शासकीय कार्यालयातील नागरिकांची आर्थिक पिळवणूक सहन केली जाणार नाही- आमदार काळे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २ : कोपरगाव शहरातील विविध शासकीय कार्यालयात सर्वसामान्य नागरीकांची शासकीय कामात अडवणूक केली जात असून काही शासकीय अधिकाऱ्यांकडून पैशाची मागणी केली जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. हा प्रकार गंभीर असून सर्वसामान्य नागरिकांची कोणत्याही शासकीय कार्यालयात होणारी आर्थिक पिळवणूक सहन केली जाणार नाही असा ईशारा आ.आशुतोष काळे यांनी शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिला आहे.

आ.आशुतोष काळे यांनी म्हटले आहे की, शासनाच्या कल्याणकारी योजना सर्व सामान्य जनतेपर्यंत पोहोचायला हव्यात, पण या प्रक्रियेत नागरिकांचे आर्थिक शोषण होता कामा नये.नागरिकांना देण्यात येणारी शासकीय सेवा पारदर्शक, जलद आणि लोकाभिमुख असली पाहिजे. नागरीकांना आवश्यक असलेली कागदपत्रे ठरलेल्या शासकीय नियमानुसार वेळेत दिली गेली पाहिजे. वेळेच्या अगोदर कोणताही नागरिक कोणत्याही शासकीय अधिकाऱ्याकडे कागदपत्रांची मागणी करीत नाही.

मात्र आर्थिक हव्यासापोटी जर सर्व सामान्य नागरीकांना वेठीस धरले जात असेल तर अशा अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही. शासकीय यंत्रणेला जाब विचारणारे कोणी नाही असे समजता कामा नये. मी शासकीय अधिकाऱ्याच्या कारभारावर नजर ठेवून आहे त्यामुळे कोणीही अधिकारी चुकीचे काम करतांना आढळल्यास त्या अधिकाऱ्याला होणाऱ्या परिणामांना सामोरे जावे लागेल.   

सर्वसामान्य जनतेच्या अडचणी दूर होवून त्यांचे जीवन सुखकर व्हावे यासाठी शासन विविध समाजोपयोगी योजना व उपक्रम राबवीत असते. या योजना संबंधित शासकीय कार्यालयाच्या माध्यमातून तळागाळातील सर्व सामान्य गरजू जनतेपर्यंत पोहोचल्या पाहिजेत हा शासनाचा मुख्य उद्देश असतो. मात्र या उद्देशाला काही शासकीय अधिकारी हरताळ फासून नागरीकांची आर्थिक पिळवणूक करीत आहे. अशा अधिकाऱ्यांना मी सोडणार नाही हे सर्व शासकीय कार्यालयातील अधिकाऱ्यांनी लक्षात घ्यावे.

तुम्ही जनतेच्या सेवेसाठी आहात, मालकी हक्क गाजवण्यासाठी नाही. जनतेने भरलेल्या कराच्या पैशातून सर्व शासकीय अधिकाऱ्यांचे पगार होतात याची जाणीव ठेवून जनतेच्या खिशात हात घालण्याचा प्रयत्न करू नका. यापुढे कोणत्याही कार्यालयात जर कोणत्याही  नागरीकांचे  काम अडवलं, पैसे मागितले तर त्याचे परिणाम वाईट होतील असा निर्वाणीचा ईशारा आ.आशुतोष काळे यांनी दिला आहे.

Leave a Reply