एकट्या गोदावरी खोऱ्यातून जायकवाडीला गेले शंभर टीएमसी पाणी

 नाशिक जिल्ह्यातील सर्व धरणं तुडुंब

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २९ : एकट्या गोदावरी खोऱ्यातून जायकवाडी धरणात या चालु पावसाळ्यात तब्बल शंभर टीएमसी पाणी वाहुन गेल्याने जायकवाडीचे नाथसागर गोदावरीमुळे शंभर टक्के भरण्याचा विक्रम झाला आहे.  या वर्षीच्या पावसाळ्यात नाशिक जिल्ह्यातील धरण परिसरात जोरदार पाऊस झाल्यामुळे गतवर्षी पेक्षा या वर्षी जायकवाडी धरणात विक्रमी पाणी वाहुन गेले आहे. त्यामुळेच एकट्या गोदावरी खोऱ्यातील पाण्यामुळे जायकवाडी धरण शंभर टक्के भरले आहे.

 नेहमी नगर, नाशिक विरुद्ध मराठवाडा  हा पाण्याचा  संघर्ष दरवर्षी लक्षवेधी ठरायचा पाणी बचाव समिती असो किंवा मराठवाड्यातील विविध संघटना यांच्यासाठी राजकरण करण्याचे भांडवल म्हणजे समन्यायी पाणीवाटप पण यावर्षी थेट निसर्गाने हा संघर्ष मिटवला असुन किमान यावर्षी तरी पाण्यावरून संघर्ष अथवा पाणी पळवापळवी, वळवावळवी होणार नाही. मराठवाड्याची संपूर्ण तहाण निसर्गाने भागवली असुन पिण्याच्या पाण्या बरोबर सिंचनाचा प्रश्न मिटला आहे.

मराठवाड्यासह  राज्यातील बहुतांश ठिकाणी अजुनही मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसाला नागरीक वैतागले आहेत. सध्या शेतात, ओढ्या नाल्यासह  नदीला पाणीच पाणी असल्यामुळे पाण्याची मागणी कमी झाली आहे. यावर्षी धरणातील उपयुक्त पाणी साठे मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने पाण्याची कमतरता कुठेही भासणार नाही. शेतीसाठी व पिण्यासाठी धरणातून सोडावे लागणारे सर्व आवर्तन वेळेवर सुटण्याची शक्यता दाट आहे.

सध्या नाशिक जिल्ह्यातील धरणांमध्ये  दारणा धरणासह, वाकी, भाम, भावली, वालदेवी, कश्यपी, गौतमी, कडवा, आळंदी, भोजापूर, करंजवण ओझरखेड, वाघाड, तिसगाव ,केळझर, हरणबारी, पुणंगाव ही धरणे शंभर टक्के भरली आहेत तर मुकणे ९६.८५ टक्के, गंगापूर ९६.५४ टक्के, पालखेड ९५.२५ टक्के भरले आहेत. नाशिक जिल्ह्यातील धरण परिसरात सध्याचा उपलब्ध उपयुक्त पाणी साठा ९८.८७ टक्के इतका आहे. सध्यातरी  या परीसरात पावसाचा जोर कायम असल्याने नांदूरमधमेश्वर  बंधाऱ्यातुन गोदावरी नदी पाञातून पाण्याचा प्रवाह ६ हजार ३१० क्युसेक्स वेगाने सुरुच आहे. त्यामुळे जायकवाडी धरणाकडे गोदावरी खोऱ्यातील पाणी नदीपाञातुन झेपावत आहे.

 दरम्यान  १ जून २०२५ पासुन आजपर्यंत गोदावरी खोऱ्यातील पाणी नांदूरमधमेश्वर बंधाऱ्यातून जायकवाडी धरणाच्या दिशेने १ लाख ८०१ द.ल.घ. फु. अर्थात १०० टीएमसी पाणी वाहुन गेले आहे. सरासरी ११ लाख ६६ हजार २६५ क्युसेक्स  इतके पाणी नदीतून प्रवाहीत झाले. एकट्या दारणा धरणातून २९.१४१ टीएमसी पाणी जायकवाडी धरणात वाहुन गेले आहे.

 यावर्षी विक्रमी पावसाची नोंद झाली असून नाशिक धरण परिसरातील भावली येथे सर्वाधिक ४ हजार ९३१ मि.मी. पाऊस १ जून ते २८ ऑक्टोबर २०२५ पर्यंत पडला आहे त्या खालोखाल इगतपुरी – ४ हजार ६२३ मि.मी., अंबोली – ३ हजार ९९३ मि.मी., भाम – ३ हजार ५२० मि.मी. , घोटी – ३हजार २१९ मि.मी. , ञ्यंबकेश्वर – ३ हजार ५१ मि.मी., वाकी -२ हजार  ८७० मि.मी. इतकी पावसाची विक्रमी  नोंद यावर्षी  झाली आहे.

आजुनही पावसाचा जोर कायम असल्याने हे विक्रम मोडीत निघण्याची शक्यता दाट आहे.  सध्या ६ हजार ३१० क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग आजूनही नांदूरमधमेश्वर बंधाऱ्यातून गोदावरी नदीपात्रात सुरु असल्याने जायकवाडी धरण एकट्या गोदावरी खोऱ्यातील पाण्याने संपूर्ण भरण्याचा विक्रम यावर्षी झाला आहे.

Leave a Reply