कोपरगाव :- कोपरगाव शहरातील नवीन ईदगाह मैदान १०५ च्या कॉंक्रीटीकरणाच्या कामासाठी आ. आशुतोष काळे यांनी ५० लक्ष निधी दिला आहे. या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून लवकरच कामाला प्रारंभ होणार असल्याची माहिती माजी नगरसेवक हाजीमेहमूद सय्यद यांनी दिली आहे.

कोपरगाव शहरातील नवीन ईदगाह मैदान १०५ हे मुस्लिम बांधवांसाठी ईद आणि बकरी ईदच्या नमाजासाठी अत्यंत महत्त्वाचे स्थळ आहे. मात्र, पावसाळ्याच्या काळात मैदानात चिखल व पाण्याची समस्या निर्माण होत असल्यामुळे मुस्लिम बांधवांना गैरसोयींचा सामना करावा लागत होता.

ही अडचण दूर करण्यासाठी मैदानाचे काँक्रीटीकरण करण्याची मागणी मुस्लिम बांधवांनी आ.आशुतोष काळे यांच्याकडे केली होती. सर्व समाजाला सोबत घेवून चालणारे व सर्वं समजाल समान न्याय देणाऱ्या आ.आशुतोष काळे यांनी मुस्लिम बांधवांना येणाऱ्या अडचणींची गांभीर्याने दखल घेवून नवीन ईदगाह मैदान १०५ च्या कॉंक्रीटीकरण कामासाठी ५० लक्ष निधी दिला होता.

लवकरात लवकर सदरच्या कामाच्या निविदा प्रक्रिया पूर्ण कराव्यात अशा सूचना त्यांनी कोपरगाव नगरपरिषद प्रशासनाला दिल्या होत्या. त्या सूचनेनुसार प्रशासनाने आपली जबाबदारी पार पाडून निविदा प्रक्रिया पूर्ण केली आहे. त्यामुळे लवकरच कॉंक्रीटीकरणाच्या कामाला प्रारंभ होणार असल्यामुळे मुस्लिम बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

ईदगाह मैदान हे केवळ धार्मिकच नव्हे, तर सामाजिक कार्यक्रमांसाठी देखील वापरले जाणारे महत्त्वाचे ठिकाण आहे. त्यामुळे या मैदानाचे काँक्रीटीकरण झाल्यानंतर मुस्लिम बांधवांना येणाऱ्या अडचणी कमी होवून चांगल्या सुविधा मिळणार आहे. सर्व समाजाला सोबत घेवून चालणारे व सर्व समाजाला समान न्याय देणारे आ.आशुतोष काळे जात-पंथ न पाहता सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी कटीबद्ध असून त्यांच्या नेतृत्वात सामाजिक ऐक्य अधिक बळकट होत आहे.
