वाळु तस्करांचा कहर सरपंचावर जीवघेणा हल्ला

 कोपरगावमध्ये प्रशासनापेक्षा वाळु तस्करांची दादागिरी वाढली

कोपरगाव प्रतिनिधी, दि.१०: कोपरगाव तालुक्यातील एक वाळू तस्कराची दहशत इतकी वाढली आहे की, तो तालुक्यातील पोलीस व महसुली  अधिकाऱ्यांना त्याने घाम फोडला. एका तत्कालीन तहसीलदाराला वाळू हाप्ता देण्याच्या नावाखाली थेट तुरुंगाची हवा खाऊ घातली तर काही इतर अधिकारी, शासकीय कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकवून मला वाळू तस्करी करु नाही दिली तर मग मी कुठे ना कुठे अडकणार असा इशारा दिल्यासारखे वावरणारा वाळू तस्कर योगेश कोळपे यांची दहशत इतकी वाढली की त्याने व त्याच्या सहकार्याने चक्क सरपंचावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली.

या घटनेची पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, तालुक्यातील शहाजापूर ग्रामपंचायतीचे सरपंच सचिन भाऊसाहेब वाबळे (वय-४१) यांना शहाजापूर-पाथरे रोडवर दळवी शेडजवळ गणेश शिवाजी नवले, योगेश संजय कोळपे व अन्य दोन अनोळखी इसम यांनी जीवे मारण्याचा प्रयत्न केला असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यातील दोघा आरोपींना अटक केली आहे. वाळू तस्करांकडून सरपंचावरच जीवघेणा हल्ला झाल्याने शहाजापूर परिसरात एकच खळबळ उडाली असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

शहाजापुरचे सरपंच सचिन वाबळे यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहेत की मी रविवार दि.०८ ऑक्टोबर रोजी सकाळी ७.४५ वाजता आरोपी डंपर चालक गणेश शिवाजी नवले रा.कोळगाव थडी यास म्हणालो की, त्याचे ताब्यातील दहा टायर विना क्रमांकाचा डंपर तू गावातून जाताना हळू का चालवत नाही ? त्यावर त्याने आपल्या ताब्यातील डंपर सरपंचाच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न करत शिवीगाळ करून, लाथा बुक्क्यांनी मारहाण केली तर योगेश कोळपे याने आपल्या ताब्यातील काळ्या रंगाच्या काचाच्या स्कॉर्पिओ गाडीत येऊन फिर्यादीच्या डोक्यात दगड घालण्याचा व त्यास जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. त्यास अन्य दोघा अनोळखी इसमंनी मदत केली आहे. यात फिर्यादी सचिन कोळपे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे.

याबाबत कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ४७९/२३ भारतीय दंड विधान कलम ३०७ ,५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास तालुका पोलीस करीत आहे. तालुक्यातील पोलीस व महसुल प्रशासनाच्या दहशती ऐवजी वाळू तस्करांची दहशत वाढत असल्याची खंत नागरिक व्यक्त करीत आहेत.