कोपरगांव प्रतिनिधी, दि. २८ : भविष्यातली दुग्धव्यवसायाची गरज विचारात घेऊन गोदावरी दूध संघ एकशे अकरा कोटीच्या अत्याधुनिक विस्तारीत प्रकल्पाची उभारणी करणार असल्याची माहिती गोदावरी खोरे नामदेवरावजी परजणे पाटील तालुका सहकारी दूध उत्पादक संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत संघाचे अध्यक्ष राजेश परजणे पाटील यांनी दिली. या विस्तारीत प्रकल्पासाठी सभेत सर्वानुमते पाठिंबा देण्यात आला.

गोदावरी खोरे नामदेवरावजी परजणे पाटील तालुका सहकारी दूध उत्पादक संघाची ५० वी सुवर्णमहोत्सवी वार्षिक सर्वसाधारण सभा संघाच्या कार्यस्थळावर खेळीमेळीत पार पडली. प्रारंभी संघाचे संस्थापक दिवंगत नेते नामदेवराव परजणे पाटील (आण्णा) यांच्या प्रतिमेस अभिवादन करून अहवाल सालात दिवंगत झालेल्या व्यक्तींना आदरांजली वाहण्यात आली. अध्यक्षपदावरुन बोलताना राजेश परजणे पाटील यांनी संघाच्या कामकाजाविषयी व भविष्यात राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांविषीयीची माहिती दिली. संघाचे कार्यकारी संचालक चंद्रकांत गाढवे यांनी मागील सभेच्या इतिवृत्ताचे वाचन केले. त्यानंतर विषयपत्रिकेवरील सर्व विषय सविस्तर चर्चेने सर्वानुमते मंजूर करण्यात आलेत.

दुग्धव्यवसाय आता पुरक व्यवसाय राहिलेला नसून तो प्रमुख व्यवसाय झालेला आहे. नैसर्गिक आपत्ती व दुग्ध व्यवसायाविषयींची शासकीय धोरणे यामुळे सहकारी दूध संघापुढे अनेक अडचणी निर्माण झालेल्या आहेत. या अडचणीबाबत व सहकाराला बळकटी देण्याच्यादृष्टीने केंद्रीय सहकार व गृहमंत्री अमित शाह यांची लवकरच भेट घेऊन मागणी करणार आहोत.

दुग्धव्यवसाय अधिक बळकट करण्याच्यादृष्टीने जनावरांचे आरोग्य, दूध दराची हमी, प्रक्रिया उद्योग, आर्थिक सहाय्य आणि आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा या सर्व बाबींचा विचार करून शासनाने सहकारी दूध संस्थांना पाठबळ द्यावे अशीही मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार, जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे लवकरच करणार असल्याचे सांगून परजणे पुढे म्हणाले, चढ – उताराच्या परिस्थितीमुळे संघाला अनेकदा तोटाही सहन करावा लागतो. दूध उत्पादकांच्या भल्यासाठी आम्ही तोटाही सहन करीत आहोत.

संघाने अहवाल सालामध्ये ५ कोटी ७९ लाख ३५ हजार ६६६ लिटर्स दूध संकलन केलेले आहे. उरळीकांचन येथील भारतीय कृषी उद्योग प्रतिष्ठानच्या सहकार्याने संघ कार्यक्षेत्रात ३६ केंद्रामार्फत ४५ हजार ६१६ कृत्रिम रेतन केलेले आहे. तसेच सॉर्टेडसिमेनचे ३ हजार २४९ रेतन केलेले आहे. दूध उत्पादकांकडून सॉर्टेडसिमेनसाठी नाममात्र शुल्क आकारले जाते. संघ कार्यस्थळावरील पशुरोगनिदान प्रयोगशाळेत जनावरांचे वेगवेगळ्या आजारांवर निदान करुन उपचार केले जातात. तसेच गोदावरी पशुसंवादिनी ॲपच्या माध्यमातून शुपालकांना गोठ्याची रचना, पशुंची घ्यावयाची काळजी, चारा, पशुखाद्य, जंत निर्मूलन, लसीकरण, स्वच्छ दूध उत्पादन याबाबत मार्गदर्शन करण्यात येते.

