कोपरगाव प्रतिनिधी, दि. १२ : देशातील पहिला सहकारी तत्वावर उभारलेला सीबीजी प्रकल्प संजीवनी उद्योग समूहाने साकारला असून, या ऐतिहासिक उपक्रमाचे उद्घाटन केंद्रीय सहकार मंत्री अमितभाई शहा यांच्या हस्ते नुकतेच झाले. या सोहळ्यानंतर राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष (कॅबिनेट मंत्री दर्जा) आणि शेतकरी नेते पाशा पटेल यांनी संजीवनी उद्योग समूहाचे युवा नेते विवेक कोल्हे यांची सदिच्छा भेट घेत अभिनंदन करून सत्कार केला.

या प्रसंगी पाशा पटेल यांनी बांबूपासून बनवलेले घड्याळ आणि पेन भेट देत अनोख्या पद्धतीने शुभेच्छा व्यक्त केल्या. त्यांनी विवेक कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या सीबीजी प्रकल्पाच्या यशस्वी आयोजनाचे मनःपूर्वक कौतुक करत, सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण विकासाची नवी दिशा दाखवल्याबद्दल अभिनंदन केले.

भेटीदरम्यान बांबू लागवड आणि त्याच्या औद्योगिक उपयोगांवर विस्तृत चर्चा झाली. बांबू हे कमी पाणी आणि कमी देखभालीत येणारे पीक असल्याने, विशेषतः कोरडवाहू भागातील शेतकऱ्यांसाठी ते कसे वरदान ठरू शकते, यावर विचारमंथन झाले. बांबू क्षेत्रातील संधी, शासकीय अनुदान धोरणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी आवश्यक उपाययोजना यावरही सविस्तर चर्चा करण्यात आली.

पाशा पटेल यांनी बांबू लागवडीला शेतीतील एक क्रांतीकारी पर्याय म्हणून प्रोत्साहन देण्याची गरज व्यक्त केली. बांबूच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना आर्थिक स्थैर्य मिळवून देताना पर्यावरणाचे संतुलन राखण्यावर भर देण्यात आला.या प्रसंगी शिवाजीराव दिवटे, गवळी साहेब आदी मान्यवर उपस्थित होते.संपूर्ण वातावरण सहकार भावना, शेतकरी हित आणि पर्यावरणपूरक विचारांनी भारावले होते.


