडीत ३६.५ टिएमसी पाणी साठा उपलब्ध आहे.

मेंढेगिरी अहवालाप्रमाणे जायकवाडीत ६५% म्हणजे ५० टिएमसी पाणी असणे अपेक्षित असते. त्या तुलनेत ४३ टिएमसी पाणी उपलब्ध झालेले आहे. मागील काळात आपत्कालीन परिस्थितीत खास बाब म्हणून मृत साठ्यातून ८ टिएमसी पाणी वापरले गेलेले आहे. त्यामुळे कायदा आहे म्हणून पाणी सोडण्याचा आग्रह करणे चुकीचे आहे. विशेषतः यावर्षीची पावसाचे आत्यंतिक टोकाचे वितरण पहाता नगर नाशिकची परिस्थिती सुध्दा प्रत्यक्षात फार बिकट आहे. पाण्याचा काटकसरीने तसेच गरजेनुरूप वापर करण्याशिवाय पर्याय नाही. पाण्याची उधळपट्टी परवडणारी नाही .

         जायकवाडीच्या बाबतीत सन २०१२- १३ मध्ये झालेल्या एका सुनावणीत जायकवाडी फुगवट्यातून उन्हाळ्यात केवळ दोन महिन्यात २.५ टिएमसी पाण्याची चोरी झाल्याचे मा. उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांनी रेकॉर्डवर घेतलेले आहे. विशेष म्हणजे ते जलसंपदा विभागाला त्याचा प्रतिवाद करता आलेला नाही. सन २०१९-२० मधील शासनाने प्रसिद्ध केलेल्या जललेख्यानुसार जायकवाडी प्रकल्पात एक टिएमसी पाण्यात १८५५ हेक्टर क्षेत्र भिजले तर मुळा प्रकल्पात एक टिएमसी पाण्यात ४५७१ हेक्टर क्षेत्र भिजले आहे.

जलसंपदा मापदंडा प्रमाणे एका टिएमसी पाण्यात ४००० हेक्टर क्षेत्र भिजणे अपेक्षित असते. यावरुन हे सिध्द होते की फक्त पाणी साठ्याची टक्केवारी पाहुन समन्यायीची अंमलबजावणी करण्याऐवजी ती पाण्याचा कार्यक्षम वापर आणि सिंचीत क्षेत्र यावर आधारीत पाहिजे. अन्यथा केवळ कायद्यानुसार पाणी घ्यायचे आणि पाण्याची उधळपट्टी करायची हे सर्वथा गैर आहे.

           सद्यपरिस्थितीत १० टिएमसी पाण्याची मराठवाड्यातुन मागणी होत असली तरी कायदा, क्षेत्रीय परिस्थिती, गरज आणि कार्यक्षम वापर याची सांगड घालुन यथायोग्य निर्णय घेणे आवश्यक आहे. मेंढेगिरी अहवाल शासनाने स्विकारलेला नाही. त्यामुळे त्याचा बाऊ करण्यात फारसे कारण नाही. समन्यायी निर्णय राबवताना तोच तो साचेबंदपणा येऊ न देता लवचिकता आणि वास्तवतेचे भान ठेवणे महत्वाचे आहे.

परिस्थिती खरोखर पाणी सोडण्यासाठी असेल तर जनतेतून फारसा विरोध होत नाही. परंतु तशी परिस्थिती नसताना पाणी सोडण्याचा कुणी आग्रह करत असेल तर जनतेत तिव्र असंतोष होणे साहजिक आहे. एकंदरीत या सर्व परिस्थितीजन्य घटकांचा साकल्याने विचार करुन पाणी सोडण्याची भुमिका घेऊ नये अशी नगर नाशिक भागातील लाभधारकांची भावना आहे अशीही माहिती उत्तमराव निर्मळ जलसंपदा विभागाचे सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता उत्तमराव निर्मळ यांनी दिली.

 कोपरगाव सह नगर – नाशिक  जिल्ह्याला  वरदान ठरलेल्या धरणं पुढील प्रमाणे भरलेली आहेत. दारणा, भाम, भावली, वालदेवी, गंगापूर, कश्यपी, गौतमी, कडवा, वागड,करंजवन  हि धरणं शंभर टक्के भरलेली आहेत तर मुकणे – ९५.३० टक्के, वाकी – ९० टक्के, आळंदी – ९८.४ टक्के, भोजापूर – ९१.६९ टक्के  भरलेली आहेत इतर छोट्या  छोट्या धरणात कमी ज्यास्त पाणी साठी आहे. माञ लाभक्षेञातील भू जल पातळी खालावल्याने शेतकऱ्यांना सिंचनासाठी व पिण्यासाठी पाण्याची मागणी गेल्या वर्षीपेक्षा अधिक पटीत असणार त्यामुळे धरणात जरी पाणी असले तरी मागणीच्या तुलनेत पाण्याची कमतरता भासणार आहे.

अशातच जर जायकवाडी धरणात पाणी सोडण्याची वेळ आली तर कोपरगावच्या नागरिकांची पाण्यावाचून हाल बेहाल  होणार. गेल्या वर्षी किमान आठ दिवसांत पिण्यासाठी पाणी मिळत होते. जर धरणातील पाणीसाठा कमी झाला तर किती दिवसाड पाणी मिळेल याचा विचार न केलेला बरं अशी चिंता वाढली आहे. जर वरिष्ठ पातळीवर जायकवाडी धरणातील पाण्याचे योग्य नियोजन केले त्या पाण्याची गळती थांबवली तरच सर्वांना पाणी मिळेल. अन्यथा समन्यायी पाणी वाटपाच्या नावाखाली कोपरगावसह नगर-नाशिक जिल्ह्यातील नागरीकांचा पाण्यावाचुन घसा कोरडा होणार यात शंका नाही.