कोपरगाव प्रतिनिधी, दि. १७ : विरोधकांकडे चाळीस वर्ष सत्तेत असतांनाही कोपरगावच्या विकासासाठी त्यांनी कोणतीही ठोस कामगिरी केली नाही. शहरातील मूलभूत प्रश्न जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवून, त्याच प्रश्नांवर वर्षानुवर्षे राजकीय पोळी भाजण्याचे काम केले. चाळीस वर्ष आमदारकी आणि वर्षानुवर्ष नगरपालिकेची सत्ता असताना देखील विकासाच्या नावाखाली केवळ घोषणाबाजी केली. प्रत्यक्षात मात्र रस्ते, पाणीपुरवठा, गटारी,स्वच्छता, आरोग्य सुविधेचे प्रश्न जसेच्या तसेच ठेवले. नागरिकांना दररोज भेडसावणाऱ्या अडचणींकडे सत्ताधाऱ्यांनी सोयीस्करपणे दुर्लक्ष केल्यामुळे कोपरगावचा विकास रखडला असून कोपरगाव शहर विकासाच्या बाबतीत मागे खूप मागे नेवून ठेवले असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी सांगितले.

कोपरगाव शहरातील प्र.क्र.१३ व प्र.क्र. ३ व ४ मध्ये आ.आशुतोष काळे यांनी नागरीकांशी संवाद साधला ते म्हणाले की, माझ्या कामाची पद्धत वेगळी आहे. केवळ आश्वासने देवून वेळ मारून न्यायचा माझा स्वभाव नाही.नागरिकांच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करून शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करतो. नागरिकांच्या समस्या-अडचणी समजून घेवून त्या अडचणी सोडवल्या आहेत.

कोपरगावला समृद्ध करणे आणि नागरिकांना पाणी, रस्ते, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण यांसारख्या सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे हे आमचे ध्येय आहे. कोपरगाव शहर आणि तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध आहे.कोपरगावचा विकास करून आगामी काळात कोपरगावचा चेहरा-मोहरा बदलण्यासाठी ठोस आणि परिणामकारक निर्णय घेणार आहे.

शासनाच्या विविध विकास योजनांचा जास्तीत जास्त लाभ कोपरगावच्या नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा संकल्प आहे. शहराच्या विकासासाठी सकारात्मक आणि परिणामकारक काम करायची गरज आहे. विरोधकांसारखे टीका आणि आरोपाचे राजकारण न करता प्रत्यक्ष कृतीतून विकास साधून कोपरगावला समृद्ध करायचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

सत्तेत असूनही विकास न करता केवळ श्रेयवाद आणि आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण करणाऱ्या लोकांना जनता योग्य धडा शिकवेल. शहरातील रखडलेली कामे, अपुऱ्या सुविधा आणि दुर्लक्षित प्रश्न यामुळे नागरिक त्रस्त असून कोपरगावची जनता विरोधकांवर नाराज आहे. नागरिकांना अडचणीत ठेवून त्याच प्रश्नांवर राजकारण करण्याची मानसिकता कोपरगावच्या प्रगतीसाठी घातक असून आता अशा निष्क्रिय लोकांना जनता कंटाळलेली आहे. त्यामुळे कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा नगराध्यक्ष आणि नगरसेवक मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असा ठाम विश्वास आ.आशुतोष काळे यांनी व्यक्त केला.


