विकसित भारत संकल्प यात्रेचे वारकरी म्हणून सर्वजण काम करू – स्नेहलता कोल्हे

कोपरगाव प्रतिनिधी, दि.२७ : समाजातील शेवटचा माणूस सुखी झाला पाहिजे, सर्वांचा विकास झाला पाहिजे, हे ध्येय बाळगून देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारच्या वतीने अनेक लोककल्याणकारी योजना सुरू करून सर्वसामान्यांना बळ दिले आहे. विकासाच्या प्रवाहाबाहेर असणाऱ्या वंचित लोकांपर्यंत या शासकीय योजना पोहोचाव्यात यासाठी ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ अत्यंत महत्त्वाची असून, आपण सर्वजण या यात्रेचे वारकरी म्हणून विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी काम केले पाहिजे, असे आवाहन माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी केले.

केंद्र सरकारच्या फ्लॅगशिप योजनांची माहिती जनसामान्यांना व्हावी व या योजनांचा पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ ही मोहीम देशभरात राबवली जात आहे. बुधवारी (२७ डिसेंबर) कोपरगाव शहरातील बाजारतळ भागात या यात्रेचे आगमन झाले असता स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते या यात्रेचे स्वागत करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी कोपरगाव नगरपरिषदेच्या वतीने स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरुपात धनादेश वितरीत करण्यात आले.  

स्नेहलता कोल्हे म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रूपाने आपल्या देशाला विकासाची दूरदृष्टी असलेले, समाजातील शेवटच्या घटकाचा विचार करणारे एक कार्यक्षम व कणखर नेतृत्व लाभले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचे नाव जगभरात उंचावले असून, ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास और सबका प्रयास’ हा मंत्र जपत ते समर्पित वृत्तीने देशाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी अहोरात्र काम करत आहेत.

त्यांनी गेल्या नऊ वर्षांत सर्वसामान्यांच्या विकासाला प्राधान्य देऊन आयुष्यमान भारत, प्रधानमंत्री आवास योजना, पीएम गरीब कल्याण योजना,  प्रधानमंत्री स्वनिधी योजना, प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजना, जन-धन योजना, उज्ज्वला योजना, दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय योजना, पंतप्रधान मुद्रा योजना, सुकन्या समृध्दी योजना, जलजीवन मिशन, पोषण आहार योजना, पंतप्रधान पथ विक्रेता आत्मनिर्भर निधी योजना, विश्वकर्मा योजना अशा असंख्य योजना यशस्वी करून दाखविल्या आहेत.

कोरोना संकटाच्या काळात पंतप्रधान मोदी यांनी देशातील प्रत्येक व्यक्तीला मोफत कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध करून दिली. तसेच गरिबांना मोफत अन्नधान्य पुरवले. छोटे उद्योग वाचवण्यासाठी कोट्यवधींची मदत दिली. पीएम स्वनिधी योजनेच्या माध्यमातून छोट्या व्यावसायिकांना स्वस्त व सुलभ दरात कर्जवाटप केले. भारताने पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात विकासाच्या बाबतीत मोठी झेप घेतली आहे. सन २०१४ मध्ये अर्थव्यवस्थेच्या बाबतीत जगात १० व्या क्रमांकावर असलेली भारताची अर्थव्यवस्था आज मोदी सरकारच्या कार्यकाळात जगात पाचव्या क्रमांकावर पोहोचली आहे.

गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत केंद्र सरकारने गेल्या नऊ वर्षांत ४ कोटींहून अधिक घरे बांधली आहेत. जलजीवन मिशनच्या माध्यमातून प्रत्येक घरापर्यंत स्वच्छ पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी देशभरात कोट्यवधींच्या योजना यशस्वीरीत्या राबविल्या आहेत. देशातील कोट्यवधी कुटुंबांना कुठल्याही शासकीय कार्यालयात वारंवार हेलपाटे न मारता सरकारी योजनेचा शंभर टक्के लाभ मिळत असून, ‘मोदी की गॅरंटी म्हणजे पूर्ततेची हमी’ यावर जनतेचा ठाम विश्वास बसला आहे.

आतापर्यंत शासकीय योजनांचा लाभ न मिळालेल्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ हे एक उत्तम माध्यम आहे. या यात्रेच्या माध्यमातून सर्व शासकीय यंत्रणांनी केंद्र सरकारच्या विविध योजनांबाबत जनजागृती करून पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळवून द्यावा. तसेच गरजू नागरिकांनी सरकारच्या कल्याणकारी योजनांचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन कोल्हे यांनी केले. याप्रसंगी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक शांताराम गोसावी, गोदामाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष व स्वच्छतादूत आदिनाथ ढाकणे,

भाजपचे शहराध्यक्ष डी.आर.काले, माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, शिवसेना नेते कैलास जाधव, माजी उपनगराध्यक्ष योगेश बागुल, स्वप्नील निखाडे, माजी नगरसेवक अतुल काले, जितेंद्र रणशूर, वैभव आढाव, गोपीनाथ गायकवाड, जयेश बडवे, विजय चव्हाणके, साईनाथ नरोडे, संतोष साबळे, रहीम शेख, तात्या राऊत, सुरेखा सूर्यवंशी, सरिता चोपडा, सतीश नरोडे, सचिन सावंत, जयप्रकाश आव्हाड, संतोष नेरे, गोरख देवडे आदींसह माजी नगरसेवक, भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध योजनांचे लाभार्थी व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

नगरपरिषदेच्या वतीने नागरिकांना सरकारच्या विविध योजनांची माहिती यावेळी देण्यात आली. प्रारंभी मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी स्नेहलता कोल्हे यांचा सत्कार केला, तर स्वच्छतादूत आदिनाथ ढाकणे यांचा नगरपरिषदेच्या वतीने स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. सूत्रसंचालन उपमुख्याधिकारी ज्ञानेश्वर चाकणे यांनी केले.