आरोग्य विभागाने सतर्क राहून आयुष्यमान भारत योजनेच्या वेग वाढवावा – आमदार काळे

कोपरगाव प्रतिनिधी, दि.२७ : कोरोनाच्या नव्या ‘जेएन1′ व्हेरिएंटचा महाराष्ट्रात शिरकाव झाला आहे. हा नवा व्हेरिएंट सौम्य असला तरीही आरोग्य विभागाने आपली यंत्रणा अलर्ट मोडवर ठेवावी अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी आरोग्य विभागाला दिल्या असून आयुष्यमान भारत योजनेच्या अंलबजावणीचा देखील वेग वाढविण्याच्या सूचना दिल्या आहेत.

कोरोनाच्या जे एन १ ह्या नवीन व्हॅरीएन्टचा मागील काही दिवसांपासून देशभरात वाढत असलेल्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर आ. आशुतोष काळे यांनी तहसील कार्यालयात आरोग्य विभागाची बैठक घेवून आढावा घेतला याप्रसंगी उपस्थित आरोग्य अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. ते म्हणाले की, कोरोनाच्या जे एन १ ह्या नवीन व्हॅरीएन्ट आला असला तरी नागरिकांनी घाबरून जाऊ नये. कोरोनाच्या पहिल्या, दुसऱ्या लाटेचा आपण यशस्वीपणे मुकाबला केलेला आहे. आरोग्य विभागाला आवश्यक असणारे सर्व साहित्य उपलब्ध करून दिलेले आहे. त्यामुळे नागरिकांना भीती बाळगण्याची गरज नाही. नागरिकांनी सावधगिरी बाळगावी व गर्दीच्या ठिकाणी जाताना काळजी घ्यावी असे आवाहन केले.

यावेळी त्यांनी कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत खरेदी करण्यात आलेल्या वैद्यकीय साहित्याचा आरोग्य अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाला सज्ज राहण्याच्या सूचना उपस्थित अधिकाऱ्यांना त्यांनी दिल्या. यावेळी नैसर्गिक आपत्तीत मृत्यू झालेल्या नागरिकांच्या वारसांना आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते शासकीय मदतीचे धनादेश देण्यात आले.

यावेळी गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, नायब तहसीलदार प्रफुल्लता सातपुते, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विकास घोलप, ग्रामीण रुग्णालय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसौंदर, पंचायत समिती आरोग्य अधिकारी पंडित वाघिरे, कांडेकर, रवींद्र चौधरी, माजी नगरसेवक हाजी मेहमूद सय्यद, प्रशांत वाबळे, वाल्मिक लहिरे, मनोज नरोडे, विकास बेंद्रे, महेश उदावंत, राजेंद्र आभाळे, सागर लकारे, अमोल आढाव, संतोष शेजवळ आदी उपस्थित होते.