चिकन मटण विक्रेत्यांच्या चुकीमुळे कुञ्यांच्या शिकारीसाठी बिबटे नागरी वस्ती
कोपरगाव प्रतिनिधी, दि. ८ : तालुक्यासह शहरात बिबट्यांचा वावर वाढल्याने सर्वञ बिबट्याच्या दहशतीने नगरीक चिंताग्रस्त झाले आहे. एका ऊसतोड मजुराच्या ४ वर्षीय मुलीचा बिबट्याने बळी घेतला तोही शहरापासून अगदी जवळच असलेल्या टाकळी फाटा परिसरात. या पुर्वी ही अनेकांवर जीवघेणा हल्ला बिबट्याने करुन मानवी जीवन धोक्यात आले अशातच ग्रामीण भागातील रानावनात फिरणारे बिबटे आता कोपरगाव शहरात खुलेआम शिकारीच्या शोधात फिरत आहेत.

खास करुन कुञ्याच्या शिकारीसाठी बिबटे कोपरगाव शहरात सर्वाधिक वेळा आल्याचे दिसुन आले आहे. शहरातील खडकी, दुल्हणबाई वस्ती, शंकरनगर, गोकुळ नगरी, बैल बाजार रोड, बसस्थानक परिसर साई सिटी, सुखशांती नगर,आढाव वस्ती, भारत गॅस परिसर आदी ठिकाणी बिबट्यांचा वावर सध्या सर्वाधिक आहे. शिवाय यापुर्वी अनेकवेळा बैल बाजार रोड, जनावरांचा बाजारतळ या ठिकाणी अनेकवेळा बिबट्याने नागरीकांना दर्शन घडवले कारण याच भागात सर्वाधिक जनावरांच्या कत्तल होत होती त्यामुळे कत्तल केल्यानंतर जनावरांच्या टाकाऊ मांस रस्त्याच्या कडेला व काट्यात तसेच कचऱ्याच्या ठिकाणी टाकले जाते तेच टाकलेले मांस खाण्यासाठी भटक्या कुत्र्यांच्या टोळ्या जमा होतात.

बिबट्यांना ग्रामीण भागात शिकार मिळाली नाही की, ते शिकारीच्या शोधात शहराच्या दिशेने झेपावतात त्यातही सध्या बिबटे कुञ्यांची शिकार सर्वाधिक करीत आहेत. शहरात टाकाऊ मांस विविध ठिकाणी मांस विक्रेते टाकुन देतात तिथे कुञे येतात आणि त्याच कुञ्यांची शिकार बिबटे करीत आहेत. नुकतेच शुक्रवारच्या राञी साडे आठ वाजता साई सिटी परिसरातील सरगम माॅल व आयटीआय काॅलेज परीसरात नागरीकांना बिबट्याचे दर्शन झाले. कारण साईसिटी येथील एक चिकन मटन विक्रेता कोंबडीचे व बोकडाचे टाकाऊ मटण त्याच भागातील काटवणात प्लास्टीकच्या पिशवीत भरुन टाकत असतो त्यामुळे तिथे कुञ्यांची सख्या वाढली आहे.

कुञ्यांच्या शिकारीसाठी बिबट्या तिथे आला होता. तसेच खडकी रोड शेजारील गवारे नगर व भारत गॅस जवळील चिकन मटण विक्रेते हेही रस्त्याच्या कडेला टाकाऊ मांस टाकत असल्याने याही भागात कुञ्यांच्या झुंडी रस्त्यावरच ठाण मांडून बसतात नागरीकांना रस्त्याने चालणे जिकिरीचे होते अशातच चार दिवसांपुर्वी राञी बिबट्या त्या भागात कुञ्याच्या शिकारीसाठी आला असतात कुञे तावडीतून पळून गेले तर बिबट्याने त्याच भागातील गुजराती गायीवाले यांच्या गायांच्या कळपात घुसल्याने मोकळ्या गायी सुखशांती नगर, साईसिटी कडे सुसाट धावत सुटल्या या भागातील नागरीकांना काहीच समजत नव्हते अचानक गायी का उधळतात बघेबघे पर्यंत बिबट्या गायब झाला.

या भागातील मोकळ्या जागेत मटन विक्रेते जाणुनबुजून टाकाऊ मांस टाकुण कुञ्यासह बिबट्याला आमंत्रण देत आहेत त्याचा परिणाम सर्वसामान्य नागरीकांच्या जीवावर होत आहे. सध्या तालुक्यात बिबट्याचे प्रमाण वाढले आहे. ते शिकारीच्या शोधात चहुबाजूंनी फिरत आहेत अशातच शहरातील मटण विक्रेते नागरीकांच्या जीवाला धोका निर्माण करीत आहेत. नगरपालीका प्रशासन या घटनेकडे कधी गांभीर्याने पहाणार. बिबट्याने एका मुलीचा बळी घेतला आता पुन्हा एखादा बळी घेतल्यानंतर कुञ्यासह मटण विक्रेत्यांच्या बंदोबस्त करणार काय असा सवाल सर्वसामान्य नागरीकांना पडला आहे.

बिबट्याच्या दहशतीने कोपरगावचे नागरीक भयभीत झाले आहेत. आरोग्य सुदृढ रहावे निरोगी रहावे म्हणून पहाटे व सायंकाळी साई सिटी, सुखशांती नगर परिसरात फिरणारे आता दिवसाही फिरताना दहशतीखाली फिरत आहेत. जर भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त केला, तसेच टाकाऊ मांस रस्त्यावर टाकणं बंद झालं तर बिबटे शहराकडे वळणार नाहीत. अन्यथा शहरात बिबट्यांचा सर्वाधिक वावर वाढून मोठ्या दुर्घटना होण्यास वेळ लागणार नाही.


