विरोधकांच्या अडथळ्यांवर मात करत गणेश कारखान्याचा गळीत हंगाम सुरू
कोपरगाव प्रतिनिधी, दि. १ : गणेश सहकारी साखर कारखान्यावर निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर, गणेशचा तिसरा गाळप हंगाम व्यवस्थितरित्या पार पाडत आहोत. पहिल्या दोन गळीत हंगामांना कोणत्या अडचणी आल्या, हे वेगळे सांगायची काही गरज नाही; प्रत्येक सभासदांपर्यंत ही गोष्ट पोहोचली आहे. खऱ्या अर्थाने सहकाराची पंढरी म्हणून ओळखला जाणाऱ्या अहिल्यानगर जिल्ह्याने संपूर्ण महाराष्ट्रासमोर अनेक आदर्श ठेवले आहेत. सहकार महर्षी स्वर्गीय शंकरराव कोल्हे साहेब, कर्मवीर शंकरराव काळे, पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील, सहकार महर्षी स्वर्गीय भाऊसाहेब थोरात या ज्येष्ठ मार्गदर्शक मंडळींनी सहकार्याची मूल्ये जपण्याचे काम या जिल्ह्यात केले, असे प्रतिपादन सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विवेक कोल्हे यांनी केले. श्री गणेश सहकारी साखर कारखान्याचा सन २०२५-२०२६ च्या ऊस गळीत हंगामाचा शुभारंभ शनिवार, दिनांक १ रोजी गव्हाणीत मुळी टाकून संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते.

या शुभारंभ प्रसंगी गुरुवर्य ह.भ.प. महंत रामगिरीजी महाराज आणि क. कु. माधवीताई गुरुगोदावरी व कन्यावृंद श्री. उपासनी कन्याकुमारी यांनी उपस्थित राहून आशीर्वाद दिले. माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली विवेक कोल्हे यांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न झाला. यावेळी अध्यक्ष सुधीरराव लहारे, उपाध्यक्ष विजयराव दंडवते, ज्येष्ठ नेते गंगाधर चौधरी, शिवाजीराव लहारे, डॉ.एकनाथ गोंदकर अॅड. नारायणराव कार्ले, कार्यकारी संचालक जी.बी. शिंदे, संचालक बाबासाहेब डांगे, गंगाधर डांगे, संपतराव हिंगे, बाळासाहेब चोळके, महेंद्रराव गोर्डे, नानासाहेब नळे, विष्णुपंत शेळके, अरुंधतीताई फोपसे, संपतराव चौधरी, अनिलराव गाढवे, शोभाताई एकनाथराव गोंदकर, कमलताई धनवटे, मधुकरराव सातव, आलेश कापसे, ज्ञानदेव चोळके आदीसह आजी माजी संचालक, सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, ऊस तोड कर्मचारी, कारखाना अधिकारी कर्मचारी, पत्रकार आदींसह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गणेश सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगाम शुभारंभावेळी उपस्थित राहून आशीर्वाद देताना महंत रामगिरीजी महाराज म्हणाले की, श्री गणेशाच्या कृपेने हा गळीत हंगाम निर्विघ्नपणे पार पडेल, अशी आपण सर्वांनी गणेशाच्या चरणी प्रार्थना करूया. कारखान्यासमोरील अडचणी हळूहळू कमी होत चालल्या आहेत. या अडचणीतून बाहेर पडण्यासाठी व्यवस्थापनाचे प्रयत्न सुरू आहेत. गणेश कारखाना या अडचणींवर मात करून निश्चितपणे यशस्वीपणे चालेल, असा विश्वास वाटतो.पुढे ते म्हणाले की, “गणेश हे निर्विघ्न कार्य सिद्ध करणारे देवता आहेत. ‘गणं’ म्हणजे समूह आणि ‘ईश’ म्हणजे अधिपती असा त्यांचा अर्थ आहे. बुद्धीचे देवता म्हणून गणेश आपल्याला मार्गदर्शन करतात. त्यामुळे हा कारखान्याचा हंगाम यशस्वी होण्यासाठी, विघ्न आणणाऱ्यांनाही गणेश सद्बुद्धी देवो, असे भावपूर्ण प्रतिपादन करत महंत रामगिरीजी महाराज यांनी सर्वांना आशीर्वाद दिले.

