कोपरगाव प्रतिनिधी, दि. २१ : सामाजिक एकोप्याचे आणि संस्कृतीचे भान ठेवून नाभिक समाज संत सेना महाराजांच्या मूल्यांचा वारसा पुढे घेवून जात आहे. या समाजाने जे सामाजिक बंध पुढे चालवले आहेत ते इतरांसाठीही प्रेरणादायी असल्याचे सांगत आ. आशुतोष काळे यांनी नाभिक समाज राबवीत असलेल्या सामाजिक उपक्रमाबद्दल त्यांचे कौतुक केले आहे.

कोपरगाव येथे संतश्रेष्ठ श्री संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त सालाबाद प्रमाणे याहीवर्षी नाभिक समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना सत्कार सोहळा आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते संपन्न झाला याप्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, नाभिक समाजाचे आणि काळे परिवाराचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. कर्मवीर शंकररावजी काळे, मा.आ.अशोकरावजी काळे यांच्या प्रमाणे मला देखील नाभिक समाजाचे प्रेम व आशीर्वाद मिळाले आहे. सर्व समाजाप्रमाणे नाभिक समाजाच्या समाजिक सभागृहासाठी ५० लक्ष निधी दिला आहे.

संत सेना महाराजांनी समाज प्रबोधन आणि कर्माला महत्त्व देण्याचा संदेश दिला. त्यांच्या कार्यातून आपल्याला सेवा, समर्पण आणि श्रमप्रतिष्ठेचे शिकवण मिळते. संत सेना महाराजांनी केवळ देवभक्तीच नव्हे तर सेवा, श्रम आणि समाजप्रेम यांचा संदेश दिला. त्यांच्या जीवनातून ‘कर्म हीच खरी पूजा’ हे शिकायला मिळते.

नाभिक समाजाने ही शिकवण जपली असून, समाजाने शिक्षण, सेवा व कष्ट यांच्या बळावर प्रगतीचा आदर्श घालून दिला आहे. आजच्या विद्यार्थ्यांनीही अभ्यासाबरोबरच सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार हा त्यांच्या मेहनतीचा सन्मान असून अशा उपक्रमांमुळे इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळणार आहे ही बाब अत्यंत अभिमानास्पद असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले.

यावेळी राष्ट्रीय नाभिक एकता महासंघाचे प्रदेश कार्याध्यक्ष किरण बिडवे, संत सेना नाभिक समाज मंदिर ट्रस्टचे तालुकाध्यक्ष दिलीप जाधव, उपाध्यक्ष सोमनाथ व्यवहारे, सचिव सचिन वैद्य, कचेश्वर कदम, भाऊसाहेब बगळे, सुरेश कदम, भाऊसाहेब बगळे, मुकूंद जाधव, संजय सोनवणे, गोरख वैद्य, शेखर निकम, दिनेश संत, नाभिक समाज महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. छाया वैद्य, उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी, समाज बांधव, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, कार्यकर्ते आदी उपस्थित होते.
