कोपरगाव प्रतिनिधी, दि. ८ : श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयात विविध स्पर्धेतील विद्यार्थी-शिक्षक गुणगौरव सोहळा संपन्न झाला. या प्रसंगी राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन समारंभ निमित्ताने त्यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. याप्रसंगी १४ वर्षाखालील राष्ट्रीय क्रिकेट संघात कोपरगावचा अरमान इम्रान पठाण याची निवड झाल्याबद्दल विद्यालय आणि ठोळे उद्योग समूहातर्फे कोपरगाव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष कैलास ठोळे यांच्या हस्ते २१०० रु रोख बक्षीस व शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी अरमान याच्या निवडीचे कौतुक करून हा खेळाडू आपले भविष्यातील स्वप्न पूर्ण करील अशी अपेक्षा कैलास ठोळे यांनी व्यक्त केली.

नेस वाडिया कॉलेज पुणे यांच्या मार्फत घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेत विद्यालयाचा विद्यार्थी साई नारायण कुलकर्णी यांने ९९.६१ गुण मिळवून राज्य गुणवत्ता यादीत १५ वे स्थान मिळवले तसेच विद्यार्थिनी कु. दिपाली विजय आदमाने हिने उत्तेजनार्थ बक्षीस मिळवले. या दोन्ही विद्यार्थ्यांचा गौरव कैलास ठोळे आणि विद्यालयाचे मुख्याध्यापक रघुनाथ लकारे यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी कु. साई कुलकर्णी यास ठोळे उद्योग समूहातर्फे २१०० रु. रोख पारितोषिक देण्यात आले.

डाएट व एससीइआरटी यांच्या वतीने शिक्षक, अधिकारी व कर्मचारी यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये विद्यालयाच्या प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. श्वेताताई मालकर यांची व्यवसाय मार्गदर्शन व समुपदेशन मध्ये विभागीय पातळीवर निवड झाल्याबद्दल आणि विद्यालयाचे पर्यवेक्षक बलभिम उल्हारे याची राज्यस्तरीय सुगम संगीत गायन स्पर्धेत विभागीय पातळीवर निवड झाल्याबद्दल कैलास ठोळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाला स्कूल कमिटीचे चेअरमन चंद्रकांत ठोळे, कोपरगाव एज्युकेशन सोसायटीचे सचिव दिलीप अजमेरे, सहसचिव सचिन अजमेरे, आनंद ठोळे, डॉ. अमोल अजमेरे, संदीप अजमेरे आदी उपस्थित होते. या सर्वांनी यशस्वी विदयार्थी, शिक्षकाना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक रघुनाथ लकारे, उपमुख्याध्यापक अनिल अमृतकर, पर्यवेक्षक बलभिम उल्हारे तसेच विद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


