कोपरगाव प्रतिनिधी, दि. २५ : भारताने गेल्या काही वर्षांत बुद्धिबळात झपाट्याने प्रगती केली आहे. मागील वर्षी डिसेंबर महिन्यात पार पडलेल्या जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या डी. गुकेश याने जगज्जेतेपदावर मोहोर उमटवली तर नुकत्याच जुलै महिन्यात झालेल्या महिला बुद्धीबळ विश्वचषकाच्या फायनलमध्ये नागपूरच्या दिव्या देशमुखनं फिडे महिला बुद्धीबळ विश्वचषक आपल्या नावावर करून भारताच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.

यावरून असे दिसून येते की, गेल्या काही वर्षांत बुद्धिबळात भारतीयांची आवड झपाट्यानं वाढली असून भारतीय खेळाडूंचा बुद्धिबळातील दबदबा वाढला आहे. हा दबदबा असाच टिकून ठेवण्यासाठी बुद्धिबळ स्पर्धेच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ पटलावर अढळ स्थान निर्माण करणारे बुद्धिबळपटू घडले जावेत अशी अपेक्षा आ.आशुतोष काळे यांनी व्यक्त केली.

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अहिल्यानगर व छत्रपती शिवाजी विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव-कोळपेवाडी येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री.छत्रपती शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेचे बक्षिस वितरण आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते पार पडले या प्रसंगी ते बोलत होते.

पुढे बोलताना ते म्हणाले की, बुद्धिबळ हा एकाग्रतेने खेळण्याचा खेळ आहे. ज्यामध्ये संयम, नियोजन आणि दूरदृष्टी असा सर्वांचा उत्तम असा संगम आहे. मागील काही वर्षांत बुद्धिबळात भारतीयांची आवड झपाट्यानं वाढत आहे.विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी बुद्धिबळ हा खेळ अत्यंत उपयुक्त असून अनेक आंतरराष्ट्रीय खेळाबरोबरच बुद्धिबळ खेळातही आपल्या देशाचे वर्चस्व निर्माण होत आहे हि भारतीयांसाठी अभिमानाची व आनंदाची गोष्ट आहे.

यामध्ये सातत्य ठेवण्यासाठी अशा तालुकास्तरीय स्पर्धा हे उत्तम व्यासपीठ आहे. या व्यासपिठाच्या माध्यमातून नवोदीत बुद्धिबळपटूंना मार्गदर्शक करणाऱ्या शिक्षकांनी या विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन करावे जेणेकरून हे बुद्धिबळपटू देखील आपल्या चालीतून या खेळावर प्रभुत्व मिळवतील आणि जगज्जेते होतील त्यासाठी अशा स्पर्धांचे आयोजन अत्यंत उपयुक्त असल्याचे आ.आशुतोष काळे यांनी सांगितले व पुढील जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी यशस्वी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.

स्पर्धेचे उद्घाटन रयतचे जनरल बॉडी सदस्य अरुण चंद्रे व बेसबॉल संघटनेचे सचिव मकरंद कोऱ्हाळकर यांच्या हस्ते संपन्न झाले. हि स्पर्धा १४,१७ व १९ वर्षे मुला-मुलींच्या वयोगटात घेण्यात आल्या. या स्पर्धेत एकूण २८० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. १४ वर्षे वयोगटात मुले-विंध्य वाघ,चैतन्य फडतारे, प्रद्युम्न दवंगे, सात्विक भागवत, सुमित पगार, मुली-वैभवी जाधव, मृणाली सोनवणे, स्वराली काळे, पलाशा गायकवाड, आर्या धारणगावकर व १७ वर्ष वयोगट मुले-नचिकेत काठमोरे, सार्थक देशमुख, सिद्धांत लाड, ओंकार बोगा, धनेश पाटील, मुलीमध्ये स्वरा शिंदे, संस्कृती दारुंटे, समृद्धी रौंदाळे, वैष्णवी हासे, वृषाली टुपके तर १९ वर्षे वयोगट मुले तेजस वाया, दर्शन लखारे, पुष्कर कुलकर्णी, सार्थक कुलधरण, योशुआ गोवडा, मुली-कस्तुरी भोये, ईश्वरी सरोदे, रोहिणी पालवे, प्रतीक्षा महाले आदी खेळाडूंनी यश मिळविले असून जिल्हास्तरीय स्पर्धेत हे विद्यार्थी कोपरगाव तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

या प्रसंगी श्री छत्रपती शिवाजी विद्यालयाचे प्रा.प्रकाश चौरे, राधाबाई काळे कन्या विद्यालयाच्या प्रा.सुशिला थोरात, श्री छत्रपती संभाजी प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र पाचोरे यांचेसह पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.रयत संकुलाचे शिक्षक बाबासाहेब आभाळे, विठ्ठल वसावे, देवेंद्र भोये, नितीन निकम, योगेश सावळा, इब्राहिम गावित, योगेश ठाकरे, अरुण दोरके, प्रसाद कापसे, तालुका क्रीडा समिती सह अध्यक्ष निलेश बडजाते, उपाध्यक्ष सुनील कदम, सहसचिव मिलिंद कांबळे, तांत्रिक पंच नितीन सोळके, संकेत गाडे यांनी विशेष परिश्रम घेतले.स्पर्धा यशस्वी करण्यासाठी तालुक्यातील सर्व क्रीडा शिक्षक व रयत संकुलाच्या सर्व शिक्षकांचे मोलाचे सहकार्य मिळाले.
