शिव-शक्तीच्या ऎक्यातुन सृष्टीचे निर्माण- साध्वी अनुराधादिदी पंढरपुरकर 

कोपरगांव प्रतिनिधी, दि. ५ : भगवान शंकर आणि माता पार्वती यांच्या ऐक्यातुन सृष्टीचे निर्माण झाले आहे, भक्त आणि सेवक होणे सोपे नाही, अतुट भक्ती आपल्या मनोकामनांची पुर्ती करते, नंदीकेश्वर यांनी भगवान शंकराच्या ध्येयावर लक्ष ठेवले, मनुष्य मात्र संसाराचे सेवक झाले असे प्रतिपादन साध्वी अनुराधादिदी पंढरपुरकर यांनी केले.

          येथील संत ज्ञानेश्वरनगरी तहसिल कार्यालय मैदानावर मुंबादेवी तरूण मंडळ साईगांव पालखीच्यावतीने श्री शिवमहापुराण कथा सोहळयाचे आयोजन करण्यांत आले असुन त्याचे सहावे पुष्प गुंफतांना त्या बोलत होत्या. मुंबादेवी तरूण मंडळ व माहेश्वरी समाजाच्यावतीने उपस्थित भाविकांच्या मुखातुन ५० हजार वेळा हनुमानचालिसा पठण करण्यांत आले.

             साध्वी अनुराधादिदी पंढरपुरकर पुढे म्हणाल्या की, प्रत्येकाला वाटते देव आपल्याला भेटला पाहिजे. ज्याठिकाणी अंगण स्वच्छ आहे, मन चंचलतेने भरलेले नाही, तिन्ही सांजा समयी घरा- दारात दीपप्रकाश, दुस-यांचे दुःख जाणून त्यावर मार्ग काढणारा, जे भरकटलेले आहे त्यांना मार्ग दाखविणारा अशा ठिकाणी देवाचा सतत वास असतो. दुराचाराने भरलेल्या मनांत देव कधीच येत नाही. मन नेहमी निर्मळ असावे. भगवान शंकराने दुष्टांना नष्ट करण्याची जबाबदारी काळभैरवावर सोपविली होती म्हणून भोळया शंकर महादेवाच्या दर्शनानंतर काळभैरवाचे दर्शन जरूर घ्यावे तो काशिचा स्वामी आहे. 

अर्ध नारी-नटेश्वर अवतारातुन भगवान शंकराने सृष्टी निर्माण केली आहे. पहिलं ज्ञान भगवान शंकराने पार्वतीला दिले आहे, म्हणून पुरूषांपेक्षा स्त्रीयांचा आदरभाव मोठा आहे. समर्पण भक्ती आणि त्यागाची शिकवण त्यांना दिली आहे. आज परमार्थाच्या वाटेचा रस्ता चुकलेले अनेकजण आहेत. भगवान शंकरांना कमळाचे फुल अतिप्रिय आहे तेंव्हा एक कमलफूल अर्पण केल्याने पातकाचे हनन होते.

महाभारतात सेवकांनी कसे वागावे याची शिकवण दिली आहे. सेवक अज्ञाधारक सर्तक-समर्पीत असावा. सेवकाची दृष्टी भगवंतावर असावी. यावेळी साध्वी अनुराधादिदी पंढरपुरकर यांनी गंगा गोदावरी, नंदीकेश्वर अख्यानातुन श्रीशिवमहापुराणाच्या कथांचे बोधामृत भाविकांना देवुन रूद्राक्षाचे महत्व सांगितले.

संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे व कर्मवीर काळे कारखान्याचे अशोकराव काळे यांनी रामनवमीनिमीत्त कोपरगावातुन शिर्डी साईबाबा दर्शनासाठी पायी जाणा-या भक्तांना परतीच्या प्रवासासाठी साठ बसेस उपलब्ध करून दिल्या तर राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांनी गेल्या वर्षी समता इंटरनॅशनल स्कुलच्या बसेस उपलब्ध करून दिल्याबददल त्यांचा सत्कार करण्यांत आला.

श्री शिवमहापुराण कथा श्रवणासाठी नियमीत हजेरी लावणा-या भाविकांना मुंबादेवी तरूण मंडळ साईगांव पालखीच्यावतींने हरिद्वार, काशि, प्रयाग आदि ठिकाणच्या पवित्र तीर्थ जलाभिषेकाने मंत्रुन, विविध ज्योतिर्लिंग स्थानावर पूजा केलेले बारा हजार रूद्राक्षांचे प्रसाद म्हणून वाटप करण्यांत आले.