शेजारील पाण्याने संपन्न असलेला नाशिक जिल्हा या ठिकाणी एकही सहकारी तत्त्वावरील साखर कारखाना चालू नसून, अगदी एनडीडीसी जिल्हा सहकारी बँक देखील बंद पडलेली आहे. परंतु नगर जिल्हा याला अपवाद म्हणून पाहिला जातो. स्व. कोल्हे साहेब व स्व. काळे साहेब यांनी शेतकरी हितामध्ये कधीही राजकारण आणले नाही. कितीही वैचारिक मतभेद असले तरी ते व्यासपीठापुरते मर्यादित ठेवायचे. संस्थेच्या हिताचा प्रश्न आला तर ते आपले वैचारिक मतभेद व राजकीय जोडे बाजूला ठेवून, कारखाना, सोसायटी किंवा वेगवेगळ्या संस्था, जिल्हा बँक, सहकारी संस्था यांमध्ये राजकारण न आणता समन्वय साधत होते.

त्याच भावनेने आम्ही श्री गणेश सहकारी साखर कारखान्याच्या कार्यभाराला सामोरे गेलो. निवडणुकीच्या निकालानंतरही त्याचे परिणाम आम्हाला भोगावे लागत आहेत. पहिले दोन हंगाम गणेश कारखान्याला कर्ज मिळाले नाही. संजीवनी उद्योग समूह तसेच माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांचे सहकार्य लाभले. पहिल्याच हंगामाला गणेश कारखान्याचा दुरुस्ती व देखभाल कमी कालावधीत करून, व्यवस्थित आर्थिक नियोजन करून पहिला हंगाम पार पाडला. पहिल्या सीझनला उच्चांक रिकव्हरी मिळाली आणि दोन लाखा मे. टनहून अधिक उसाचे क्रशिंग केले.

त्यावेळी ऊस तोडणी कामगारांनी कारखाना सुरू होईल की नाही यावर शंका व्यक्त करत तोडणीसाठी पाठ फिरवली होती. परंतु हे सर्व न थांबवता संजीवनी सहकारी साखर कारखाना व सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या उसाच्या टोळ्या गणेश कारखान्याच्या कार्यक्षेत्रात उतरवल्या आणि दोन्ही सीझनला क्रशिंग करून गणेश कारखान्याचे उद्दिष्ट साध्य केले.दुसऱ्या सीझनच्या वेळी जिल्हा बँकेकडून कर्ज नाकारण्यात आले. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून पाठपुरावा करून कर्ज मिळवण्यासाठी सहकार्य करण्याची भूमिका घेण्यात आली आणि यामधूनच मागचा २०२४-२०२५ चा सीझन पूर्णत्वास आला. मात्र, मध्य मुदत कर्ज मिळाले नसल्यामुळे आधुनिकीकरण तात्काळ करता आले नाही. यामुळे बॉयलरच्या तसेच अनेक अडचणी आल्या. २०२५-२०२६ च्या सीझनमध्ये आधुनिकीकरण करणे अत्यंत गरजेचे झाले होते.यासाठी धावपळ सुरू झाली.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची याबाबत भेट घेऊन अडचण सोडवण्याची मागणी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहकारी तत्त्वावरील साखर कारखान्यांना राजकारणाविरहित सहकार्य केलेले आहे, असे सांगत, अधिकचा खर्च पुरवठा करण्याची मागणी केली. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीने ७४ कोटी कर्ज मंजूर केले.२०२५-२०२६ च्या गळीत हंगामाच्या सीझनमध्ये अनेक कामे हाती घेण्यात आली आहेत. कर्मचाऱ्यांचा पगार नऊ ते दहा कोटी रुपये वाटप केले आहे.आणि दोन लाख मे.टन ऊस क्रशिंग केली तर जवळपास सातशे रुपये पगाराचा भार प्रतिटनावर पडतो.यासाठी क्रशिंग क्षमता वाढवणे गरजेचे आहे.

