शेवगाव प्रतिनिधी, दि. ४ : अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस संभाजी दहातोंडे यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचेकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास देशभरातील सीबीएसई आणि आयसीएसई शाळांच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याची मागणी केली आहे. इयत्ता १ ली ते १० वी पर्यंतच्या अभ्यासक्रमात हा विषय अनिवार्य करण्याची विशेष विनंती त्यांनी केली आहे.

पत्रामध्ये दहातोंडे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनप्रवासाचे आणि योगदानाचे महत्त्व विषद केले आहे. ते म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित नसून, ते संपूर्ण भारतासाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांच्या स्वराज्याच्या संकल्पनेने न्याय, समता आणि राष्ट्रभक्तीचे मूलतत्त्व रुजवले. त्यांचे दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व आणि समावेशक प्रशासन आजही आपल्याला दिशादर्शक ठरते.

दहातोंडे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याची अनेक कारणे स्पष्ट केली आहेत. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी, देशभक्तीची भावना जागृत करण्यासाठी, धर्मनिरपेक्षता आणि सामाजिक न्यायाचे महत्त्व पटवण्यासाठी, भारतीय संस्कृतीचे जतन करण्यासाठी, हिंदू मंदिरांचे संरक्षण आणि गनिमी काव्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावे यासाठी हा इतिहास अभ्यासक्रमात असणे आवश्यक आहे, असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन विद्यार्थ्यांना नेतृत्व, सामाजिक जबाबदारी आणि विविधतेचा आदर करण्याचे गुण शिकवते. त्यामुळे त्यांचा इतिहास अभ्यासक्रमात समाविष्ट करणे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे, या मागणीवर शिक्षणमंत्री सकारात्मक आणि त्वरित निर्णय घेतील, अशी अपेक्षा ही त्यांनी व्यक्त केली आहे.
