श्री गणेश कारखान्याची ६४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न
कोपरगाव प्रतिनिधी, दि. २९ : श्री गणेश सहकारी साखर कारखान्याची ६४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा कारखान्याचे चेअरमन सुधीर लहारे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या सभेला माजी मंत्री, गणेशचे मार्गदर्शक बाळासाहेब थोरात,जिल्हा बँकेचे संचालक गणेशचे मार्गदर्शक विवेकभैय्या कोल्हे,व्हा. चेअरमन विजय दंडवते, जेष्ठ संचालक नारायणराव कार्ले, डॉ. एकनाथ गोंदकर, विधिज्ञ पंकज लोंढे, यांचेसह संचालक मंडळातील सर्व सदस्य, संगमनेर चे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, गणेशचे कार्यकारी संचालक जी.बी. शिंदे, कोल्हे कारखाना जनरल मॅनेजर शिवाजीराव दिवटे, गणेशचे सेक्रेटरी नितीन भोसले यांचे सह सभासद, कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

युवानेते विवेक कोल्हे म्हणाले, गणेश कारखाना ही एक चांगली संस्था आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आपण ही संस्था चांगली चालावी म्हणून मोठे प्रयत्न करतो. दोन हंगाम काढले. परंतु मागील हंगाम अपेक्षित झाला नाही. आता हा हंगाम चांगला होईल. आपले प्रयत्न कारखाना, कामगार आणि गणेश परिसर यांचे हित जपणे आहे. मागील गाळप हंगामात गणेश ने २ लाख टन गाळपकेले होते. त्यात एक लाख बाहेरून आणला. बाहेरून ऊस आणल्यावर वाहतुकीचा खर्च वाढतो. तरी ही आपण भाव देतांना एफआरपी पेक्षा अधिकचे पैसे दिले.

स्पर्धेत टिकून राहण्यासाठी हे करावे लागते. कामगारांच्या वेतनावर प्रति टन ६०० ते ७०० रुपये खर्च येतो. सेवानिवृत्त कामगारांची देणी दिली. रेग्युलर कामगारांचे रिटेनशन दिले. रेग्युलर पगार होतो. गणेशला उपपदार्थ निर्मिती नसताने इतरांच्या तुलनेत चांगला भाव देतो. कारखान्याचे विस्तारिकरण करण्यात येणार आहे. कारखाना प्रतिदिनी २१००- २२०० वरून ३००० टन गाळप करेल.

यंदाच्या हंगामासाठी कार्यक्षेत्रातून २.५ लाख मेट्रिक टन व बाहेरून १.५ लाख टन उसाच्या नोंदी झाल्या आहेत. त्या मुळे गणेश ४ लाख मेट्रिक टन गाळप करेल. गणेश कारखाना प्रगतीत कुणीही अडथळा आणू नये. आम्ही कोपरगाव तालुक्यात जसे सहकारी संस्थेच्या बाबतीत सामंजस्याची भूमिका घेतो त्या दृष्टीने सर्वांनी विचार करणे गरजेचे आहे. सहकारी हिताच्या आड येऊन जर राजकारण झाले तर आपसूकच प्रतिकार होत असतो त्यामुळे संस्था हित हे प्राधान्य महत्वाचे आहे.

आसवानी प्रकल्प या हंगामात सुरु होईल. ऊस वाढीसाठी विविध योजना आणतोय, थोरात व निळवंडे कृती समितीच्या प्रयत्नातून पाणी आले. ऊस वाढवा, या तालुक्यातील इतर कारखान्यापेक्षा निश्चितच जादा भाव देऊ, विश्वासास तडा जाऊ देणार नाही. तुम्ही सर्वांनी साथ दिली तर गणेशचा नावलौकिक राज्यात वाढवू असेही कोल्हे म्हणाले.

माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, साखर कारखानदारिवर दर हंगामात नव नवीन संकटे येत असतात. एका मागे एक संकट, अडथळे निर्माण करतात. जिल्हा बँक, एनसीडीसी कर्जाला मोठे अडथळे आणले. खरं तर राजकारण न करता, या भागातील सभासदांचे चांगले होत असेल तर कौतुक करावे अडथळा आणू नये.

