कोपरगाव प्रतिनिधी, दि. १२ : येथील साईबाबा मंदिर परीसरातील द्वारकामाईमध्ये साईंबाबांच्या धुनीच्या सानिध्यात एक दृष्टीहीन मुलाला दृष्टी मिळाल्याचा चमत्कार झाल्याची चर्चा आहे. या कथित चमत्कारास संस्थानने पाठीशी घालु नये, असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पञकात केली आहे.

अधिक माहिती अशी की, उत्तराखंड येथुन आलेल्या अंकुश सेन या अल्पवयीन मुलाने आईसोबत साईदर्शन घेतले. सदर मुलगा एका डोळ्याने अंध होता, असे सांगितले गेले. परंतु द्वारकामाई येथे दर्शनाने त्याला दृष्टी मिळाली. भक्तांनी हा कधित चमत्कार पाहून सोशल मिडीया व प्रसार माध्यमात पसरवला.

महाराष्ट्र अंनिस या कधित चमत्काराचे सत्यशोधन करु इच्छिते. संस्थानचा या कथित चमत्कारास पाठिंबा असल्यास आपले प्रशस्त नेत्ररुग्णालय बंद करुन अंध व्यक्तींना चमत्काराच्या माध्यमातुन दृष्टी प्रदान करण्यासाठी प्रयत्न करावे. सत्यशोधनासाठी आम्ही साईबांबाचे भक्त असलेले पाच नेत्रहीन व्यक्ती पुरवतो. त्यास चमत्काराने दृष्टी आल्यास आम्ही जनतेतुन गोळा केलेले एकवीस लाखाचे बक्षीस देऊ व आमची चळवळ बंद करु.याबाबत संस्थानने खंबीर भुमिका घेऊन आपले भत जाहिर करावे.

खरे तर मागिल वर्षांपासून साईबाबा संस्थानच्या रुग्णालयात नेत्रदान मोहिम सुरु झालेली आहे.अंधव्यक्तींना दृष्टी प्रदान करण्याचे मानवतावादी कार्य केले जाते. हे निश्चितच अभिनंदनीय आहे.आम्ही सुध्दा या मोहिमेचा प्रचार-प्रसार करतो. त्यामुळे एका बाजुने विज्ञान तर दुसर्या बाजुने कथित चमत्कार अशी विसंगत भुमिका संस्थानने घेऊ नये, अशी अंनिसने विनंती केली आहे.

अंनिसने या अगोदर साईबाबांचे नाव घेत भोंदुगीरी करणाऱ्यांची भोंदुगिरी बंद करुन साईसंस्थानला अधिक उन्नत केले आहे व काही कधित चमत्काराची पोलखोल केलेली आहे. साईबाबांची भक्तांतील स्थान अबाधित राहण्यास मदत केली आहे. त्यामुळे साईबाबा संस्थानने पत्रक काढून या चमत्कारास पाठिंबा न देण्याची भुमिका घ्यावी, असे आवाहन महाराष्ट्र अंनिसचे राज्य कार्यवाह, कृष्णा चांदगुडे यांनी केला आहे.

आमचा विरोध साईबाबांवरील श्रद्धेला नसुन त्यांच्या नावाखाली वारंवार होणाऱ्या कथित चमत्कारास आहे. असे अनेक प्रकार समितीने हाणून पाडले आहे. त्यामुळे आतातरी संस्थानने सत्याची बाजू घेत आपली भुमिका जाहिर करावी असेही कृष्णा चांदगुडे राज्य कार्यवाह, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांनी सांगितले.