३५५० रुपये रिकव्हरीला एफआरपी मिळते, ती वाढविण्यात आलेली असून ३७५० रुपयांपर्यंत एफआरपी बसते. वाहतूक खर्च ११०० रुपये प्रमाणे सुरू असून, त्यातून एफआरपी ठरवून २७५० इतकी निघते.फक्त साखर आणि मळी हे दोनच उत्पादन कारखान्यात मिळते. या जोरावर इतर कारखान्यांशी स्पर्धा करायची आहे. हिशोब केला तर सगळा खर्च वजा जात जाऊन देखील आपल्याला आर्थिक चणचण जाणवते. यावर्षी ३ हजार ते ३,३०० टन पर्यंत क्रशिंग करण्याचे उद्दिष्ट ठेवले असून, पुढील १२० दिवस कारखाने सुरू राहिल्यास साधारण चार लाख मेट्रिक टनांपर्यंत उसाच्या गाळपाचे उद्दिष्ट ठेवलेले आहे.
महाराष्ट्रात ५० हून अधिक सहकारी कारखाने बंद पडले आहेत. त्यामुळे अडथळे आणणाऱ्या शक्तींनी एकदा विचार केला पाहिजे. ते म्हणाले, “श्री गणेशाची सोंड एकदा फिरली की चांगल्या चांगल्याचा कार्यक्रम करते. त्यामुळे विरोधकांनी टप्प्यात येण्याची वाट पाहू नये. गणेशला अडथळा आणण्याच्या कुरघोड्या विरोधकांकडून सुरू आहेत. ‘गणेशला १७ कोटी भरल्याशिवाय लायसन्स देऊ नका’ अशी विरोधकांची मागणी आहे. ८० कोटी रुपये गणेश कारखान्यातून घेणे असल्यामुळे अनेक अडचणी येत आहेत.
मागील दोन वर्षांपासून तालुक्यातील व जिल्ह्यातील सर्व कारखान्यांच्या बरोबरीने गणेशने उसाला चांगला भाव दिलेला आहे. कर्मचारी कारखान्याची आत्मा असून, त्यांनी अत्यंत बिकट परिस्थितीतून कारखान्याला बाहेर काढले आहे. माजी कर्मचाऱ्यांचे दहा कोटी रुपये वाटून त्यांचे सर्व प्रश्न सोडवले. चालू वर्षात ११ टक्के विक्रमी बोनस देऊन कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला.

साखरेच्या धोरणात बदल झालेला असला तरी, आर्थिक दृष्टिकोनातून शेतकऱ्यांचा फायदा झालेला दिसून येतो. गणेश कारखान्यात पुढच्या वर्षी डिस्टिलरी सुरू करण्याचा मानस आहे. माजी मंत्री थोरात म्हणतात की, “आम्ही येथे सहकार चळवळ बळकट करायला आलोय, राजकारण करायला नाही.” परंतु सातत्याने अनेक कुरघोड्या आपल्या कारखान्यावर केल्या जात आहेत. जिल्हा बँकेत कर्ज मागणी केली असता, सर्व संचालक मंडळाच्या नावाने आज नोटीस आल्या.
विरोधकांना आवाहन करताना विवेक कोल्हे म्हणाले, “आपण आपली लाईन मोठी करावी, दुसऱ्याची खोडण्याचा प्रयत्न करून आपली मोठी दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न करू नये. संस्थेच्या कामकाजात कोणी आडवा येत असेल तर त्यालाही आम्ही आडवे गेल्याशिवाय राहणार नाही, असे स्पष्टपणे सांगत, हा वारसा स्वर्गीय शंकरराव कोल्हे साहेबांचा व स्वाभिमानी गणेश परिसराचा आहे, असे त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करावा. या माध्यमातून एकरी शंभर ते दीडशे टन उत्पादन व ७० ते ८० टक्के पाण्याची बचत दिसून येते. गणेश परिसरात फक्त ऊसापुरते मर्यादित न राहता, शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी या विचाराने फूड प्रोसेसिंग हब, सोयाबीन प्रक्रिया, मक्यावर आधारित प्रकल्प सुरू करण्याचा विचार सुरू आहे.अर्थकारणाची उपलब्धता झाल्यानंतर हे सर्व प्रकल्प सत्यात उतरवले जातील.यावेळी मतदारसंघातील जिल्हा परिषद निवडणूक व पंचायत समिती तसेच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असणाऱ्या सर्व उमेदवारांना विवेक कोल्हे यांनी शुभेच्छा देत, समाज व्यवस्था बळकट करण्याच्या दृष्टिकोनातून निवडणुकींना सामोरे जावे असा सल्ला दिला.

गणेशचे अध्यक्ष सुधीरराव लहारे म्हणाले, गणेश कारखान्यामध्ये श्री गणेशाचा वास आहे. जो चुकीचं काम करेल, त्यावर गणेशाची वक्रदृष्टी पडून सोंड फिरल्याशिवाय राहत नाही. हाती कोणती सत्ता नसताना, प्रचंड विरोध असताना युवा नेते विवेक कोल्हे यांनी गणेश कारखान्याचा रथ चालवत आहेत. खाजगी कारखाने व शेजारील कारखान्यांनी वाढवलेली क्षमता यामुळे सहकारी साखर कारखाने बंद पाडण्याचा मोठा षडयंत्र सुरू आहे. आपली कामधेनू वाचवण्यासाठी एफआरपीत वाढ झाली पाहिजे. साखर आणि मळीतून कारखाना चालवणे अत्यंत अवघड असून, या सर्वांतून अभ्यासाने युवा नेते विवेक कोल्हे वाट काढत आहेत, असे ते म्हणाले.


