स्व. माधवराव आढाव यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्याचे भूमिपूजन

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १९ : मितभाषी, कुटुंबवत्सल, त्यागमूर्ती असलेले स्वातंत्र्यसेनानी, प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष कै. माधवराव कचेश्वर आढाव यांनी तब्बल १४ वर्षे नगराध्यक्ष, ४४ वर्ष नगरसेवकपद भूषवून जनसेवा केली. एवढे मोठे विकासकामे उभे केले असून हि त्यांचा पुतळा उभा राहू शकला नाही. स्व. अप्पांचा पुतळा उभारावा अशा सूचना नगरपरिषदेला दिल्या आहे,  त्यांचे ते दायित्व आहे. स्मारक समिती स्थापन करून कोपरगावच्या नागरिकांनी देखील त्यात उस्फुर्त सहभाग घेवून योगदान देवून पुढे यावे असे आवाहन राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

स्व. माधवराव आढाव यांच्या जयंती उत्सवानिमित्त त्याच्या पुतळ्याचे भूमिपूजन व लक्ष्मीनगर कमानीचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के, वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे, माजी आमदार अशोक काळे, संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे, राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, विधिज्ञ रविंद्र बोरावके, सुशीला म्हस्के, पद्मकांत कुदळे, राजेंद्र जाधव आदि उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या अध्य्क्षस्थानी माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के होते. लक्ष्मी माधव प्रतिष्ठानचे विजय आढाव यांनी प्रास्ताविकात कै. आढाव यांनी गोरगरीब कुटुंबियांना स्वतःची साडे तीन एकर जमीन देऊन लक्ष्मीनगर वसवले. शहरातील विविध संस्थावर त्यांनी कामे केली. शहरातील मोठ्या शास्कीय इमारती, बागबगीचे, शैक्षणिक संस्था स्व. अप्पांच्या काळात उभ्या राहिल्या असल्याचे सांगून स्व. अप्पा सर्व सामन्यांचे चालते बोलते ऑफिस होते असे सांगून आठवणीना उजाळा दिला.

काका कोयटे यावेळी म्हणाले, ४४  वर्ष नगरसेवक व १४ वर्षे नगराध्यक्ष राहिलेल्या स्व. माधवराव आढाव यांचा हा राज्यात विक्रम असावा. स्व. अप्पांचा सर्वानाच आदरयुक्त दबदबा, दरारा अजून आठवतो, एवढे वर्षे सत्ता असूनही स्वतः किंवा कुटुंबासाठी त्यांनी काही करू शकले नाही. स्व. आढाव कुटुंबियाचे कोपरगावशी वेगळे नाते आहे. स्व. अप्पांचे ऋण व्यक्त करण्याचे भाग्य या निमित्ताने मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

बिपीन कोल्हे म्हणाले, मितभाषी असलेले स्व. अप्पा मितभाषी होते. सर्व सामान्यांचे नगरसेवक, नगराध्यक्ष होते. त्यांच्या पिशवीत शिक्के असायचे रस्त्यावरच ते नागरिकांच्या समस्या सोडवीत असत.  लोकांवर त्यांचा विश्वास असल्याने एक अतूट नाते सर्व सामान्य नागरिक, पालिका कर्मचाऱ्यांशी त्यांचे होते. स्वातंत्र संग्रामात सहभाग घेवून त्यांनी कारावास भोगला. त्यानंतर त्यांनी कोपरगावकरांची सेवा करून वेगळे स्थान निर्माण केले.

माजी आमदार अशोक काळे म्हणाले, कुटुंबियांची जबाबदारी सांभाळून शहरासाठी रात्रंदिवस झटणारे नेतृत्व म्हणजे कै. माधवराव आढाव होते. सर्व सामन्यांच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांनी स्वताला झोकून दिले. अनेक महापूर अनुभवलेल्या स्व. अप्पांनी गोरगरीबांची सेवा केली. कै. शंकरराव काळे  व स्व .अप्पांची सामाजिक बांधिलकी होती. कुठलाही निर्णय घेताना स्व. अप्पांनी स्व हितापेक्षा लोकहित डोळ्यासमोर ठेवले. हा त्यांचा गुण होता.आजच्या पिढीला प्रेरणा देणारे त्यांचे कार्य होते.

माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के म्हणाले, कुटुंबवत्सल म्हणून स्व. अप्पांनी सर्वांचे संगोपन केले. त्यागमूर्ती हे त्यांचे एक वैशिष्ट्य होते. कै.शंकरराव काळे व कै. शंकरराव कोल्हे यांच्यामध्ये समन्वय साधायचे काम स्व. अप्पांनी नेहमी केले. गोरगरीब, त्रस्त असलेल्या जनतेसाठी त्यांनी स्वतःची जमीन दिली. स्व. अप्पांनी तन मन धनाने कोपरगावकरांची सेवा केली. कै लक्ष्मीबाई यांच्यामुळे स्व. अप्पा एवढे मोठे कार्य उभे करू शकले. आमदार रमेश बोरनारे यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी गोदावरी दुध संघाचे अध्यक्ष राजेश परजने, अशोक रोहमारे आदिसह नागरिक, आढाव कुटुंबीय उपस्थित होते. सूत्रसंचालन सुधीर कोयटे, भावना गवांदे यांनी तर आभार प्रसाद आढाव यांनी मानले.

Leave a Reply