भर पावसात आमदार काळेंनी केली शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी

सर्वच मंडलात ६५ मी.मी.पेक्षा जास्त पाऊस

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २८ : कोपरगाव मतदार संघात शनिवार (दि.२७) रोजी सायंकाळी सहा वाजेपासून सुरु झालेल्या पावसाने सलग अठरा तास हजेरी लावत रौद्र रूप धारण करून शेतीचे अतोनात नुकसान केले. काढणीला आलेल्या सोयाबीन, बाजरी, कापूस, मका, तूर, भाजीपाला, फळ पिकांचे व चारा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर काही ठिकाणी नागरीकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले. काही ठिकाणी घरांच्या भिंती कोसळून घरांचे नुकसान झाले. झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आ.आशुतोष काळे यांनी रविवार (दि.२८) रोजी सकाळपासून मतदार संघातील नुकसानग्रस्त भागाला बेट दिली.

भर पावसात शेतकऱ्यांच्या बांधावर जावून झालेल्या नुकसानीची पाहणी करून मी आणि महायुती शासन तुमच्या पाठीशी आहे, काळजी करू नका अशा शब्दात धीर दिला. काही ठिकाणी पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी प्रशासनाला सूचना देवून नागरिकांच्या राहण्याची,भोजनाची व्यवस्था करून मदतीसाठी स्वत:ची यंत्रणा उभी करून मदत केली.

कोपरगाव मतदार संघात चालूवर्षी पर्जन्यमान कमी होते.परंतु शनिवार (दि.२७) रोजी सायंकाळी सहा वाजेपासून सुरु झालेल्या पावसाने रौद्र रूप धारण करून सर्वत्र दाणादाण उडवून दिल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. शेतांचे तळे होवून शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावला जावून घरांची पडझड व पशुधनाचेही हाल झाले.सर्वच ओढे नाले भरून वाहत होते त्यामुळे सर्वच ओढ्या नाल्यांना पूर येवून रस्ते बंद होवून सर्वत्र पाणीच पाणी दिसत होते. अनेक छोटे मोठे पूल पाण्याखाली जावून वाहतूक ठप्प झाली तर अनेक गावांचा संपर्क तुटला होता.

नासिक धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे गोदावरी नदीला जवळपास ८० हजार क्युसेक्स पाणी  सोडण्यात येवून त्यामध्ये वाढ होण्याची शक्यता लक्षात घेवून आ.आशुतोष काळे यांनी नदीकाठच्या गावातील नागरीकांना काळजी घेण्याच्या सूचना दिल्या व कोणत्याही प्रकारची कुठलीही मदत लागल्यास प्रशासकीय यंत्रणेशी व माझ्या यंत्रणेशी तातडीने संपर्क करावा असे आवाहन केले. कोपरगाव शहरासह ग्रामीण भागातील सुरक्षित स्थळी हलविलेल्या नागरीकांच्या राहण्याची, भोजनाची व्यवस्था करून मेडिकल सुविधा उपलब्ध करून दिली.  

कुठे घरात पाणी शिरले तर कुठे घरांच्या भिंती कोसळल्या.गोदावरी नदीला मोठ्या प्रमाणात विसर्ग वाढविण्यात आल्यामुळे नदीकाठच्या अनेक गावात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली.एकाचवेळी पावसाचा कहर आणि गोदावरी नदीला आलेला महापूर अशा दुहेरी संकटात झालेल्या नुकसानीमुळे नागरीकांना धीर देण्यासाठी आ.आशुतोष काळे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जावून पोहोचले. गोदावरी नदीला आलेल्या महापुरामुळे गोदावरी नदीवरील सर्वच केटीवेअर वरून पाणी वाहत असल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती सर्व परिस्थितीवर आ.आशुतोष काळे बारीक लक्ष ठेवून होते.

 कोपरगाव मतदार संघातील सर्वच मंडलात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे वेचणीला आलेला कापूस आणि काढणीला आलेल्या सोयाबिन, बाजरी, मका,तूर आदी पिकांचे पावसाने होत्याचे नव्हते करून टाकले. अतिवृष्टीमुळे मतदार संघातील शेतीचे नुकसान पाहून सरसकट सर्वच ठिकाणी नुकसानीचे लवकरात लवकर पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या. एकही शेतकरी व नागरिक झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही याबाबत दक्षता घ्यावी. ज्याठिकाणी पंचनामे करण्यासाठी शेतात जाणे शक्य नाही त्याठिकाणी ड्रोन, मोबाईल फोटो यांची मदत घ्या. नुकसानीचे अचूक पंचनामे करून संवेदनशीलपणे प्रशासनाणे काम करून पंचनामे करतांना एकही शेतकरी वंचित राहणार नाही याची काळजी असे स्पष्ट निर्देश दिले.

वारी येथे प.स.मा.सदस्य मधुकर टेके यांच्या वस्तीला कोळ नदीच्या व चोंढी नाल्याच्या पुराच्या पाण्याचा वेढा बसल्यामुळे टेके यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील सहा सदस्य अडकून पडले होते. त्यांच्याशी संपर्क करण्यासाठी आ. आशुतोष काळे कमरे पर्यंतच्या पाण्यातून जावून त्यांच्याशी संपर्क केला. त्यानंतर ट्रॅक्टरवर बसून जाण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या सुटकेसाठी तहसीलदार महेश सावंत यांना एनडीआरएफच्या टीमला देखील पाचारण करण्यात सांगितले. मात्र पुराच्या पाण्याचा प्रवाह मोठा असल्यामुळे टेके कुटुंबाची सुटका करणे शक्य झाले नाही. त्यावेळी आ.आशुतोष काळे यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया याच्याशी संपर्क करून टेके कुटुंबाला सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी हेलिकॉप्टरची मागणी केली असून त्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले.

संपूर्ण राज्यावर वरून राजा कोपला आहे त्यातून आपल्या मतदार संघावर मात्र वरुणराजाची कृपादृष्टी असल्याचे वाटले होते परंतु शनिवार (दि.२७) पासून सुरु झालेल्या मुसळधार पावसाने होत्याचे नव्हते करून टाकले. हे नैसर्गिक संकट असले तरी महायुती शासन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. यापूर्वी देखील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची योग्य मदत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळवून दिली आहे. व यावेळी देखील त्यात बदल होणार नाही शेतकऱ्यांनी निर्धास्त रहावे. शेतकऱ्यांना तातडीची मदत देण्याबाबतची प्रक्रिया राबवा. नुकसानीचा अंदाज पाहता सरसकट सगळ्याच शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करा, आणि शेतकऱ्यांना दिलासा द्या.

शेतकऱ्यांच्या पाठीशी या संकटसमयी शासन उभे आहे.दोन दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर जावून नुकसानीचे जलद गतीने पंचनामे करावे प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची व नागरीकांची भेट घेवून नुकसानीची वस्तुनिष्ठ माहिती घेवून पंचनामे करावे.केलेल्या पंचनाम्याचा अहवाल लवकरात लवकर तयार करून जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करावा अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी तहसीलदार महेश सावंत व तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे यांना दिल्या आहेत.

Leave a Reply