कोपरगांव प्रतिनिधी, दि. १० : त्याग, श्रम, तप, ज्ञान, विद्या, अध्ययन, अनुभव, कर्तृत्व, वकृत्व, दार्तृत्व, ममता आदि सर्व गुण राष्ट्रसंत सदगुरू जनार्दन स्वामी मौनगिरींच्या ठायी होते. गुरूपौर्णिमेला त्यांचे अनन्यसाधारण महत्व असुन गुरू शिष्याच्या नात्याचा संगम कोपरगांव बेट भागात पार पडला असे प्रतिपादन मठाधिपती रमेशगिरी महाराज यांनी केले. सालाबादप्रमाणे याही वर्षी कोपरगांव बेट भागातील राष्ट्रसंत जनार्दन स्वामी समाधीस्थानावर गुरूपौर्णिमा उत्सव हजारो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाला. त्याप्रसंगी ते बोलत होते.

प्रारंभी श्री संत सद्गुरू जनार्दन स्वामी (मौनगिरी) महाराज समाधीस्थान व श्री काशिविश्वनाथ महादेव शैक्षणिक व गोपालन ट्रस्टचे अध्यक्ष दत्तात्रय बाळकृष्ण होळकर यांनी आश्रम व शाळेच्या प्रगतीचा अहवाल मांडला. उपाध्यक्ष विलास कोते, सचिव अंबादास अंत्रे यांनी उपस्थित भाविकांचे स्वागत केले.

बाबाजींच्या समाधीची महापुजा, महामस्तकाभिषेक, नित्यनियम विधी, पादुका व मुर्तीची षोडशोपचार पुजा विविध संत महंतांच्या हस्ते संपन्न झाली. या कार्यकमाचे पौरोहित्य वेदशास्त्र संपन्न प्रशांत शिखरे (त्रंबकेश्वर), अनंत लावर गुरूजी (राहाता), जयप्रकाश पांडे गुरुजी यांनी केले. त्रंबकेश्वर येथील भाउ पाटील, श्री श्री १००८ महामंडलेश्वर शिवगिरी महाराज यांची प्रवचने झाली.

मठाधिपती रमेशगिरी महाराज पुढे म्हणाले की, राष्ट्रसंत जनार्दन स्वामी यांनी श्रमदानाला विशेष महत्व देत मराठवाडयासह राज्यभरातील प्रमुख ठिकाणच्या महादेव मंदिरांचा जिर्णोध्दार करून असंख्य भक्तांना अध्यात्मीक संस्काराची शिकवण दिली. गोदा परिसराच्या काठी अध्यात्मीक उर्जेचा मोठ्या प्रमाणांत वास आहे म्हणून कोपरगांव पंचक्रोशीत असंख्य साधु संत महंतांनी तपश्चर्या अलौकीक साधनेतुन करत परमेश्वर प्राप्ती केली आहे.

गुरूला शरण जाण्यांने मनातील भेदाचे अंतरंग स्वच्छ होते. प्रत्येकाला विवेकाची धार लावणांरा गुरूच असतो. नदी, दीप, मृदुंग, बासरी म्हणजे गुरू होय. गुरू म्हणजे वाटाडया आहे, तो भरकटत चाललेल्यांच्या जीवनांला योग्य मार्ग दाखविण्यांचे काम करतो. विश्वातील सर्वात मोठी शक्ती म्हणजे गुरू आहे, प्रत्येकाच्या आयुष्यात सर्वात पहिली गुरू म्हणजे आई आहे, चांगल्या संस्काराची शिकवण देणारे वडील, शिक्षक हे देखील आपले गुरू आहेत असेही ते म्हणाले.

प पू. माधवगिरी, दत्तगिरी, परमानंदगिरी, संदिपगिरी, संतोषगिरी, भोलेगिरी, यांच्यासह सर्व संत महंत तसेच संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, संजीवनी फाउंडेशनचे सचिव सुमित कोल्हे माजी जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे, संजीवनी ग्रामिण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे, राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमाचे विश्वस्थ त्रंबक पाटील, रामकृष्ण कोकाटे,अनिल जाधव, आशुतोष पानगव्हाणे, संदिप चव्हाण, अतुल शिंदे, शिवनाथ शिंदे, स्थापत्यश्रेष्ठ माधवराव पाटील, माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील सह राज्यभरातुन भाविक मोठया संख्येने उपस्थित होते.

चाळीसगांव, धुळे, जळगांव, दहेगांव, जातेगांव वाकले, छत्रपती संभाजीनगर, वैजापुर, अहिल्यानगर, नाशिक, पुणे, मुंबई सह कोपरगांव पंचक्रोशीतील असंख्य पालख्या पायी दिंडीने समाधीस्थानावर जमल्या होत्या. राष्ट्रसंत जनार्दन स्वामींच्या पंचधातुच्या मुर्तीस आकर्षक पानाफुलांची सजावट करण्यांत आली होती तर मंदिर कळसावर विद्युत रोषणाई केली होती.

उपस्थित भाविकांना राष्ट्रसंत जनार्दन स्वामी मौनगिरी आश्रमाच्यावतीने ४५ पोते बुंदी, २५ पोते मसालेभात व १० क्विंटल चिवडा पाकीटाचा महाप्रसाद शिस्तीत वाटप करण्यांत आला. गुरूपौर्णिमेच्या आदल्या दिवशी कोपरगांव शहरातुन जनार्दन स्वामींच्या पादुकासह मठाधिपती रमेशगिरी महाराज यांची सजविलेल्या रथातुन मिरवणुक काढण्यांत आली. जेसीबीच्या माध्यमांतुन त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यांत आली. संजीवनी युवा प्रतिष्ठान व जनार्दन स्वामी प्रतिष्ठानच्यावतीने नयनमनोहर फटाक्यांची आतषबाजी करण्यांत आली.


