नागरिकांची गैरसोय दूर करावी, अन्यथा नगरपरिषदेच्या कार्यालयावर जन आंदोलन – हर्षदा काकडे

शेवगाव प्रतिनिधी, दि.०८ :  येथील नेवासा रस्त्या जवळील ज्ञानेश्वर नगर मधील मोठ्या नाल्यामुळे नागरिकांची होणारी गैरसोय दूर करावी अन्यथा ज्ञानेश्वर नगर येथील नागरिकां समवेत नगरपरिषदेच्या कार्यालयावर मोठे जन आंदोलन केले जाईल असे निवेदन माजी जि.प.सदस्या हर्षदा काकडे यांनी शेवगाव नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष लांडगे यांना दिले आहे.       

यावेळी काकडे म्हणाल्या की, या परिसरात विकास कशाला म्हणतात हेच कळत नाही. या वस्तीच्या जवळूनच मोठा नाला वाहतो. या नाल्यांमध्ये शहरातील सुमारे ६० ते ७० टक्के सांडपाणी येते. पावसाळ्यात जास्तीचा पाऊस झाल्यास हेच सांडपाणी येथील नागरिकांच्या घरादारात शिरते. नाल्यामध्ये मोठाले गवत, काटेरी झाडे उगल्यामुळे नाल्यातील पाणी या भागातच साचून मोठी दुर्गंधी पसरली आहे.

यामुळे डासांची संख्या वाढली असून येथील नागरिकांच्या आरोग्यावर याचा परिणाम जीविताला धोका तयार झाला आहे. या वस्तीवर कोठेही अंतर्गत रस्ते गटारी नाहीत. वीज, पाण्याची व्यवस्था नाही. या भागात आल्यावर एखाद्या आदिवासी भागात आल्यासारखे वाटते. येथील नागरिक दरवर्षी नियमितपणे वेळेवर नगरपरिषदेची घरपट्टी, पाणीपट्टी भरतात. तसेच धरण उशाला असूनही १५ ते २० दिवसाला पाणी मिळते. कोठेही गटारी दिसत नाहीत. ज्या आहेत त्यांची नियमित स्वच्छता होत नाही.

शहराकडे लोकप्रतिनिधींचे लक्ष नाही. नगरपरिषदेला स्वतंत्र मुख्य कार्यकारी अधिकारी नाहीत. नळ योजनेसाठी कोट्यावधी निधी मंजूर आहेत. फक्त लोकप्रतिनिधींच्या टक्केवारीसाठी निविदा वारंवार प्रसिद्ध केली जाते. लोकप्रतिनिधींना १० % कमिशन लागत असेल तर शहराचा विकास कसा होणार ? असा प्रश्न करून या परिसरात लवकरात लवकर मोठी बंदिस्त गटार करून नागरिकांची गैरसोय दूर करावी.

तसेच नगरपरिषद झाल्यापासून रस्ते, वीज, स्वच्छता, पाणी व्यवस्थापनासाठी खर्च केलेला निधी याबाबत चौकशी होण्यासाठी येथील महिलांना घेऊन जिल्हाधिकारी यांना निवेदन देणार असल्याचे ही काकडे यांनी निवेदन देतेवेळी म्हटले आहे.

निवेदनावर रमेश बैरागी, प्रवीण बैरागी, जगदीश बैरागी, नामदेव वीर, अशोक नांगरे, सचिन बाबर, विलास लवांडे, भारत हुंबे, कचरू अडसरे, एकनाथ वनवे, कचरू तुपे, गणेश देवढे, सतीश देशमुख, देविदास नांगरे, बेबीताई देशमुख यांच्यासह अनेक ग्रामस्थांच्या सह्या आहेत.