संजीवनी युवा प्रतिष्ठानची दहीहंडी देशासाठी लढणाऱ्या सैनिकांना समर्पित – विवेक कोल्हे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १७ : युवानेते विवेक कोल्हे यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली, संजीवनी युवा प्रतिष्ठान आयोजित छत्रपती शिवाजी महाराजांची मानाची दहीहंडी मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांचा गगनभेदी जयघोष, “ऑपरेशन सिंदूर” चे आकर्षक फ्लेक्स, सैन्य शस्त्रांचा देखावा आणि वाजतगाजत आलेल्या पथकांनी डीजेच्या तालावर झालेल्या घोषणांनी परिसर दणाणून गेला.

यंदा दहीहंडी उत्सवाला राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रप्रेम यांची विशेष जोड देण्यात आली होती. या प्रसंगी ‘एक राखी जवानांसाठी – शिर्डी ते श्रीनगर’ या उपक्रमाची चित्रफीत सादर करण्यात आली. तसेच ऑपरेशन सिंदूरमधील शूर जवानांच्या पराक्रमाचा जयघोष करत भारतीय सैनिकांना मानवंदना देण्यात आली. गोकुळाष्टमीच्या पारंपरिक उत्सवाबरोबर देशभक्तिपर गीते, छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष आणि भारतमातेचा गजर यामुळे वातावरण भारून गेले.

देशप्रेम, संस्कृती आणि श्रद्धेचा महोत्सव संजीवनी युवा प्रतिष्ठानसोबत,दहीहंडीचा एकच सूर देशाचा विजयी सिंदूर,राष्ट्रभक्तीच्या गजरात, परंपरा आणि एकतेचा उत्सव,स्वातंत्र्याची शपथ, श्रद्धेचा दीप परंपरेचा उत्सव या घोषवाक्यांनी परिसरात अद्वितीय उर्जा निर्माण झाली.

दहीहंडीच्या खेळामध्ये विविध पथकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. अयोध्या प्रतिष्ठान सुभाषनगर (३० सदस्य), राष्ट्रीय श्रीराम संघ कोपरगाव, आदिवासी मित्रमंडळ इंदिरानगर (५० सदस्य), धाराशिव मित्रमंडळ इंदिरानगर (४० सदस्य), तालिम ग्रुप संजयनगर (१५ सदस्य), जय मल्हार मित्रमंडळ शिंगणापूर, श्री गोविंदा पथक बोरटेंभे इगतपुरी, हिंदुसम्राट मित्रमंडळ सोनारवस्ती बेलदार समाज (८० सदस्य), जय बजरंग तरुण मंडळ संजयनगर (५० सदस्य), शिवप्रहार मित्रमंडळ शिंगणापूर, छत्रपती बॉईज मित्रमंडळ हनुमाननगर, राजमुद्रा प्रतिष्ठान आणि लहुजी वस्ताद चौक सुभाषनगर या पथकांचा सहभाग विशेष ठरला.

यामध्ये श्री गोविंदा पथक, बोरटेंभे इगतपुरी यांनी तब्बल पाच थर उभारून उपस्थितांची दाद मिळवली, तर लहुजी वस्ताद चौक सुभाषनगर यांनी चार थर लावून उत्साह वाढवला. प्रेक्षकांच्या जयघोषात रंगलेली ही रोमांचक स्पर्धा “गोविंदा आला रे आला” या घोषणांनी अविस्मरणीय ठरली.

या प्रसंगी युवानेते विवेक कोल्हे यांनी गोविंदा पथकांना व उपस्थित नागरिकांना दहीहंडीच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी आपल्या मनोगतात म्हटले की, “मैत्री, विश्वास आणि मार्गदर्शन व नात्यांचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे श्रीकृष्ण आहेत. कठीण काळात धाडसाने कसे सामोरे जायचे याचे उदाहरण देखील श्रीकृष्णच आहेत. हाच संदेश लक्षात घेऊन संजीवनी युवा प्रतिष्ठानने यावर्षी दहीहंडी राष्ट्रप्रेमाच्या थीमवर साजरी केली आहे.

संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या विविध सामाजिक कार्यांचा उल्लेख करत त्यांनी युवकांचे कौतुक केले आणि त्यांचा उत्साह वाढवला. या मानाच्या दहीहंडी उत्सवात राष्ट्रभक्ती, परंपरा, श्रद्धा आणि एकतेचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला. सर्व युवा सेवकांच्या अथक परिश्रमामुळे आणि कोपरगावकरांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा उत्सव ऐतिहासिक ठरला.मोठ्या संख्येने नागरिक, पदाधिकारी, युवासेवक यांची उपस्थिती होती.

Leave a Reply