गणेशने ४ लाख गाळप केलेच पाहिजे. शेतकऱ्यांनी गणेश चांगला करण्यासाठी ऊस दिला पाहिजे. एकरी उत्पादन वाढविले पाहिजे. १०० टन एकरी उत्पादन घ्या. स्वतःचा ऊस निर्माण करा. गणेश इतर राज्यातील कारखान्या प्रमाणे प्रथम क्रमांकावर राहील. सभासदांची दिवाळी गोड करू असे ही थोरात म्हणाले.

प्रास्ताविकात गणेश कारखान्याचे अध्यक्ष सुधीर लहारे म्हणाले, माजी मंत्री थोरात व विवेक कोल्हे यांनी गणेश च्या कार्यक्षेत्रात ७० ते ८० टन ऊस उपलब्ध असताना, स्वतःच्या कार्यक्षेत्रातील एक – एक लाख टन ऊस गणेशला देऊन पहिला हंगाम यशस्वी केला. दोन्ही कारखान्यांचे गणेश ला मोठे सहकार्य आहे. या दोन्ही नेत्यांना बघूनच सभासदांनी सत्ता दिली. गणेश कारखान्याला मोठा संघर्ष करावा लागत आहे. दोन्ही नेत्यांच्या सह माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांचे मोठे योगदान आहे. त्या मुळेच कारखाना कामगारांचे पैसे देऊ शकला. कामगारांनी ही जबाबदारीने वागावे. तरच सभासदांचा विश्वास राहील.

या वेळी विषय पत्रिकेवरील सर्व विषय मंजूर झाले. विखे समर्थक सभासद उपस्थित नसल्याचे दिसून आले. विविध विषयावर झालेल्या चर्चेत शिवाजीराव लहारे, दादासाहेब सांबारे, नानासाहेब शेळके, वाल्मिक तुरकणे, रमेश गागरे, अशोक पठारे, सर्जेराव जाधव, अविनाश दंडवते, शरद कडू, भगवान नळे, उत्तमराव घोरपडे, दिलीप क्षीरसागर, लताताई डांगे, प्रा. लक्ष्मण डांगे, चंद्रभान धनवटे, आदि सभासदांनी सहभाग घेतला. यावेळी निळवंडे साठी प्रयत्न केले म्हणून माजी मंत्री थोरात यांच्या अभिनंदनाचा ठराव नानासाहेब शेळके यांनी मांडला.

निळवंडे धरणाला दत्ता देशमुख यांचे नाव द्यावे असा ठराव प्रा. लक्ष्मण डांगे यांनी मानला तर लताताई डांगे यांनी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी एनसीडीसी चे कर्ज मिळवून दिल्याने त्यांच्या अभिनंदनाचा ठराव लताताई डांगे यांनी मांडला. कामगारांचे देणे दिल्याने अविनाश दंडवते यांनी थोरात, विवेक कोल्हे, व संचालक मंडळाचे अभिनंदन करणारा ठराव मांडला. चंद्रभान धनवटे यांनी बिपीनदादा कोल्हे यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला.

सूत्रसंचालन सेक्रेटरी नितीन भोसले यांनी केले. तर आभार व्हा. चेअरमन विजय दंडवते यांनी मानले. या प्रसंगी संचालक भगवानराव टिळेकर, मधुकर सातव, बाबासाहेब डांगे, संपतराव चौधरी, सौ. शोभाताई गोंदकर, गंगाधर डांगे, संपतराव हिंगे, बाळासाहेब चोळके, नानासाहेब नळे, महेंद्र गोर्डे, विष्णुपंत शेळके, अरुंधतीताई फोपसे, अनिल गाढवे, श्रीमती कमालताई धनवटे, आलेशराव कापसे, ज्ञानदेव चोळके, यांचे सह जयराज दंडवते, विक्रम दंडवते, अनिल बोठे, रामचंद्र बोठे, सुभाष सदाफळ, विलासराव टिळेकर, राजेंद्र कोल्हे, शंकरराव जेजुरकर, संजय शेळके, संजय भवर आदिसह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.