प्रभाग २ मधील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी हक्काचा माणूस पालिकेत हवा – आमदार काळे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १२ : कोपरगाव नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काका कोयटे आणि प्रभाग २ मधील नगरसेवक पदाचे उमेदवार राहुल शिरसाठ व स्मिता साबळे यांच्या कॉर्नर प्रचार सभेत आ.आशुतोष काळे यांनी नागरीकांशी संवाद साधला. यावेळी आ.आशुतोष काळे म्हणाले की, कोपरगाव शहरातील प्रभाग दोन मधील समतानगर परिसरातील रस्त्यांची दुरवस्था झाली होती. त्यामुळे रस्त्यांसाठी निधी देवून बहुतांश रस्त्यांची विकास कामे पूर्ण केली आहेत.पेव्हिंग ब्लॉक बसविण्याची कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित रस्त्यांची कामे आगामी काही महिन्यांत पूर्ण करण्याचे नियोजन असून यामुळे संपूर्ण प्रभागातील नागरिकांच्या अडचणी दूर होणार आहे.

पाणी पुरवठ्या संदर्भात बोलतांना त्यांनी २०१६ मधील परिस्थितीची आठवण करून दिली. पाच नंबर साठवण तलावाचे  काम पूर्ण करून शहराला तेवीस दिवसाआड मिळणारे पाणी आता चार दिवसाआड मिळू लागले आहे. एक ते चार नंबर तळ्याची खोली ३० फुटापर्यंत करून तळे सिमेंट काँग्रेटचे करायचे आहे. एक आणि दोन नंबर तळ्यावर सोलर प्लांट बसवून त्या माध्यमातून शहराला पाणी पुरवठा होणार आहे. यामुळे विजेचा खर्च कमी होऊन पालिकेचा आर्थिक बोजा कमी होईल यामुळे नागरिकांच्या पाणीपट्टीत वाढ होणार नाही असे आ.आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले.

कोपरगाव शहराच्या प्रमुख रस्त्यांचा विकास केला आहे त्याप्रमाणे उपनगरांना जोडणाऱ्या आणि उपनगरातील रस्त्यांचा देखील विकास होणार आहे. शहरामधील सर्व गटारी भूमिगत करून सांडपाण्यावर एसटीपी प्रकल्पाच्या माध्यमातून प्रक्रिया करून हे पाणी बांधकामासाठी, बगीच्यासाठी आणि शहरातील रस्ते आणि पेलव्हिंग ब्लॉक स्वच्छतेसाठी वापरून शहराला स्वच्छ आणि सुंदर  करणार आहे. शहराच्या प्रत्येक प्रभागात ओपन स्पेसमध्ये गार्डन तयार करून जॉगिंग ट्रॅक तयार करणार आहे. कोपरगाव शहराच्या  विविध विकासकामांना आवश्यक निधी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार उपलब्ध करून देतील.

विरोधकांनी शहरातील २८ विकासकामांच्या विरोधात ठराव घेऊन विकासकामांना न्यायालयातून स्थगिती  मिळविली यामध्ये प्रभाग दोन मधील चार रस्त्यांचा समावेश होता. प्रत्येक चांगल्या कामात खोडा घालण्याची त्यांची वृत्ती असल्याने चाळीस वर्षात त्यांनी कोपरगाव शहराचे अनेक प्रश्न जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवले आहे. प्रभाग २ मधील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी आपल्या हक्काचा माणूस पालिकेत असणे गरजेचे आहे यासाठीच राष्ट्रवादीचे उमेदवार हे जनतेच्या घरातील आणि मनातील आहेत. राष्ट्रवादीच्या नगराध्यक्ष पदाच्या आणि नगर सेवक पदाच्या उमेदवारांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन आ. आशुतोष काळे यांनी या वेळी नागरिकांना केले.

याप्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काकासाहेब कोयटे म्हणाले की, कोपरगावचा विकास आ.आशुतोष काळे यांच्या माध्यमातून होत आहे म्हणून आपण सगळ्यांनी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत राज्यात पाच नंबरचे ऐतिहासिक मताधिक्य देऊन त्यांना निवडून दिले आहे. त्याचप्रमाणे आता कोपरगाव नगरपालिकेची सत्ता आ.आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली असणे गरजेचे आहे. शहराचा विकास हेच एक ध्येय ठेऊन आम्ही सगळे निवडणूक लढवत असल्याचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काका कोयटे यांनी सांगितले आहे.

यावेळी राष्ट्रवादी शहराध्यक्ष सुनिल गंगुले, संदीप कोयटे, प्रकाश दुशिंग, राजेंद्र खैरनार, तुषार साठे, नवनाथ खोकड, दत्तात्रय पाटोळे, रेखा जगताप, विजय शिंदे, बाळासाहेब दाहे, किशोर डोखे, विलास पाटोळे यांसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply