गाडी पेटलेल्यामुळे नगर- मनमाड महामार्गावर मध्यरात्री चक्का जाम, प्रवाशांची हाल
कोपरगाव प्रतिनिधी, दि. १५ : कोपरगाव तालुक्यातील येसगाव शिवारातील भास्कर वस्ती जवळील परीसरात नगर-मनमाड महामार्गावर मध्यरात्री आराम बस व चारचाकी गाडीची समोरासमोर जोराची धडक लागुन भिषण अपघात घडला. या अपघातात चारचाकी गाडीने पेट घेतल्याने गाडीसह चालकाचा जळून कोळसा झाला. चालक मुजाईद पप्पु शेख या तरुणाचा दुर्दैवी मृत्यु झाला तर आराम बसबधील काही प्रवाशी किरकोळ जखमी झाले आहेत.

या घटनेची अधिक माहीती देताना तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी म्हणाले की, येसगाव शिवारातील नवले वस्ती जवळील भास्कर वस्ती परिसरात शुक्रवारी मध्यराञी शिर्डी कडून इंदौर कडे जाणारी हंस कंपनीची एक आराम बस प्रवाशी घेवून चालली होती तर मदीना चौक विंचुर ता. निफाड जि. नाशिक येथील मुजाईद पप्पु शेख हा २७ वर्षीय युवक आपल्या पत्नीकडे श्रीरापुरला भेटण्यासाठी चारचाकी ने येवल्याकडून कोपरगावच्या दिशेने जात असताना अचानक चारचाकी व आराम बसची समोरासमोर जोराची धडक लागुन अपघात झाला.

दोन्ही गाड्या प्रचंड वेगात असल्यामुळे दोन्ही गाड्यामध्ये इतकी जोराची धडक बसली कि चारचाकी गाडीची स्टेरिंग व एअर बॅग थेट आराम बसच्या कऍबिनमध्ये जावून पडली. या भिषण अपघातात चारचाकी गाडीने पेट घेतला. चारचाकी गाडी ही पेट्रोलवर असल्याने आगीचा भडका जास्तच झाला. अपघातामुळे चारचाकी गाडी ऑटोलॉक झाल्याने गाडीतील चालक मुजाईद शेख हा पेटत्या गाडीत अडकुन पडला. अपघाताच्या आवाजाने परिसरातील नागरीकांनी व बसमधील प्रवाशांनी शेख याला गाडी बाहेर काढण्याचा अनेकवेळा प्रयत्न केला तोपर्यंत आगीचा भडका वाढल्याने सर्वांचीच पळापळ झाली.

महामार्गावरच आगीचे रौद्ररूप पाहुन मोठे अग्नितांडव होण्याचे चिन्ह दिसु लागले स्थानिक नागरीकांनी शहर पोलीसांना घटनेची माहीती कळवली तसेच सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या व कोपरगाव नगरपालीकेच्या अग्निशमन दलाला घटनेची माहीती कळतात तातडीने सर्वांनी घटनास्थळी धाव घेवून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यशस्वी झाले तर पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार व त्यांच्या फौजफाट्याने घटनेचे गांभिर्य ओळखुन महामार्गावरील वाहने सुरक्षित राहतील व मोठी दुर्घटना होणार नाही याची खबरदारी घेत महामार्गावरील वाहतुक सुरक्षित व सुरळीत केल्याने मोठा अनर्थ टळला.

दरम्यान जळालेल्या चारचाकीतील चालक शेख याचा गाडीतच जळून दुर्दैवाने कोळसा झाला होता. त्याच्या हा भयानक मृत्यू अनेकांनी पाहीला, पण आगीच्या पुढे कोणीही वाचवू शकले नाही. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत होती. तर आराम बस मधील अनेक प्रवाशी मध्यराञी बिबट्याच्या खाईत व थंडीच्या लाटेत लहान मुलाबाळासह अबाल वृध्द कुडकुडत रस्त्यावर राञ काढली. दूरच्या प्रवासासाठी निघालेले अनेक प्रवाशी अपघात घडला तेव्हा झपेतच होते. अचानक मोठा आवाज झाल्यानंतर सर्वांची झोप उडाली आणि डोळे उघडून बघितले तर समोर अग्नितांडव दिसल्याने सर्वजन चक्रावून गेले होते.

दरम्यान चारचाकी गाडीतील मुजाईद पप्पु शेख याचा जळालेला मृतदेह कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात घेवून गेले असता तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. मोनिका पोतदार यांच्या खबरी वरुन तालुका पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्युचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आराम बसचा चालक घटना घडताच पळून गेल्याने पोलीस त्याचा शोध घेत असल्याचे सांगण्यात आले.


