एकाच दिवशी तीन ठिकाणी कारवाई करून १ लाख १२ हजाराचे रसायन व दारु नेस्तनाबूत
कोपरगाव प्रतिनिधी, दि. ३० : कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी भल्या पहाटे काटवणात जावून सिनेस्टाईलने धाडशी कारवाई करुन अनेक दारूभट्ट्या उध्वस्त केल्याने हातभट्टी दारु बनवणाऱ्यांची कोपरगाव शहर पोलीसांनी झोप उडवली आहे.

या घटनेची पोलीसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, कोपरगाव शहर पोलीस पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी सहायक पोलीस निरीक्षक किशोर पवार, पोलीस उपनिरीक्षक दिपक रोठे, पोलीस कर्मचारी दिपक रोकडे, गणेश काकडे, सतिश काठे, गोपिनाथ कांदळकर, एकनाथ लिंबोरे, श्रीकांत कु-हाडे, प्रसाद साळुंखे, प्रविण रणधीर, यांचे पथक तयार करुन कोंम्बींग ऑपरेशन सुरु केले.

शहराजवळील सवंत्सर शिवारातील गारदा नाल्याच्या काटवणात मंदाबाई बळीराम आहेर रा. मनाई वस्ती हि महिला गावठी हातभट्टीची दारु तयार करीत असल्याची माहीती पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांना समजताच त्यांनी त्या ठिकाणी आपल्या फौजफाट्यासह जावून दारुभट्टी उध्वस्त केली. त्या ठिकाणी ४० हजार रुपयांचे तब्बल १ हजार लिटर घातक रसायन व २ हजार ५०० रूपये किंमतीची २५ लिटर गावठी हातभट्टीची दारु मिळुन आली.

पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने ती नष्ट करुन मंदाबाई आहेर या महिले विरोधात पोलीस कर्मचारी श्रीकांत कु-हाडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला, तसेच तिथुनच जवळ असलेल्या गोदावरी नदी काठी काटवणाच्या आडोशाला नानासाहेब कारभारी रा. मनाई वस्ती याने एकाचवेळी अनेक दारूच्या भट्ट्या लावल्या होत्या पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार हे काटवणातून मार्ग काढत सदरच्या ठिकाणी छापा टाकुन ४८ हजार रुपयांचे १ हजार २०० लिटर घातक रसायन व २ हजार रुपयांची २० लिटर तयार गावठी दारु उध्वस्त करुन सर्व भट्ट्या पेटवून देत दारु भट्ट्यांची राख केली.

पोलीस कर्मचारी प्रविण रणधीर यांच्या फिर्यादीवरून नानासाहेब कारभारी गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तर शहरातील सुभाषनगर येथील रमेश पुंडलिक रेठे हा इसम बेकायदेशीर खुलेआम देशी दारुची विक्री करीत असल्याची माहीती मिळताच पोलीसांनी छापा टाकुन त्यांच्या जवळील १हजार ४० रूपयांची दारु जप्त करुन पोलीस कर्मचारी प्रसाद साळुंखे यांच्या फिर्यादीवरून रमेश पुंडलिक रेठे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

कोपरगाव शहर पोलीसांनी एकाचवेळी तीन ठिकाणी धाडी टाकुन पहाटे ५ वाजल्यापासून सकाळी १० वाजेपर्यंत तब्बल १ लाख १२ हजार ५४० रुपयांचे विषारी रसायने व दारु ताब्यात घेवून ती जाग्यावर नष्ट करीत दारुच्या भट्ट्या जाळून टाकल्या. पोलीसांच्या या धाडशी कारवाईचे सर्व कौतुक होत आहे. तर दारु भट्ट्या चालवणाऱ्यांच्या मनात धडकी भरली आहे.
