पिंगेवाडीत महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी

शेवगाव प्रतिनिधी, दि. ३: तालुक्यातील पिंगेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती  विविध समाजोपयोगी व शैक्षणिक उपक्रम राबवून उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी महात्मा गांधीजींच्या व लालबहादूर शास्त्रीच्या जीवनकार्याविषयी वकृत्व स्पर्धा, प्रश्नमंजुषा, रांगोळी स्पर्धा तसेच श्रमसंस्कार शिबीराचे आयोजन करण्यात आले.

     गावचे सरपंच , उपसरपंच , ग्रामसेवक ,ग्रामपंचायत सदस्य मंडळ ,शालेय व्यवस्थापन समिती , ग्रामस्तरीय विविध समित्यांचे सर्व आजी माजी पदाधिकारी  व ग्रामस्थ,  मुख्याध्यापक सर्व शिक्षकवृंद व विदयार्थ्यांनी पिंगेवाडी गावचे ग्रामदैवत असलेल्या पिंगलादेवी माता मंदीर रस्ता व मंदीर तसेच शालेय परिसर श्रमदानातून स्वच्छ करुन सुशोभित केला.
       नवरात्र उत्सवानिमित्त दर्शनासाठी भाविकांची मोठया प्रमाणात गर्दी होत असल्याने श्रमसंस्कार शिबीरातून  समाजसेवेचा एक आदर्श निर्माण केला. यावेळी पिंगलादेवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी देखील श्रमदान शिबीरात उत्स्फूर्त सहभाग घेतला.