कोपरगाव प्रतिनिधी, दि. ४ : रणनीतींचे डावपेच, बुद्धिबळाच्या पटावर चालींची चढाओढ, चेस क्लॉकची धडधड, क्षणाक्षणाला पटावर पालटणारं चित्र, अखेरच्या क्षणापर्यंत सुरू असलेली निर्णायक लढाई हे सारं कोपरगावकरांना याचि देहि याचि डोळा अनुभवायला मिळालं. निमित्त होतं युवानेते विवेकभैय्या कोल्हे राज्यस्तर बुद्धिबळ चषक स्पर्धेचं. ४ गट आणि ९ फेऱ्यांत पार पडलेल्या स्पर्धेची यशस्वी सांगता झाली. ११ वर्ष वयोगटात निशांत कवडे, १४ वर्ष वयोगटात आर्यन सोनवणे, १९ वर्ष वयोगटात ओंकार लोखंडे आणि खुल्या गटात विशाल पटवर्धन (सोलापूर) यांनी बाजी मारली.

स्पर्धेचं पारितोषिक वितरण सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विवेक कोल्हे यांच्या हस्ते पार पडलं. राज्यस्तरीय, आंतरजिल्हा, आंतरतालुका, मुलींसाठी विशेष प्रावीण्य अशी ६४ रोख आणि १३२ चषक स्वरुपातील पारितोषिकांचं वितरण करण्यात आलं. यावेळी व्यासपीठावर वैभव आढाव, हरिश्चंद्र कोते, ज्ञानेश्वर थोरे, अभिमन्यू पिंपळवाडकर, प्रा.डॉ.राजेश मंजूळ आदी उपस्थित होते.

ग्रामीण भागात बुद्धिबळाला चालना मिळण्याच्या हेतूने कोपरगाव चेस क्लब व संजीवनी युवा प्रतिष्ठाण यांच्या वतीनं बुद्धिबळ चषक स्पर्धेचं आयोजन केलं जातं. स्पर्धेच्या आयोजनाचं यंदा चौथ वर्ष होतं. राज्यभरातील विविध गटातील ७०० हून अधिक स्पर्धकांनी उच्चांकी प्रतिसाद नोंदविला. फिडे नामांकित पंच सागर गांधी यांनी स्पर्धेचं परीक्षण केलं.

स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी नितीन सोळके, प्रमोद वाणी, संकेत गाडे, महेश थोरात, वैभव सोमसे, विशाल पंडोरे, लक्ष्मण सताळे, प्रीतम डागा, राजेंद्र कोहकडे, रमेश येवले, शिवप्रसाद घोडके, नितेश बंब, गणेश कोळपकर, चैतन्य भावसार,अथर्व थोरात, साक्षी गाडे, वरद जोशी, राजेंद्र कोळपकर, नितीन जोरी, चेतन चौधरी आदी प्रयत्नशील होते.

चतुरंग हे बुद्भिबळाचं पारंपरिक स्वरुप होतं. डिजिटल काळात बुद्भिबळ खेळाचं स्वरुप पूर्णपणे पालटलं आहे. करिअरचा मार्ग निवडताना पालक-विद्यार्थ्यांनी बुद्धिबळाचा व्यावसायिक दृष्टीकोनातून निश्चितच विचार करावा. १९ वर्ष दिव्या देशमुख तीन कोटी महाराष्ट्र शासनाच्या तीन कोटी रुपयांच्या प्रोत्साहन पारितोषिकाची मानकरी ठरली. क्रिकेट सोबत बुद्धिबळासारखे खेळ व्यावसासिक स्वरुप धारण करीत आहे. आगामी काळात आयपीएलच्या धर्तीवर देशपातळीवर चेस लीगला चालना मिळेल. त्यादृष्टीने खेळाडूंनी तयारी ठेवावी. त्यादृष्टीनं ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण मिळावं या हेतूने कोपरगाव चेस क्लबनं प्रशिक्षण सत्र हाती घ्यावीत. नामांकित खेळाडू-तज्ज्ञांची प्रशिक्षण सत्र आयोजित करण्यासाठी ‘संजीवनी’चं सर्वोपतरी सहकार्य असेल. – विवेकभैय्या कोल्हे, चेअरमन- सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना

स्पर्धक पाल्यांसोबत पालकही स्पर्धेत हिरारीने सहभागी झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. पुणे, वाशिम, बुलढाणा जिल्हातून पालक विद्यार्थ्यांसोबत स्पर्धेसाठी आले होते. नेमके कसे डावपेच आखायचे याची रणनीती आखण्यात पालक-पाल्य गुंतलेले होते. १४ वर्ष वयोगटात आंतर-जिल्हा स्तरावर मुलीनं तर खुल्या गटात आईनं बाजी मारली. माय-लेकींच्या कामगिरीची स्पर्धास्थळी चर्चा रंगली होती.
