समताच्या सत्यजित कार्लेची राष्ट्रीय रग्बी संघात निवड

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १६ : शिक्षणासोबत क्रीडाक्षेत्रातही विद्यार्थ्यांना राष्ट्रीय पातळीवर झळकावणारे समता इंटरनॅशनल स्कूल पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. शाळेचा होतकरू खेळाडू सत्यजित संभाजी कार्ले याची महाराष्ट्र रग्बी संघात निवड होऊन तो आता ओडिशा येथे होणाऱ्या राष्ट्रीय रग्बी स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व व नेतृत्व करणार आहे. या निवडीमुळे कोपरगावसह पंचक्रोशीत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दिनांक २८ ते ३० नोव्हेंबर २०२५ दरम्यान आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुल येथे झालेल्या शालेय राज्यस्तरीय १७ व १९ वर्षांखालील रग्बी स्पर्धेत समता इंटरनॅशनल स्कूलच्या १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने पुणे विभागाचे प्रतिनिधित्व करत दमदार कामगिरी केली. पहिल्या सामन्यात नागपूर विभागावर मात, त्यानंतर नाशिक विभागावर विजय मिळवत संघाने अंतिम फेरी गाठली. अंतिम सामन्यात पुणे विभागाने द्वितीय क्रमांक पटकावत आपली गुणवत्ता सिद्ध केली.

या यशात सर्वाधिक लक्ष वेधून घेतले ते सत्यजित कार्लेच्या सातत्यपूर्ण, आक्रमक व नेतृत्वगुणांनी परिपूर्ण खेळाने. उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर त्याची थेट महाराष्ट्र रग्बी संघात निवड झाली असून, हे समता इंटरनॅशनल स्कूलसाठी अभिमानास्पद यश मानले जात आहे.

या यशाबद्दल बोलताना कार्यकारी अधिकारी स्वाती कोयटे म्हणाल्या, “विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हाच आमचा केंद्रबिंदू आहे. सत्यजितचे यश हे आमच्या क्रीडाविषयक धोरणाचे यशस्वी उदाहरण आहे.” तर प्राचार्य समीर आत्तार यांनी सांगितले की, “योग्य मार्गदर्शन आणि संधी मिळाल्यास विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावर नक्कीच चमकतात.”

सत्यजितला क्रीडा विभाग प्रमुख रोहित महाले आणि रग्बी प्रशिक्षक सुनील चौधरी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या शिस्तबद्ध प्रशिक्षणामुळे संघामध्ये आत्मविश्वास, संघभावना आणि जिंकण्याची जिद्द निर्माण झाली.

या घवघवीत यशाबद्दल संस्थापक ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे व सौ. सुहासिनी कोयटे यांच्या हस्ते सत्यजितचा सत्कार करण्यात आला. शाळेच्या या यशामुळे समता इंटरनॅशनल स्कूलची ओळख राज्यस्तरावर अधिक भक्कम झाली असून, सत्यजितची कामगिरी इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

Leave a Reply