यावर्षी संघाने कन्टीन्युअस खवा मेकींग मशिनरीची उभारणी केली असून त्याद्वारे तासी २०० किलो उत्तम गुणप्रतीच्या खव्याचे उत्पादन होते. नुकतीच स्टरलाईज्ड मिल्क ( सुगंधी दूध) प्लॅन्टबरोबरच थर्माफार्मिंग पनीर मेकींग युनिट, अद्यावत असे मिल्क क्लेरिफायर युनिटची उभारणी करण्यात आलेली आहे. लवकरच तूप मेकींग युनिटची उभारणी करण्यात येणार आहे. संघाच्या मालकीच्या ४.५ मेगावॅट सोलर उर्जा प्रकल्पाची उभारणी करण्याचे काम चालू आहे. त्यापैकी २.५ मेगावॅट क्षमतेचा सोलर उर्जा प्रकल्प प्रत्यक्षात चालू झाला असून संघासाठी सद्या १.५ मेगावॅट उर्जेचा वापर देखील करण्यात येत आहे. कार्यक्षेत्रातील दूध उत्पादकांना मूरघास तयार करुन देण्यासाठी संघाने कॉम्बोमेज क्रॉप

हार्वेस्टर बेलर यंत्र खरेदी केले असून प्रत्यक्ष शेतावर जाऊन शेतकऱ्यांना १२० ते १३० किलो वजनाच्या मूरघास गाठी अल्प दरात तयार करुन दिल्या जातात. दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी १० लाख रुपयाचा नामदेवराव परजणे पाटील पशुपालक सुरक्षा अपघाती विमा तसेच अपघातात मृत पावलेल्या संघ कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांसाठी स्टेट बैंक ऑफ इंडियाकडून २० लाख रुपयाचे विमा कवच देण्यात आलेले असल्याचेही परजणे पाटील यांनी सांगितले.

समृध्दी महामार्गावर ” महाचाय प्रायव्हेट लिमिटेड ” या कंपनीने ठिकठिकाणी चहा व नाष्ट्याचे स्टॉलस् सुरु केलेले आहेत. या कंपनीला कोपरगांवपासून ते नागपूरपर्यंत गोदावरी दुधाचा पुरवठा करण्याचा तर सदर कंपनीकडील चहा पावडर गोदावरी दूध संघाने विक्री करण्यासाठीचा करार करण्यात आलेला आहे. उत्कृष्ठ प्रतीची ही चहा पावडर संघाकडून ग्राहकांना उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. यासंदर्भात महाचाय कंपनीचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर टेकाळे यांनी सभेत माहिती दिली.

सभेला संघाचे उपाध्यक्ष गोपीनाथ केदार, संचालक विवेक परजणे, उत्तमराव डांगे, भाऊसाहेब कदम, गोरक्षनाथ शिंदे, नानासाहेव काळवाघे, सुदामराव कोळसे, जगदीप रोहमारे, संजय दुपके, भिकाजी झिंजुर्डे, सौ. सुनंदाताई होन, सौ. सरलाताई चांदर, सौ. सुमनबाई शिंदे, महाचायचे मुख्य व्यवस्थापक केशव कामळे तसेच नानासाहेब सिनगर, संजीवनी कारखान्याचे संचालक बाळासाहेव वक्ते, भाऊसाहेब काळे, अजय आव्हाड, लक्ष्मणराव शिंदे, सोमनाथ निरगुडे, विजय परजणे, अशोकराव काजळे, सुदामराव शिंदे, दत्तात्रय शितोळे, सोपान चांदर, बायफ संस्थेचे डॉ. बाळासाहेव जिगळेकर यांच्यासह संघाचे सभासद, दूध संस्थांचे प्रतिनिधी, दूध उत्पादक शेतकरी, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. संचालक विवेक परजणे यांनी आभार व्यक्त केलेत.
