कोपरगांव प्रतिनिधी, दि. १० : संजीवनी उद्योग समुहाचे संस्थापक, सहकारमहर्षी, शेती, सहकार, सिंचन, बँक, उद्योग, सामाजिक, राजकीय चळवळीचे अभ्यासक माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या पुण्यतिथी ते जयंती सप्ताह तृतीय पुण्यस्मरणानिमीत्त शहरातील संत ज्ञानेश्वरनगर तहसिल कार्यालय मैदानावर दररोज सायंकाळी ७ ते १० या वेळेत संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनांखाली व युवानेते कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या नेतृत्त्वाखाली स्त्रि शक्तीच्या प्रमुख, वारकरी अध्यात्मीक क्षेत्रातील साध्वी, संगीत विशारद ह.भ.प. साध्वी सोनालीदिदी कर्पे यांच्या रसाळ वाणीतुन सालाबादप्रमाणे याही वर्षी रामकथेचे आयोजन करण्यांत आले असुन या कार्यक्रमास सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन सहकारमहर्षी शंकररावजी कोल्हे विचारधारा ट्रस्टचे मच्छिंद्र पा. टेके यांनी केले.

तालुक्यातील शिंगणापुर येथील सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर सोमवारी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यांत आले होते. त्यात माजी सभापती मच्छिंद्र टेके बोलत होते. माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या पुण्यतिथी ते जयंती उपक्रमाचे गेल्या दोन वर्षापासुन आयोजन केले जात असुन यंदाचे हे तिसरे वर्ष आहे.

प्रारंभी माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या प्रतिमेचे उपस्थितांच्या हस्ते पुजन करण्यांत आले. कोपरगांव तालुका औद्योगिक सहकारी वसाहतीचे उपाध्यक्ष केशव भवर यांनी प्रास्तविक केले आणि अमृत संजीवनीचे चेअरमन पराग संधान यांनी आभार मानून कार्यक्रमाची दैंनंदिन रूपरेषा सांगितली.

टेके पुढे म्हणाले की, माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी स्वतःच्या ज्ञानातुन येथील शेतकरी आणि पाण्याच्या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी अनेकवेळा रस्त्यावर उतरून संघर्ष करत शासनास अनेक धाडसी निर्णय घ्यायला भाग पाडले. त्यांनी सात दशकात कोपरगांव आणि परिसराच्या विकासात मोलाची भर घालत संजीवनी सहकारी साखर कारखान्याची कामधेनु निर्माण करून असंख्य संस्थांचे जाळे विणले. शिक्षण क्षेत्रात आज संजीवनीचा जो दबदबा दिसतो तो केवळ त्यांच्यामुळेच आहे.

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रायगडावरील मेघडंबरीची दुरुस्ती तत्कालीन मुख्यमंत्री बॅरिस्टर अ. र. अंतुले यांच्या काळात सरकारची वाट न पाहता माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी स्वतः संजीवनीच्या माध्यमातून केली.

कोपरगांव तालुक्यात जेंव्हा दुष्काळ पडला तेंव्हा लहान मुलांमध्ये निर्माण झालेले कुपोषण दुर करण्यांसाठी जवळके येथे महिनाभर सकस आहार लापशी उपक्रमाचे आयोजन करून मुलांची मोफत वैद्यकिय तपासणी करून त्यांचे पोषण करण्यांवर भर दिला. बी.एस्सी अॅग्री झाल्यानंतर सुटाबुटातील शंकरराव कोल्हे परदेशात कृषी शिक्षणासाठी गेले होते तेथे तत्कालीन पंतप्रधान पंडीत नेहरू यांच्या भगिनी व विदेशी राजदुत विजयालक्ष्मी पंडीत यांची भेट झाली त्यावेळी भारतातील शेती शेतक-यांची स्थिती बदलण्यासाठी मोठे काम करावे लागेल असा सल्ला दिला आणि स्व. शंकरराव कोल्हे यांनी मायदेशाची वाट धरत धोतर, शर्ट व गांधीटोपी या पेहरावात येथील शेतक-यांची सुख-दुःखे दुर केली.

माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांचे चौफेर ज्ञान होते, त्यांनी या भागाचा तसेच कोपरगांव शहर व तालुक्याचा चेहरामोहरा बदलण्यासाठी जाणिवपुर्वक प्रयत्न करत विविध उपक्रम सुरू करून ते तडीस नेले. त्यांची दुसरी आणि तिसरी पिढी माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या कार्याचा वारसा पुढे चालवत आहे.

गोदावरी नदीवर सर्वप्रथम १९८८ मध्ये त्यांनी हिंगणी येथे पहिला कोल्हापुर पध्दतीचा बंधारा बांधुन दाखवत शेती सिंचन करून दाखविले असे सांगुन त्यांनी गेल्या सात दशकात केलेल्या विकासात्मक कार्याची माहिती देत साध्वी सोनालीदिली कर्पे यांच्या रसाळवाणीतुन रामजन्म (१७ मार्च), रामविवाह (१८ मार्च), राम वनवास (१९ मार्च), भरतभेट (२० मार्च), शबरी भेट (२१ मार्च), राम राज्याभिषेक (२२ मार्च), हे रामकथेतील प्रसंगानुरूप हुबेहुबे पात्रे साकारून रामकथा सांगितली जाणार असुन २३ मार्च रोजी त्यांचे काल्याचे किर्तन होवुन महाप्रसाद वाटप करण्यांत येणार आहे तरी भाविकांनी मोठया सख्येने या कार्यक्रमांस उपस्थित रहावे असे आवाहन विचारधारा ट्रस्टच्यावतीने करण्यांत आले आहे. यावेळी विविध संस्थांचे पदाधिकारी, संचालक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
