माजी आमदार घुले बंधू अखेर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात सक्रीय

शेवगाव प्रतिनिधी, दि.२४ : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या सभासद नोंदणी अभियानाचा रविवारी (दि.२३) घुले बंधूच्या व पक्षाचे जिल्हाध्यक्ष अशोक सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य शुभारंभ करण्यात आला. या निमित्ताने गेली अनेक दिवस तळ्यात मळ्यात करणारे माजी आमदार घुले बंधू अखेर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात सक्रीय होत असल्याचे स्पष्ट झाले.

  शेवगाव नेवासा मतदारसंघाचे मा. आमदार डॉ. नरेंद्र पाटील घुले पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तसेच  मा.आमदार चंद्रशेखर घुले आणि जिल्हा अध्यक्ष अशोकराव सावंत, शेवगांव पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील, युवती प्रदेशाध्यक्ष संध्याताई सोनवणे, राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय कोळगे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नंदकुमार मुंडे, महिला जिल्हाध्यक्ष आशाताई निंबाळकर, राष्ट्रवादी जिल्हा कार्यकारणी सदस्य साईनाथ भगत, तालुकाध्यक्ष कैलास नेमाणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये येथील जिल्हा सहकारी बँकेच्या शाखेतील स्व. मारुतराव घुले पाटील सभागृहात ही बैठक संपन्न झाली.

              या प्रसंगी ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे जेष्ठ संचालक काकासाहेब नरवडे, माजी सभापती अरुण पाटील लांडे  पंडितराव भोसले, मन्सूरभाई फारोकी ॲड. अनिल मडके, निवृत्ती  दातीर, ताहेर पटेल, नवनिर्वाचित महिला कार्यकारणी सदस्य सुमैया सय्यद यांच्यासह माजी सरपंच शेवगांव सतीश पाटील लांडे, माहेश्वरी समाजाचे जिल्हाध्यक्ष मनीष बाहेती  यांच्यासह तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुक्याचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  यावेळी माआ चंद्रशेखर घुले यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधतांना पक्षाच्या सदस्य नोंदणी अभियानात शेवगाव तालुक्यातून विक्रमी प्राथमिक सदस्य नोंदणी होईल असा विश्वास व्यक्त केला. तसेच सध्या राबविण्यात येत असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेत विस्थापित झालेल्या छोट्या व्यवसायिकाच्या पुनर्वसनासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे शहरातील शासनाच्या मालकीच्या जागेवर पुनर्वसन करण्यासाठी जागा आणि निधी उपलब्ध करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचा  दिलासा दिला.

राजकारणात मुरब्बी व धक्का तंत्रात माहिर असलेले – घुले बंधू  राष्ट्रवादीच्या विघटन काळात चूप्पी साधून होते. अनेकदा त्यांनी आपली भूमिका एकदा स्पष्ट करावी अशी त्यांच्या कार्यकर्त्यासह  सर्वांची अपेक्षा होती. तरीही पक्ष आणि चिन्ह याचा विचार करू नका. “घुले हाच आपला पक्ष ” हा नारा देत त्यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष लढत दिली. त्यात त्यांचा पराभव झाला असला तरी अपक्ष राहूनही मिळविलेली मते निश्चीत लक्षणिय आहेत. येथे अनेक असणारे  राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी आजही त्यांच्याच समवेत असल्याचे सभासद नोंदणी कार्यक्रमास मिळालेल्या प्रतिसादावरून स्पष्ट झाले.