खो-खो स्पर्धेत पुरुष गटातून पुणे जिल्हा संघ, तर महिला गटातून धाराशिव जिल्हा संघाची बाजी

शेवगाव प्रतिनिधी, दि. १९: शेवगाव येथे पार पडलेल्या साठाव्या पुरुष व महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेत पुरुष गटातून पुणे जिल्हा संघ तसेच महिला गटातून धाराशिव जिल्हा संघाने अजिंक्यपद पटकावून बाजी मारली.
पुरुष गटातून मुंबई उपनगर जिल्हा संघ उपविजेता ठरला असून धाराशिव व सांगली जिल्हा पुरुष संघाने तृतीय क्रमांकाचे पारितोषिक विभागून मिळविले आहे.

महिला गटातून सांगली जिल्हा संघ उपविजेता ठरला असून नाशिक व पुणे जिल्हा महिला संघाने विभागून तृतीय क्रमांकावर आपली मोहोर उमटविली आहे पुणे व मुंबई उपनगर पुरुष संघाच्या अंतिम सामन्यात पुणे संघाने मुंबई उपनगर संघावर निर्णायक बाजी मारली तर महिलांच्या धाराशिव व सांगली जिल्हा संघातील चुरशीच्या व अटीतटीच्या लढतीत धाराशिव जिल्हा महिला संघाने सांगली वर एक डाव व दोन गुणांनी मात केली. धाराशिव महिला संघाकडून राष्ट्रीय खेळाडू अश्विनी शिंदे, संपदा मोरे, संध्या सुरोशे, सुहानी धोत्रे, तन्वी भोसले यांनी तर सांगली संघाकडून रिया चाफे, प्रतीक्षा बिराजदार, यांनी उत्कृष्ट खेळी केली.

   पुरुष गटातील विजेत्या पुणे संघाकडून शुभम थोरात, रुद्र थोपटे, शिवराम शिंगाडे,सुयश गरगटे, तर मुंबई उपनगर संघातील अनिकेत चेंदवडेकर, ऋषिकेश मूरचावडे,ओंकार सोनवणे यांनी आपल्या बहारदार खेळातून उपस्थित क्रीडा रसिकांची वाहवा मिळविली.

राज्य खो-खो असोसिएशनचे सचिव डॉ. चंद्रजीत जाधव, कार्याध्यक्ष सचिन गोडबोले, खजिनदार ॲड. गोविंद शर्मा शेवगाव स्पोर्ट्स क्लबचे डॉ. किरण वाघ, चिखली तहसीलदार संतोष काकडे, शेवगावचे राष्ट्रीय खेळाडू संजय फडके, माजी नगरसेवक महेश फलके, गणेश रांधवणे, पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील सीबीएस इंग्लिश स्कूलच्या प्राचार्य वर्षा दारकुंडे, नितीन लाहोटी यांच्या प्रमुख उपस्थितीत पारितोषिक वितरण करण्यात आले.

पुरुष गटातून मुंबई उपनगर संघाचा खेळाडू अनिकेत चेंदवनेकर याचा सर्वोत्कृष्ट संरक्षण पुणे संघाचा खेळाडू सुयश गरगटे याचा सर्वोत्कृष्ट आक्रमक तर पुणे संघाच्या शुभम थोरात यांचा राजे संभाजी पुरस्कार, दहा हजार रुपये रोख व मानाचा चषक पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला.

तसेच धाराशिव महिला संघाच्या अश्विनी आप्पासाहेब शिंदे यांचा सर्वोत्कृष्ट संरक्षक, सांगली संघाच्या सानिका चापे यांचा सर्वोत्कृष्ट आक्रमक तसेच धाराशिव महिला संघाच्या खेळाडू संध्या सुरोशे यांचा राणी अहिल्यादेवी पुरस्कार व मानाचा चषक देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

  शेवगाव स्पोर्ट्स क्लब सत्यभामा प्रतिष्ठान, न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र खो-खो असोसिएशन व जिल्हा खो-खो संघटना यांच्या मान्यतेने आमदार मोनिका राजळे यांच्या सहकार्य व मार्गदर्शनाखाली  शेवगाव येथील खंडोबा मैदानावर या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी उभारण्यात आलेल्या खास किरण – कार्तिक क्रीडा नगरीत सलग चार दिवस दिवसरात्र पद्धतीने खेळविल्या गेलेल्या खो-खोच्या राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धेला तालुक्यातील  क्रीडा रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. डॉ. किरण वाघ, रमेश लव्हाट यांच्यासह अनेकांनी स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.